सिंधुदूर्ग: संजय राऊत धमकी प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका करत असताना भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी असला कोणता पराक्रम केला आहे, की त्यांना धमकी मिळाली? असा सवाल उपस्थित करत, राऊत हे केवळ स्वत:चं महत्व आणि किंमत वाढवण्यासाठी हे सर्व करत असल्याची बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ते सिंधुदूर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याआधी त्यांनी राऊत यांचा ट्वीटरवरुन समाचार घेतला आहे. संजय राऊत यांना त्यांचा जावई सुद्धा त्यांना विचारत नाही. तर इतर कोण धमकी देणार अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. तर, संजय राऊत म्हणजे साडेनऊचं बातमीपत्र असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.
संज्या राऊत तुझा जावई तुझी दाखल घेत नसेल तर बिष्णोई कुठून घेणार??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 1, 2023
या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करताना सांगितले की, संजय राऊतांना जी धमकी आली ती दारुच्या नशेत एका व्यक्तीने दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरीदेखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नसल्याचे स्पष्ट केले.