२०० वर्षांचे शहर… दीडशे वर्षांची नगरपालिका

Share
  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणत असत, “भारत हा देश खेड्यांचा बनलेला आहे, देशाचा विकास करायचा असेल, तर खेड्यांचा विकास करा.” पण हळूहळू खेड्यांपासून लांब स्वतंत्र ठिकाणी व्यवसाय, उद्योगांच्या निमित्ताने वस्ती रुजू लागली आणि वाढू लागली, तर काही ठिकाणी छोटी-छोटी खेडी एकत्र आली आणि त्यांनी स्वतःचा विकास करायला सुरुवात केली. ग्रामीण जीवनापेक्षा व्यापारउदिम अधिक असलेल्या या भागांमध्ये वेगळ्या पद्धतीचे जीवनमान रुळू लागले, शहरे वसू लागली. गावात पूर्वी गावाचा कारभार गावाचा प्रमुख बघत असे. कालांतराने त्याला सरपंच म्हटले जाऊ लागले. तशाच या नव्याने स्थापन होत असलेल्या शहरांमध्ये सोयी-सुविधा पुरवणे, त्यांचा कारभार चालवणे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका स्थापन झाल्या. तो अधिकार १८५० साली ब्रिटिशांच्या काळखंडातच मिळाला. १८५० नंतर पुढे पंधरा-वीस वर्षांनी भारतातील अनेक शहरांत नगरपालिका स्थापन झाल्या. पुणे, सोलापूर, ठाणे, नाशिक, बार्शी, सातारा, कोल्हापूर, वाई अशा अनेक नगरपालिका शंभरी ओलांडलेल्या आहेत. त्यातील काही महानगरपालिका झाल्या आहेत. असा शंभरी ओलांडून दीडशे वर्षे पूर्ण करण्यासठी वाटचाल करण्याचा मान रत्नागिरी नगर परिषदेला मिळाला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने काल म्हणजेच १ एप्रिल रोजी स्थापनेची १४७ वर्षे पूर्ण झाली. रत्नागिरी नगर परिषदेची स्थापना १ एप्रिल १८७६ रोजी झाली. रत्नागिरी शहर हे पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. या शहराचा आणि या नगर पालिकेचा इतिहाससुद्धा वेगळाच आहे. खरे तर रत्नागिरी या नावाने हे शहर आणि नगर पालिका ओळखली जाते; परंतु शासन दरबारी महसुली नोंदीत रत्नागिरी नावाचे एकही शहर नोंदलेले नाहीय. किल्ले, झाडगाव, राहटाघर, पेठ शिवापूर, कर्ला आणि नाचणे अशी सहा गावे एकत्र येऊन रत्नागिरी हे शहर स्थापन झालेले आहे.

विजापूरचा आदिलशहा, पेशवे, ब्रिटिश यांचा अंमल या शहरावर होता. रत्नागिरी शहरातील आता समाविष्ट असलेल्या मारुती आळी, राम आळी, खालची आळी, तांबट आळी या भागांची त्यावेळी स्वतंत्र ओळख होती. या शहरांमध्ये तेव्हा अवघी साडेचार हजार माणसं राहत असत. ब्रिटिशांच्या अमलात पहिली सुमारे ५० वर्षे गव्हर्नर जनरल यांचा एकतंत्री कारभार सुरू होता. उपलब्ध माहितीनुसार १८३० पूर्वी रत्नागिरी हे नाव नकाशावर उपलब्ध नव्हतं. १८३० साली इंग्रजांनी त्यांच्या प्रशासकीय कारभारासाठी जिल्ह्याचे ठिकाण म्हणून रत्नागिरीला मान्यता दिली, तर १८३२ साली रत्नागिरीला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं.

राज्यकारभारामध्ये हळूहळू जनतेला सहभागी करून घेण्याच्या धोरणानुसार, भारतात नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार १८५०ला ब्रिटिशांच्या कालखंडातच मिळाला आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये पालिकेची स्थापना १ एप्रिल १८७६ रोजी झाली. त्यावेळी रत्नागिरी शहराची लोकसंख्या अवघी ११००० होती. नगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळी जिल्हाधिकारी हे नगरपालिकेचे पदसिद्ध अध्यक्ष असत. चार इतर पदसिद्ध अधिकारी, १२ सरकार नियुक्त, तीन सरकारी अधिकारी, ९ स्थानिक नागरिक यांचा समावेश पालिका बोर्डात असे. त्यातही ९ स्थानिक २ युरोपियन आणि आणि १४ स्थानिक नागरिक यांचा या मंडळामध्ये समावेश होता. त्यावेळी यात एकही लोकनियुक्त सभासद त्यामध्ये नव्हता. म्हणजेच त्यावेळेला निवडणुका होत नसत. Bombay district municiple act १९०१ अन्वये रत्नागिरी नगरपालिकेची प्रथमच लोकनियुक्त सभासदांची तरतूद करण्यात आली आणि सरकारी अधिकारी सभासदांची संख्या एकूण सभासद संख्याच्या निम्म्यापेक्षा अधिक असू नये, असं ठरवण्यात आलं. नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्याचे अधिकारही पालिकेला देण्यात आले. बॉम्बे ब्युरो अॅक्ट १९२५ अन्वये रत्नागिरी नगरपालिकेला मुन्सिपल ब्युरोचा दर्जा देण्यात आला. पालिकेला व चीफ ऑफिसर अर्थात मुख्याधिकारी यांना काही मर्यादेपर्यंत निर्णय अधिकार देण्यात आले आणि नगर परिषदेचा लोकांचा समवेश असलेला कारभार सुरू झाला.

रत्नागिरी नगर पालिकेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान रावबहाद्दूर ल. वि. परुळेकर यांना मिळाला. त्यानंतर पुढे काही वर्षे मतदारसंघातून २९ सभासद पालिकेत कार्यरत होते, त्यापैकी २७ हे निवडून देण्याची तरतूद होती. मुंबई सरकार हेल्थ अँड लोकल गव्हर्मेंट डिपार्टमेंटने पालिकेच्या घटनेत बदल केला. त्यावेळी एकूण २५ सदस्यांपैकी मुस्लीम दोन, हरिजन एक अशा तीन जागा राखीव ठेवण्यात आला. पुढे शासनाने १९९१ च्या ठरावानुसार पालिकेची पुनर्रचना करून एकूण २५ पैकी स्त्रियांसाठी तीन, मागासवर्गीयांसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर शहरातील २३ प्रभागातून प्रत्येकी एक सभासद निवडण्यात आले. दोन जागा स्त्रियांसाठी राखीव, दोन जागा स्वीकृत सभासदांसाठी ठेवण्यात आल्या. या पुनर्रचनेमुळे प्रथमच पॅनल ऐवजी एक सदस्य मतदार संघाची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी म्हणजेच२१ मे १९५६ रोजी पालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने पालिकेचा कारभार ३० डिसेंबर १९५७ पर्यंत सरकारी प्रशासक पाहत होता.

१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर १९५६ चा पालिका अधिनियम कायदा अंमलात आला. त्यामुळे ब वर्ग नगरपालिका असा दर्जा मिळाला. सन १९७२ मध्ये २३ प्रभागांचे २५ प्रभाग झाले. १९७४ मध्ये सदस्य ३२, स्त्रिया आणि स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रत्येकी ३ जागा राखीव झाल्या. १९७४ मध्ये प्रथमच थेट नगराध्यक्ष निवडणूक झाली आणि रत्नागिरीचे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ज. शं. केळकर हे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. १९८१ पर्यंत त्यांचा कारभार होता. त्यांच्या कारभारानंतर पुन्हा ५ वर्ष प्रशासकीय राजवट झाली. १९८५ मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये अनंत शेठ जाधव हे नगराध्यक्ष म्हणून निवडणून आले. त्यानंतर अ. क्रू. शिंदे, रवींद्र सुर्वे यांची नगराध्यक्षपदाची कारकिर्द आजही अनेकांना लक्षात आहे. सन १९९६ पासून नगराध्यक्ष पदांचा कार्यकाल १ वर्षाचा झाला. त्यामध्ये प्रथम उमेश शेट्ये, नंतर राजन साळवी हे त्याकाळचे तरुण कार्यकर्ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष म्हणून लाभले. नंतर अडीच वर्षाच्या कालावधीसाठी प्रमोद रेडीज यांनी कार्यभार पाहिला. २००१ मध्ये पुन्हा थेट निवडणूक झाली आणि उमेश शेट्ये निवडून आले. परत निवडणूक पद्धत बदलली आणि पुन्हा सदस्यांमधून नगराध्यक्ष ठरवले जाऊ लागले. त्यामध्ये मधुकर घोसाळे, अशोक मयेकर, मिलिंद कीर, राजेश्वरी शेट्ये, महेंद्र मयेकर, राहुल पंडित, प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान राजेश्वरी शेट्ये यांना मिळाला, तर पुन्हा २०१६ मध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि राहुल पंडित निवडून आले होते. या काळात प्रभाग रचनेतही वारंवार बदल करण्यात आले.

आता रत्नागिरी शहर खूप बदलले आहे. १ एप्रिल २०२३ला या नगर पालिकेने १४७ वर्षे पूर्ण केली असून दीडशे वर्षांचा टप्पा पालिका गाठणार आहे, तर रत्नागिरी शहरसुद्धा १९३ वर्षांचे झाले आहे. २०० वर्षांचे हे शहर होणर आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सर केलेला रत्नदुर्ग किल्ला, देव जोतिबाचे स्थान असलेला किल्ला परिसर, स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या कीर्तीने उजळून निघालेले शहर, दीडशे वर्षांहूनही जुने नगर वाचनालय, थिबा राजवाडा, यांसह या रत्नागिरी शहरात अनेक वैशिष्ट्ये दडलेली आहेत. मात्र शहर शहरीकरणाच्या व्याखेत बसून फक्त वाढत आहे. त्याचा सदृढ विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक रत्नागिरीकरांनी आपापले योगदान देणे गरजेचे आहे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago