- कोकणी बाणा: सतीश पाटणकर
शासकीय सलामी दिली जाणाऱ्या मंदिरांपैकी धावीर महाराज मंदिर हे रोहा शहराचं ग्रामदैवत आहे. शहराच्या पश्चिम भागात सुंदर निसर्ग याच्यासोबत या मंदिराची उभारणी केली आहे. या धावीर महाराजांवर रोहेकरांची अपार अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, त्या मुंबईपासून केवळ सव्वाशे किलोमीटर अंतरावर शिवरायांच्या रायगड जिल्ह्यात ‘रोहा’ हे निसर्गसुंदर गाव वसलेले आहे. उत्तरेला अवचितगड, दक्षिणेला कळसगिरीचा डोंगर आणि बारमाही वाहणारी कुंडलिका या साऱ्यांच्या मध्ये वसलेलं टुमदार घरांचे आणि छोट्या-मोठ्या झाडांचे रोहा हे गाव. या साऱ्या गोष्टी रोह्याची सुरेख नैसर्गिक रचना डोळ्यांसमोर उभी करतात. या अशा निसर्गसंपन्न रोह्यात दोन नररत्न जन्माला आली. त्यांनी रोह्याच्या कीर्तीत भर घातली. रोह्याच्या मातीत सुगंध भरला. त्यातले एक म्हणजे भारताच्या अर्थकारणाला स्वत:च्या सत्यशीलतेने वळण लावणारे भारताचे पहिले अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. चिंतामणराव देशमुख आणि दुसरे म्हणजे भारताच्या नव्हे, तर विश्वाच्या आध्यात्मिक क्षेत्राला मार्गदर्शन करणारे, मानवाचा उद्धार करणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले. चिंतामणरावांना ‘भाई’ म्हणत असत व पांडुरंगशास्त्रींना दादा म्हणत असत. म्हणूनच म्हणतात, दादा आणि भाई यांची जोडी, हीच रोह्याची अवीट गोडी.
अशा वैशिष्ट्यपूर्ण रोह्याचे कुलदैवत, रोह्याचे ग्रामदैवत म्हणजेच “श्री धावीर महाराज” प्रत्येक भक्ताचे श्रद्धास्थान. रोह्याच्या प्रत्येकाच्या हृदयाचा राजा म्हणजेच धावीर महाराज म्हणूनच प्रत्येक भक्त धावीर महाराजांची पालखी असो, धावीर महाराजांची आरती असो किंवा धावीर महाराजांना पोलिसांची सशस्त्र मानवंदना देण्याची वेळ असो, त्यावेळी धावीर महाराजांच्या दर्शनासाठी अधीर असतो. त्यांची पावले धावीर महाराजांच्या देवळाच्या दिशेने झपाझप अंतर कापत असतात. तसेच प्रत्येक रविवारी प्रत्येकजण आपापली सुख-दुःखे सांगण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, एखादे मागणे मागण्यासाठी किंवा एखादा नवस फेडण्यासाठी आपल्या लाडक्या धावीर महाराजांच्या दरबारात हजेरी लावतोच व कधीही न संपणारा उत्साह व प्रसन्नतेचा प्रसाद घेऊन परतत असतो. अशा धावीर महाराजांबद्दल रोहे पंचक्रोशीत विविध कथा सांगितल्या जातात, त्यातील सर्वभूत कथा अशी आहे.
रोहापासून ८ कि.मी. अंतरावर वराठी हे गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात रोजच्या रोज चरायला जाणारी एक गाय एका विशिष्ट ठिकाणी जाऊन एका दिव्य पाषाणावर आपल्या अमृततुल्य दुग्धधारा सोडत असे. हे दृष्य महागावकर या गुराख्याने बघितले व त्याने मोठ्या श्रद्धेने व उत्सुकतेने गाय पान्हा सोडते त्या जागी कुदळीने खणायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, तिथे धावीर महाराजांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. त्यानंतर धावीर महाराजांची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. म्हणूनच आपल्या किल्ल्यात धावीर महाराज असावेत या हट्टापायी मुरुडच्या सिद्धीने धावीर महाराजांची मूर्ती खणून नेण्याचा प्रयत्न केला व श्री धावीर महाराजांचा प्रकोप होताच वठणीवर आला व सन्मानाने धावीर महाराजांची मूर्ती मुरुडच्या जंजीरा किल्याच्या प्रवेशद्वारावर स्थापन केली. वराठीच्या धावीर महाराजांच्या मूर्तीवरील कुदळीचे घाव अजूनही त्या प्रसंगाची आठवण देतात.
रोह्याचे सुभेदार बळवंतराव विठोजी मोरे धावीर महाराजांचे निस्सीम भक्त होते. धावीर महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. त्यांना या दिव्य प्रसंगाने अत्यानंद झाला व ते नित्यनेमाने रोहा येथील मोरे आळीतून वराठीला जाऊन धावीर महाराजांचे नित्य दर्शन घेऊ लागले; परंतु कालांतराने वय वाढल्यामुळे सुभेदार मोऱ्यांना धावीर महाराजांचे दर्शन घेण्यात अडचण येऊ लागली. त्यांना रोजच्या रोज उपवास घडू लागले. धावीर महाराजांना आपल्या लाडक्या भक्ताची होणारी उपासमार व भेटीची आतुरता पाहवली नाही. त्यांनी सुभेदार मोरेना, “रोह्याच्या पश्चिमेस असलेल्या कातळावरून वराठीच्या डोंगराचे दर्शन होते. बरोबर त्याच ठिकाणी माझे मंदिर बांध, मी तुला तिथेच दर्शन देईन” असा दृष्टांत दिला. त्याप्रमाणे सुभेदार मोऱ्यांनी सदर जमिनीचे मालक व रोह्याच्या बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे वतनदार वापुजी राजे देशमुख यांच्याशी संपर्क साधला. बापुजी देशमुखसुद्धा धावीर महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांनाही अत्यानंद झाला व त्यांनी आपली स्वतःची जमीन धावीर महाराजांचे मंदिर बांधण्यासाठी सुभेदार बळवंतराव मोरे यांना दिली. माघ शुद्ध त्रयोदशीला भूमिपूजन केले व फाल्गुन वद्य पक्षात म्हणजेच अवघ्या अडीच महिन्यांत देऊळ बांधून पूर्ण केले. हा काळ होता शके १७६९ म्हणजे इ. स. १८४८चा. त्यानंतर बापूजी देशमुखांनी पुढाकार घेतला व बळवंतराव मोऱ्यांच्या वंशजांना विश्वासात घेऊन १८६० साली रोह्याची ग्रामसभा बोलावली. त्या ग्रामसभेत धाकसूत महाराजांबरोबर धावीर महाराजांना ग्रामदैवत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय एकमुखाने व अत्यंत श्रद्धेने घेण्यात आला. अशा प्रकारे धावीर महाराज रोह्याचे ग्रामदैवत झाले, असे म्हणतात.
मुरुडच्या सीडीला भालगाव विभागातील खाजणीच्या पुढे कधीच मजल मारता आली नाही, कारण त्याला खाजणीच्या काळकाई देवीने व धावीर महाराजांनी रोखून धरले होते. म्हणूनच कदाचित त्याच ग्रामसभेत राजे देशमुखांची कुलदेवता काळकाई या कुलदेवतेचीसुद्धा श्री धावीर महाराजांच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्याचे ठरले. धावीर महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस नंदी देवता, डाव्या बाजूस चेडा महाराज हे द्वारपाल आहेत.
आतमध्ये उजव्या बाजूस वहीरोया महाराज व त्या पुढे वाघयाप्या महाराज तसेच डाव्या बाजूस काळकाई देवी व मागे तीन गवळी वीर अशी स्थाने आहेत तसेच मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूस एक ‘शिळा’ आहे, तिथे बळी दिला जातो.
धावीर मंदिराचा १९१६ साली पहिल्यांदा व दुसऱ्यांदा १९९४ साली पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या शुभ हस्ते जीर्णोद्धार झाला. रोह्याच्या धावीर मंदिराचे एक अलौकिक वैशिष्ट्य सांगता येईल. ते म्हणजे या मंदिराच्या बांधकामाचा खर्च सुमारे ३० लाख रुपये झाला आहे. हे मंदिर बांधण्यासाठी रावापासून रंकापर्यंत सर्वांनी यथाशक्ती देणग्या दिल्या; परंतु एकाही देणगीदाराचे नाव मंदिरावर नाही. अर्थात प्रत्येक देणगीदाराचीच तशी इच्छा होती. हे मंदिर आधुनिक स्थापत्य कला व जुन्या मंदिराच्या अंतर्गत रचना यांचा सुरेख संगम आहे. धावीर देवस्थानात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा नवरात्रोत्सव एक आगळा-वेगळा उत्सव असतो. देवाचे घटी बसणे ते दसऱ्या दिवशी देवाचे उठणे व त्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात फिरणे हा अगदी दहा ते अकरा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला दुपारी बरोबर १२.३० वाजता सर्व नगरजन धावीर महाराजांच्या मंदिरात एकत्र येतात व ढोल, नगारे, संवळ व घंटाच्या पवित्र गजरात धावीर महाराजांची आरती होते. प्रत्येक भक्त श्रद्धापूर्वक त्या आरतीत सहभागी होतो. त्यानंतर रोजच्या रोज सकाळी
७ वाजता, संध्याकाळी ७ वाजता व रात्री १२ वाजता अशी दिवसातून तीन वेळा महाराजांची आरती होते. यापैकी कमीत कमी एका तरी आरतीला हजर राहण्यात प्रत्येक भक्त धन्यता मानतो. नवरात्रीच्या प्रत्येक रात्री ‘प्रहर’ म्हणजेच पहारा असतो. हा प्रहर रोह्यातल्या प्रत्येक समाजाला व विभागाला समावून घेणारा असतो. नवरात्रीत रोज संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गोंधळ घातला जातो. जेजुरीहून येणारे खंडोबाचे गोंधळी ही सेवा अव्याहतपणे बजावत आहेत. गेल्या अनेक पिढ्या बारटक्यांनी अत्यंत श्रद्धेने धावीर महाराजांच्या सर्व चीज वस्तू सांभाळल्या आहेत. या साऱ्या चीजवस्तू बापूजी देशमुखांचे नातू गोविंदराव देशमुख यांनी अत्यंत श्रद्धेने सांभाळल्या व १९६० साली बारटक्यांकडे विश्वासाने सोपवल्या. धावीर महाराजांना शासनाकडून दिली जाणारी सशस्त्र पोलीस मानवंदना अगदी ब्रिटिश काळापासून दिली जाते. तिची सुरुवात कशी झाली, याबाबत असे सांगितले जाते की, एकदा बापुजी देशमुख व जिल्ह्याचा ब्रिटिश कलेक्टर चणेरा विरवाडी भागात फेरफटका मारण्यास गेले असता अचानक सिद्धीच्या शिपायांनी त्यांच्यावर हल्ला केला. कलेक्टर घाबरला. पण त्याला बापूजी देशमुखांनी धीर दिला व घाबरू नका, अापल्या पाठीशी धावीर महाराज आहेत, असे सांगितले. देशमुखांनी धावीर महाराजांना मनोमन नमस्कार केला आणि काय आश्चर्य, घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. या दोघांच्या पाठीशी बरेच सैन्य आहे, या समजुतीने सिद्धीच्या शिपायांनी मग तेथून पळ काढला. त्या ब्रिटिश कलेक्टरला धावीर महाराजांच्या शक्तीची प्रचिती आली. त्याने धावीर महाराजांना कृतज्ञापूर्वक वंदन केले व पालखीच्या दिवशी धावीर महाराजांना सलामी देण्यात यावी, असे पोलिसांना फर्मान काढले.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने धावीर देवस्थानला लघू तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. धावीर महाराजांचे भक्त व राज्याचे माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री सुनील तटकरे यांनी त्यासाठी
मेहनत घेतली.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)