- …के उमेश
इंडियन प्रीमियर लीग नावाचा क्रिकेटचा महामेळावा सुरू झाला आहे. तशी तर प्रत्येकच आयपीएल स्पर्धा खासच असते. पण यंदाच्या आयपीएलचे वैशिष्ट्य असे की, पुन्हा आयपीएल भारतात परतली आहे. यापूर्वी दोन वर्षे ती कोरोना महामारीमुळे भारतात होत नव्हती. आयपीएल ही स्पर्धा अशी महालोकप्रिय आहे की, अख्खा देश जागीच थांबवण्याचे तिच्यात सामर्थ्य आहे. आयपीएलच्या काळात अनेक दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक आपले चित्रपट प्रदर्शित करत नाहीत. कारण त्यामुळे त्यांचा चित्रपट कितीही चांगला बनवला तरीही प्रेक्षकांअभावी त्याचे दिवाळे वाजणार, हे नक्की असते.
दोन महिने आता हा वीस षटकांचा महामेळावा चालेल आणि त्यात भल्याभल्या खेळाडूंचा कस लागेल. आपल्या लाडक्या शहराचा संघ पराभूत झाल्यानंतर कित्येकांचे हृदय भग्न होईल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झालेल्या या स्पर्धेत सारेच संघ लोकप्रिय आहेत आणि कित्येक खेळाडू येथूनच आपला राष्ट्रीय स्तरावरचा प्रवास सुरू करून क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. अर्थात कित्येक खेळाडू एक दोन मोसम चमकले आणि नंतर गुमनामीच्या अंधारात हरवूनही गेले आहेत. पण हा क्रिकेटचा उत्सव आनंदाची लूट करण्याचा आणि क्रिकेटची मजा घेण्याचा आहे. त्यामुळे त्यात मनापासून भाग घेणारे क्रिकेट रसिक आहेतच.
क्रिकेट हा उत्सव कधीही प्रेक्षकांअभावी गळाठलेला आहे, असा इतिहास नाही. कायम प्रेक्षकांनी तुडुंब भरून स्टेडियम वाहत असते आणि वीस षटके हा अजिबात कंटाळवाणा काळ वाटत नाही. त्यात फलंदाजीची आतषबाजी आणि मर्यादित संधी असूनही गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन यात घडत असतेच.
मुंबई इंडियन्स हा सर्वात लोकप्रिय संघ आहे आणि त्याच्याशी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले खेळाडू जोडलेले आहेत. सचिन तेंडुलकरपासून ते रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डपर्यंत दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळतात. रिकी पाँटिंग संघाचा प्रशिक्षक होता. मुंबई इंडियन्सची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, यंदा त्याच्या प्रायोजकांमध्ये तब्बल ११ कंपन्यांची भर पडली आहे. यंदा या संघाला प्रायोजित करणाऱ्या कंपन्यांची संख्या २५ वर गेली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गार्नियर मेन, बिसलेरी, व्हायकॉम १८, रिलायन्स डिजिटल, मॅक्स लाइफ इंशुरन्स, बेला व्हिटा, बिरा ९१ आणि अल्ट्राटेक वगैरे अनेक समूह या संघाशी प्रथमच जोडले गेले आहेत. ब्रँड कंपन्यांचा मुंबई इंडियन्स हा संघ लाडका संघ समजला जातो. मुकेश अंबानी हे त्याचे मालक असल्याने आणि अत्यंत गुणवान खेळाडूंचा समावेश संघात असल्याने त्याच्या गुणवत्तेविषयी कुणालाच शंका नाही. तरीही हा संघ गेल्या कित्येक सामन्यात जिंकू शकलेला नाही. तरीही त्याने प्रायोजकांचा विश्वास गमावलेला नाही. रविवारी म्हणजे २ एप्रिलला मुंबई इंडियन आपली आयपीएल २०२३ ची मोहीम सुरू करेल आणि यात त्याचा सामना बंगळूरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुशी होईल.
हे दहा खेळाडू यंदा आयपीएलमध्ये उलथापालथ घडवू शकतात…
जोफ्रा आर्चर – हा इंग्लंडचा अतिवेगवान गोलंदाज मुंबई इंडियनकडे पुन्हा गंभीर दुखापतीनंतर परतला आहे. त्याच्या वेगानेच तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवू शकतो. आयपीएल हा फलंदाजांचा खेळ असला तरीही आर्चर त्याला अपवाद आहे. त्याच्या गोलंदाजीवर खेळणेच अवघड आहे. मग धावा फटकावणे तर दूरच. याअगोदर तो राजस्थान रॉयल्सकडे होता. पण त्याचा वेग पाहून मुंबई इंडियन्सने त्याला ८ कोटी रुपयांना खरेदी केले.
कॅमेरून ग्रीन – हा आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा महाग खेळाडू असून मुंबई इंडियन्सने त्याला तब्बल १७ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केले आहे. हा ऑस्ट्रेलियन असून त्याने भारतातील हवामानात मैदानावर प्रदीर्घ वेळ उभे राहून शतकही झळकावले आहे. उपयुक्त मध्यमगती गोलंदाजही तो आहे आणि वेळप्रसंगी जबरदस्त फटकेबाजी करू शकतो. वरची फळी कोसळली, तर तो खालच्या फळीत येऊन संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो.
कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंग – हा खेळाडू लक्षवेधी ठरू शकतो. अत्यंत कमी चेंडूत मोठ्या धावा फटकावण्याची त्याची क्षमता आहे. २३ चेंडूंत त्याच्या ४२ धावांमुळेच गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा पराभव केकेआरने केला होता. मैदानात त्याचे क्षेत्ररक्षण जिवंतपणाचे उदाहरण आहे आणि त्याने अनेक अफलातून झेल घेतले आहेत.
(क्रमशः)