ठाणे: ठाण्यातील सावरकर यात्रेच्या समारोपावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीर सावरकरांचा अपमान कोणीही सहन करणार नाही असा एल्गार केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांबद्दल एकही शब्द कोणी ऐकणार नाही, सहन करणार नाही, म्हणून ही गौरव यात्रा काढण्यात आली आहे. त्याची छोटीशी झलक आज या ठाण्यातील गौरव यात्रेतून तुम्हाला दिसेल. सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपा आणि शिवसेनेने काढली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे अनुकरण करणाऱ्यांचं मी या यात्रेत स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. ठाण्यातील सावरकर गौरव यात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी बातचीत केली तेव्हा ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, वीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्ववाद प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. जाणून बुजून त्यांचा त्यांच्याविरोधात बोललं जात आहे. या लोकाना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ध भाजप आणि शिवसेनेने काढलेली ठाण्यातील सावरकर गौरव यात्रा आज समाप्त झाली. ही यात्रा महाराष्ट्रभर सुरु राहणार आहे. संध्याकाळी मुंब्रा तसेच इतर विभागात ही यात्रा काढली जाईल. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे संध्याकाळी ५ वाजता ही यात्रा काढली जाईल.
आशिष शेलार यांचाही हल्लाबोल
दरम्यान, दादर येथील यात्रे दरम्यान आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान वारंवार काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. देशभक्तांचा अवमान होत आहे त्यामुळे देशभक्त कसे रस्त्यावर येतात हे पहा. सावरकर यांच्या विचारांवर चालायच असेल, तर ठाकरे यांनी काँग्रेस सोडावी असेही शेलार यावेळी म्हणाले. हिंमत असेल तर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांना माफी मागायला लावावी.






