Wednesday, April 23, 2025

दयाळू भरत

  • कथा: प्रा. देवबा पाटील

एकीकडे जगदेवराव भरतला पोहणे शिकवायचा विचार करू लागले, तर दुसरीकडे भरतने कासरा नंदीच्या पाठीवर टाकला आणि गंमत बघत मोठ्या हौदाच्या कठड्यावर बसला. पण अचानकच भरतचा तोल गेला आणि तो मोठ्या हौदात पडला.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भरतपूरला निसर्गसौंदर्याची छानशी देणगी लाभलेली होती. अशा या निसर्गरम्य भरतपूरमध्ये जगदेवराव हे जमीनदार राहायचे. गावाला लागूनच त्यांची खूप मोठी शेतीवाडी होती. बारमाही पाण्याचा हिरवागार मळा होता. त्यांच्या मुलाचे नाव भरत असे होते. भरतला निसर्गाची खूप आवड होती. त्याचा मळा तर बारमाही हिरवागारच असायचा. त्याला मळ्याचा खूपच लळा होता. मळ्यात तो खूप रमायचा. त्या काळी प्रत्येक शेतशिवारांच्या धु­ऱ्यांवर खूप खूप निंबांची, बोरींची, चिचांची, जांभळांची, आंब्यांची वगैरे झाडे असायची. ते दिवाळीच्या सुट्ट्यांचे दिवस होते. हा ऋतू म्हणजे बोरांचा ऋतू.

भरतच्या कपिला गाईला एक छानसे गव्हाळ्या रंगाचे गोंडस वासरू होते. एकदा तो असाच बोरं खाण्यासाठी शेतात गेला असता गाईच्या मागे मागे त्याला ते वासरू लंगडत लंगडत चालताना दिसले. भरत त्याच्याजवळ गेला व त्याचा पाय निरखून बघू लागला. जंगलात त्या वासराचा एखाद्या काट्यांच्या मोठ्या फांदीवर पाय पडला असावा. त्या फांदीचे दोन काटे त्याच्या पायात खुराच्यावर मागच्या बाजूस घुसलेले होते. भरतने प्रथम तीन-चार वेळा त्याच्या डोक्यापासून तर शेपटापर्यंत मानेवरून, खांद्यावरून, पाठीवरून मायेने हात फिरवला. त्यामुळे ते वासरू स्तब्ध उभे राहिले. नंतर त्याच्या पायावरून हात फिरवत फिरवत हळूच भरतने ते काटे काढून टाकले.

तेव्हापासून त्याचा भरतला व भरतचा त्या वासराला खूप लळा लागला होता. इतका की, भरत जेव्हा शेतात जाई तेव्हा तो दिसताक्षणी ते वासरू आपली छोटीशी, छानशी शेपटी पाठीवर टाकून उड्या मारीत हंबरायचे. जणू काही ते भरतला आनंदाने बोलवायचे. भरत त्याच्याकडे गेला नाही, तर ते वासरूच भरतकडे धावत यायचे. त्याचा आनंद बघून भरतने त्याचे नाव नंदी ठेवले.

भरत शेतातील कोवळे कोवळे हिरवेगार लुसलुशीत गवत त्याला स्वत:च्या हाताने खाऊ घालायचा. त्याला पाणी पाजायचा. त्याच्या लुसलुशीत पाठीवरून मायेने हात फिरवायचा. नंदीसुद्धा आपल्या जिभेने त्याचा हात चाटायचा. अशी त्याची व नंदीची इतकी खास दोस्ती जमली होती. भरत शेतावर गेला असताना दोघांना एकमेकांशिवाय करमत नसायचे. जगदेवरावांच्या मळ्यात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीसमोर एक भला मोठा हौद होता. विहिरीतील विद्युतपंपाचे पाणी पाइपद्वारे प्रथम त्याच मोठ्या हौदात पडायचे. नंतर त्या हौदातून ते खाली गुरांना पाणी पिणे सोईचे जावे यासाठी केलेल्या लहान हौदात पडायचे. त्यानंतर पाण्यासाठी केलेल्या दांडात पडायचे व त्या दांडांमधून पिकांना जायचे.

तो रविवारचा दिवस होता. इकडे जगदेवराव आपल्या भरतला पोहणे शिकवायचा विचार करू लागले. एवढ्यात भरत त्याच्या आवडत्या नंदीचा कासरा हाती धरून धावतच त्याला पाणी पाजण्यासाठी लहान हौदाजवळ घेऊन आला. भरतने कासरा नंदीच्या पाठीवर टाकला व त्यांची गंमत बघत मोठ्या हौदाच्या कठड्यावर बसला. नंदी शांतपणे हौदातले पाणी पीत होता. अचानक भरतचा तोल गेला व तो मोठ्या हौदात पडला. हौदातील पाण्याचा मोठ्याने डुबक असा आवाज झाला. तो आवाज ऐकून जगदेवराव त्याच्याकडे धावत जाण्याआधीच नंदीने मोठ्या हौदात उडी घेतली व हळूच भरतला आपल्या इवल्याशा शिंगांनी डोक्यावर उचलून धरले.

एव्हाना इकडून जगदेवराव व तिकडून गडीसुद्धा धावत जाऊन तेथे पोहोचले. त्यांनी भरतला बाहेर काढले. नंदी त्वरित हौदातून उडी मारून बाहेर आला. सा­ऱ्यांनी नंदीचे कौतुक केले. जगदेवरावांनी नंदीची पाठ थोपटली. नंदीनेसुद्धा शेपटी पाठीवर टाकून, फुरफुर करीत उजव्या खुराने जमीन उकरून आपला आनंद व्यक्त केला नि भरतभोवती आनंदाने उड्या मारू लागला. थोड्याच वेळात दोघेही बापलेक मोठ्या हौदात उतरले व जगदेवराव भरतला पोहणे शिकवू लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -