- गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
गेल्याच आठवड्यात आम्ही अयोध्येला भेट दिली. अयोध्येत सर्वत्र रस्ता रुंदीकरणाचे आणि रामलल्लाच्या जमिनीवर राम मंदिर उभारण्याचे काम वेगाने चालू आहे. राम मंदिरासाठी बलिदान दिलेल्यांचे तसेच एके ठिकाणी प्रभू श्रीरामाचा जीवनपट फोटोतून मांडण्यात आला आहे.
भारताच्या उत्तर प्रदेशातील शहर अयोध्या! भारतातील हिंदूंच्या सात पवित्र शहरांपैकी एक, रामाच्या जन्मासह, रामायणातील संबोधनाने ते आदरणीय आहे. शरयू नदीच्या काठावर बसलेले हिंदूंचे सर्वात महत्त्वाचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र अयोध्या!
अयोध्या नगरी भगवान विष्णूच्या चाकांवर बसली असून तिला देवाची नगरी म्हटले आहे. अयोध्या पूर्वी साकेत या नावाने आणि आज श्रीविष्णूचा सातवा अवतार मानल्या गेलेल्या भगवान राम जन्मभूमीच्या नावाने ओळखली जात आहे. आता याच अयोध्येत नव्याने श्रीरामाचे अद्भुत अकल्पनीय असे भव्य मंदिर उभारण्याचे काम चालू आहे. अयोध्येचा शाब्दिक अर्थ : ‘जेथे युद्ध होत नाही,’ ‘ज्याला कोणी युद्धाने जिंकू शकत नाही.’
रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा प्राचीन इतिहास
रामायणानुसार अयोध्येची स्थापना मानवजातीचा पूर्वज मनूने केली. अयोध्या ही कोसल प्रदेशाची राजधानी. इश्वाकू कुळाच्या वंशपरंपरेत, राजा दशरथ पौराणिक कथेनुसार, ब्रह्मदेव मनूला विष्णूकडे घेऊन गेले. तेव्हा विष्णूने रामाच्या अवतारासाठी शरयू नदीच्या काठावरील जमीन निवडली. तेथे विश्वकर्माने नगरी बसवली. अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अयोध्येतच भावासोबत बालपण जात असतानाच गुरू विश्वामित्रांनी जंगली राक्षसांचा वध करण्यासाठी रामाला महालाच्या बाहेर काढले. शिकविले. अयोध्येचा राजा असूनही राम वनवासात संन्यासाचे जीवन जगले. सीता त्यागाचा दुःखद प्रसंग अयोध्येतच घडला. मानवी जीवनातील सर्व भोग श्रीरामांना भोगावे लागले. रामानेही आपले आयुष्य पूर्ण झाल्यावर यमराजच्या संमतीने लक्ष्मणाच्या पाठोपाठ शरयू नदीत देहत्याग केला.
ब्रह्मदेवांनी वाल्मिकीला रामायण लिहिण्यासाठी प्रेरणा दिली. वाल्मिकीने रचलेले रामायण हे हिंदूंचे महाकाव्य असून त्यात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे जगावे, याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. लहानपणापासून रामाने मर्यादांना सर्वोच्च स्थान दिले आहे. कर्तव्य, आज्ञेचे पालन करणारा आदर्श पुत्र, बंधू, एक पत्नी व्रत, राजधर्मासाठी वैयक्तिक सुखाचा विचार न करता सीतेचा त्याग केला. सद्गुणांचे मूर्त स्वरूप श्रीराम! त्यांच्या योग्य कृतीमुळे हिंदुधर्मात श्रीरामांना महत्त्व आहे. मृत्यूच्या वेळीही रामाला जास्त आवाहन केले जाते. हजारो वर्षांपासून श्रीराम हे भारताचे प्रकाशस्तंभ राहिले आहेत. श्रीरामाच्या रामराज्यासाठी आजही अयोध्या प्रसिद्ध आहे.
पृथ्वीवर श्रीरामासारखा नीतीवान शासक कधीच झाला नाही. सर्व मानव, प्राणी, पक्षी यांच्याशी दयेने वागत त्यांना सोबत घेऊन, मैत्री टिकवत, नेतृत्वाचेही अधिकार दिले. जो शरण येईल त्याचे रक्षण करणे कर्तव्य मानले. कोणताही मोह न धरता बिभिषणाकडे राज्य सोपवून मातृभूमी स्वर्गापेक्षा मोठी असते ही श्रीरामाची नीती.
तुळशीदास, कबीर, नानक, भगवान बुद्ध, महावीर यांचेही वास्तव्य अयोध्येत होते. गेल्याच आठवड्यात आम्ही अयोध्येला भेट दिली. अयोध्येत सर्वत्र रस्ता रुंदीकरणाचे आणि रामलल्लाच्या जमिनीवर राम मंदिर उभारण्याचे काम वेगाने चालू आहे. राम मंदिराकडे जाण्याआधी यात्रेकरू शरयू नदीच्या काठावर ‘राम की पायडी’ या विस्तीर्ण स्नान घाटात पापमुक्तीसाठी आंघोळ करतात. गाईची, नदीची पूजा करतात. उन्हाळ्यामुळे नदीचे पात्र कमी झालेले दिसले, पाणी गढूळ, स्वच्छ नसल्याने त्या पाण्यात पायही धुवावे वाटले नाहीत.
राम मंदिराकडे जाताच गाडीभोवती रिक्षावाले, मार्गदर्शकाचा गराडा पडतो. सुरुवातीला आपल्याला काहीच अंदाज नसल्याने ते काहीही पैसे सांगतात. मुळीच देऊ नये. पाच मिनिटांचेच अंतर आहे. गाडीतच सामान, मोबाइल, कॅमेरा ठेवावा. गाडी नसल्यास ठिकठिकाणी लाॅकरची सोय आहे. गोंधळात एखादी वस्तू जाण्याची शक्यता असते. तोही क्षणभर अनुभव घेतला. राम मंदिराच्या पूर्ण परिसरात जागोजागी सुरक्षा व्यवस्था चोख आहे. विशेष दलातील महिला पोलीस आहेत. मार्गिकेतून चालताना कुठेही गोंधळ, गर्दी नाही. काही अंतर चालायचे असल्याने पायात चपला-बूट होत्या, त्या दर्शन घेताना काढल्या. या रामजन्मभूमीत बालरूपात छोट्या उभ्या श्रीरामाचे आणि खालच्या बाजूला लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तीन भावांचे शांतपणे दर्शन घेतले. मूर्ती लहान, फुलांची सजावट आणि दुरून दर्शन त्यामुळे मला तरी नीट दिसले नाही. छोट्या कागदाच्या पिशवीत चांगल्या प्रतीचा साखर-फुटाण्याचा प्रसाद आनंदाने देतात. रामाचे सेवक वानर भेटतात. मंदिराचे काम सध्या भक्तांच्या देणगीतून होत आहे. ऑनलाइनही देणगी स्वीकारतात. राम मंदिराच्या परिसरात ‘श्रीराम जन्मभूमी न्यास मंदिर कार्यशाळेत’ लोक काम करीत आहेत. मोठमोठे उभे स्तंभ, कलाकुसरीचे नक्षीकाम, खोदकामात मिळालेले अवशेष, दगड कापायचे मशीन, राजस्थानहून आणलेले दुर्मीळ दगड पाहिले. ‘पत्थर पत्थर राम का, मंदिर के काम का’! राम मंदिरासाठी बलिदान दिलेल्यांचे तसेच एके ठिकाणी रामाचा जीवनपट फोटोतून मांडला आहे.
त्याच परिसरातील इतर स्थानापैकी –
१. हनुमान गढी मंदिर – रावणाच्या दहनानंतर शहराच्या संरक्षणासाठी ७०/८० पायऱ्या चढून किल्ल्यावर विशाल हनुमानाची पाषाण मूर्ती आहे.
२. कनक भवन – राम-सीता या देवतांचे वास्तव्य असलेला हा महाल, कैकयीने सीतेला लग्नानंतर भेट दिला.
३. गुफ्तार घाट – ज्या ठिकाणी श्रीराम लुप्त झाले (जलसमाधी घेतली) तो शरयू नदीवरचा घाट. येथे विशेष गर्दी नाही. विशाल शरयू नदीत बोटीने फिरलो. येथील राम जानकी मंदिरातील मूर्ती सुबक आणि सुंदर आहेत.
४. अयोध्येचे आराध्यदैवत नागेश्वर मंदिर, याशिवाय सीतेची रसोई, दशरथ हॉल अशी अनेक ठिकाणे आहेत.
अयोध्येतील राम मंदिरासाठी लढणाऱ्या लाखो कारसेवकांचा संघर्ष, त्याग, बलिदानामुळेच, आज रामलल्ला मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. याच अयोध्या शहरांत ग्रामीण रूप पाहायला मिळाले. आमच्या ७ दिवसांच्या वास्तव्यात हॉटेलमध्ये रामाच्या आवडीची रोज खीर होती. भूमिपूजनाच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “राम मंदिर हे आपली संस्कृतीचे, राष्ट्रीय भावनेचे तसेच कोट्यवधी लोकांच्या सामूहिक संकल्पाचे देखील प्रतीक बनेल. जीवनात असा कोणता पैलू नाही जिथे राम प्रेरणा देत नाही.” आजही संस्कृती आणि नैतिकतेची चर्चा झाली, तर श्रीरामाचेच नाव घेतले जाते. आपल्या देशांत पूर्वीपासून विविधता आहे. ‘मिळून-मिसळून वागणे’ हाच आपल्या रामायणाचा आणि परंपरेचा संदेश आहे. याच आदर्शाने वाटचाल केली, तर देशाचा विकास होईल. प्राचीन, आध्यत्मिक परंपरा लाभलेले श्रीरामाचे शहर : अयोध्या !