Saturday, July 6, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सफिल्मी करिअर ते मिसेस ठाणे 'नूतन जयंत'

फिल्मी करिअर ते मिसेस ठाणे ‘नूतन जयंत’

  • युवराज अवसरमल

नूतन जयंत अभिनेत्रीने लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका म्हणून फिल्मी करिअर सुरू केले; परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूनंतर तिच्या फिल्मी करिअरने पाहिजे तसा टेक ऑफ घेतला नाही. २८ चित्रपट, १९ मालिका, २२ नाटक असा प्रदीर्घ अनुभव तिच्या पाठीशी आहे. अभिनेते जनार्दन लवंगारे सोबत तिचे ‘नो टेन्शन,’ ‘बायको कमाल मेव्हणी धमाल’ ही नाटके गाजली.

कलाकार हा कलाकार असतो, तो कुणाच्याही कंपूत राहू शकत नाही. ती दुसरी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहे. ती आपल्या ‘टर्निंग पॉइंट’विषयी म्हणाली, “मला शालेय जीवनापासून स्नेहसंमेलनात नृत्य करण्याची, नाटकात काम करण्याची आवड होती. माझी उंची जास्त असल्यामुळे शाळेच्या शिक्षिका मला नृत्य समूहाच्या मागे उभे करायच्या; परंतु ते मला आवडत नसे. मी मनात ठरवले की, पुढच्या वेळी मी सोलो डान्स करणार. पुढच्या वेळी मी ‘परदेसीयाँ’ या गाण्यावर सोलो डान्स केला. त्या गाण्यानंतर सर्व जण मला स्पेशल ट्रीटमेंट देऊ लागले. हे मला खूप आवडलं. त्याच वेळी मी ठरवले की अभिनेत्री व्हायचं. हा माझा टर्निंग पॉइंट ठरला.”

दुसरा माझा टर्निंग पॉइंट म्हणजे मला मिळालेलं पहिलं व्यावसायिक नाटक. त्याचं असं झालं की, एका स्पर्धेच्या नाटकात मी काम करीत होते, त्याचे परीक्षक म्हणून जनार्दन लवंगारे आले होते, त्यांना माझ्यातला स्पार्क जाणवला असेल कदाचित, नाटक संपल्यावर ते माझ्याजवळ आले व म्हणाले, “मी एक नवीन नाटक करतोय. त्यामध्ये तुला काम करायला आवडेल का?” मी त्याला होकार दिला. त्या अगोदर नाटकाबद्दल मला जास्त माहिती नव्हती. माझ्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्राशी संबधित नव्हतं. माझे आजोबा म्हणजे बाबांचे बाबांनी त्या काळातल्या नाटकामध्ये काम केले होते. काही सुप्त गुण कुटुंबात असावेत, असे मला वाटते. त्याशिवाय कुणी या क्षेत्राकडे वळणार नाही. निर्माते जनार्दन लवंगारे यांचं, ‘नो टेन्शन’ हे व्यावसायिक नाटक आलं. त्यामध्ये विजय कदम, जनार्दन लवंगारे, उमेश ठाकूर, कल्पना कार्लेकर आदी दिगज्जांसोबत काम करण्याची संधी मिळाली. तेथून माझ्या व्यावसायिक नाटकाचा प्रवास सुरू झाला.

त्यानंतर माझा टर्निंग पॉइंट म्हणजे मला मिळालेला मराठी चित्रपट. त्याचं असं झालं की, ‘बायको कमाल मेव्हणी धमाल’ या माझ्या नाटकाच्या शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे आले होते. नाटकांच्या मध्यंतराला ते मला भेटायला आले व मला म्हणाले, “मी शेवटपर्यंत नाटक बघणारच आहे. मला तुझं काम खूप आवडलं आणि मी नवा पिक्चर करतोय, ‘खतरनाक’ नावाचा, तर उद्या तू मला येऊन भेट.”

मी त्यांना दादरला त्यांच्या घरी भेटायला गेले. मला भेटल्यानंतर लगेचच त्यांनी मला ५०१ रुपयांचा चेक दिला आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या नायिकेच्या भूमिकेसाठी माझी निवड केली. इतक्या सहजपणे माझे चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला. दहा दिवसांनी आम्ही कोल्हापूरला शालिनी पॅलेसमध्ये शूटिंग केले. ताबडतोब त्यानंतर मी ३-४ चित्रपट केले. माझं दुर्दैव असे की, एका वर्षात लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. त्यानंतर भरत जाधवचा जमाना आला. त्याची नायिका दुसरी ठरली. पुढं मला जास्त संधी मिळाल्या नाहीत. त्यानंतर मी अशोक शिंदे, सतीश पुळेकर, शरद पोंक्षे यांच्यासोबत काम केलं. २८ चित्रपट, १९ मालिका, २२ नाटके केली.

निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकरांच्या ‘मराठी तारका’ या नृत्याच्या कार्यक्रमांचे ७५ प्रयोग केले. वर्षा उसगावकर, अलका आठल्ये, रेशम टिपणीस सारे दिग्गज होते. आमच्या दहा जणांचा राष्ट्रपतींकडून सत्कारदेखील झाला. माझे पती जयंतकडून मला नेहमी सपोर्ट मिळाला आहे. ठाण्यात झालेल्या ‘मिसेस ठाणे’ हा किताब मला मिळाला. माझी अभिनयाची व या क्षेत्राची आवड बघून त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -