ठाणे: ९ एप्रिलला शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांसोबत सर्वांना अयोध्येला जाणार आहोत. शरयू नदीवर आरतीही करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आणि भाजप-शिंदे गटाची सावरकर गौरव यात्रा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले बाळासाहेबांचे आणि देशातील करोडो लोकांचे स्वप्न होते की, राम मंदिर बांधले पाहिजे. हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. तसेच कार सेवेत आनंद दिघेंनी चांदीची वीट पाठवली होती. त्याप्रमाणे आम्ही सागाचे लाकूड पाठवत आहोत. हा आमचा खारीचा वाटा असेल,’ अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला वज्रझुट असे म्हणत, महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भगवान श्रीरामाच्या वानरसेनेने सेतू बांधताना त्या दगडांवर राम असे लिहिले म्हणून ते दगड तरंगले पण हे सर्व दगड एकत्र येऊन बुडणार आहेत. यात काही छोटे दगड आहेत तर काही मोठे दगड, असाही खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
दरम्यान, अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला काही मिनिटांचा अवधी असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दांडी मारली आहे. प्रकृती ठिक नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. मात्र, नाना पटोलेंनी निवडलेल्या टायमिंगमुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत.