Saturday, July 6, 2024
Homeमनोरंजन३८ कृष्ण व्हिला... दोन डॉक्टरांची संवाद लीला

३८ कृष्ण व्हिला… दोन डॉक्टरांची संवाद लीला

  • कर्टन प्लीज : नंदकुमार पाटील

महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. तिथे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक वर्षोनुवर्षे एकत्र येत असतात. वर्षभरात होणारे नाटक, एकांकिका यांची स्पर्धेची संख्या लक्षात घेतली, तर लाखो कलाकार या रंगमंचावर स्वतःला आजमावत असतात. अभिनय सोडला, तर नाटकाच्या इतर गरजांमध्ये महिला कलाकारांचा अभाव दिसतो. लेखक, दिग्दर्शक याहीपेक्षा निर्मात्या महिलांची संख्या जास्त पाहायला मिळते. पण शोध घेतल्यानंतर पर्यायी म्हणून ही नावे पुढे आलेली आहेत, हे लक्षात येते. मराठी रंगभूमीचा इतिहास लक्षात घेता दिग्दर्शन काय किंवा लेखन काय यात महिला जेवढ्या संख्येने दिसायला हव्यात, तेवढ्या दिसत नाहीत.

नुकतेच माझ्या पाहण्यात ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नाटक आले. डॉ. श्वेता पेंडसे यांनी हे नाटक लिहिले आहे. या नाटकाचे लेखन इतके अप्रतिम, प्रगल्भ आहे की, नाटकाच्या इतर अंगांचा विसर पडून संवाद ऐकणे आणि अभिनय पाहणे हा प्रेक्षकांच्या निरीक्षणाचा आणि आकलनाचा भाग होतो. हे नाटक पाहताना कोणती गोष्ट लक्षात राहत असेल, तर ती पेंडसे यांचे नाट्य लेखन. मनातली कथा कागदावर उतरवायची, त्याला पूरक संवादाची जोड द्यायची. लेखन म्हणून विद्वत्ता दिसायला हवी म्हणून ठेवणीतल्या शब्दांची सुरेख गुंफण करायची, भरपूर सुविचारांचा भरणा केला की, चकित करणारे नाटक जन्माला येते. पण पेंडसे यांच्या बाबतीत तसे नाही. जसा विषय, तशी भाषाशैली अभ्यासपूर्ण मांडली, तर तेव्हा कुठे कसदार कलाकृती सरस ठरते. एका स्त्री लेखिकेकडून ती लिहिली गेलेली आहे. हे विशेष म्हणावे लागेल. मुळात आतापर्यंतच्या ज्या स्त्री लेखिकांनी नाटके लिहिली त्या वाटचालीत पेंडसे यांचे ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नाटक कक्षा रुंदवणारे वाटते. स्वतः श्वेता पेंडसे यांनी यात नंदिनी चित्रे यांची, तर देवदत्त कामत यांची डॉ. गिरीश ओक यांनी भूमिका साकार केलेली आहे. जे कागदावर लिहिले आहे, ते या कलाकाराच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत मनातून, अंतरात पोहोचते. ‘३८ कृष्ण व्हिला, दोन डॉक्टरांची संवाद लीला’ असे या नाटकाच्या बाबतीत समर्पक विधान करता येईल. या दोघांसाठी नाटक पाहाच, पण उत्तम संहिता, त्यातली भाषा, कथा, सादरीकरण कशी असायला हवी हे जाणून घ्यायचं असेल, तर बुद्धिजीवी, सृजन अभ्यासू, अभिनयाची उत्तम जाण असलेल्या प्रेक्षकांनी हे नाटक आवर्जून पाहायला हवे. विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून मल्हार आणि रॉयल थिएटर यांच्या वतीने मिहीर गवळी यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

पडदा उघडतो आणि नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांच्या संकल्पनेतील प्रशस्ती घर पाहायला मिळते. प्रसिद्ध साहित्यिक, अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी देवदत्त कामत यांचा हा ‘३८ कृष्ण व्हिला’ बंगला आहे. नाटकाची नायिका नंदिनी चित्रे संतापलेल्या अवस्थेत रंगमंचावर प्रवेश करते. कामत हे ढोंगी, मतलबी, प्रसिद्धीच्या हव्यासाला बळी पडलेले साहित्यिक आहेत. असे तिचे म्हणणे असते. जे काही पुरस्कार, नावलौकिक त्यांना प्राप्त झालेले आहे. त्या सर्व प्रसिद्ध झालेल्या साहित्याचे मूळ लेखक मोहन चित्रे आहेत जे नंदिनीचे पती आहेत. स्वतःचे नाव न लावता ‘यश’ या टोपणनावाने पतीचे श्रेय तुम्ही लाटत आहात, असे तिचे म्हणणे आहे. तिने त्यांना कोर्टाची नोटीस पाठवलेली आहे. ती का? कशासाठी? पाठवलेली आहे, हे कामत याना जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांनी नंदिनीला आपल्या घरी बोलावून घेतलेले आहे. वैचारिक देवाण-घेवाण, शाब्दिक वाद, मी कसा बरोबर आहे? हे दोघांचे ठासून सांगणे, परिणामाचा विचार, होणारी बदनामी, आजची कालची साहित्यिक स्थिती, लेखकांबद्दल आदर, यातून पुढे येणाऱ्या कविता, त्यांचे सादरीकरण सारे काही या दोन कलाकारांच्या संवादातून पुढे येते आणि प्रेक्षकांना प्रज्ञा, प्रतिभा आणि प्रगल्भता म्हणावे असे नाटक पाहिल्याचे समाधान मिळते. या संवादातून नेमके काय घडते? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकांने हे नाटक पाहायला हवे.

नाटकात दोनच पात्र आहेत. मोहन चित्रे यांचा या कथेत वारंवार उल्लेख होतो. त्यांच्याच भोवती या नाटकाची कथा घडते आहे. फक्त दोनच कलाकारांच्या मदतीने दोन अडीच तास प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे म्हणजे दिग्दर्शक आपल्या अधिकाराचा फायदा घेऊन नवनवीन प्रयोग करत असतो. कथा उत्तम असेल, त्यात काम करणाऱ्या कलाकारांना अभिनयाची समज असेल, तर कुठल्या प्रज्ञाशाली दिग्दर्शकाला उसने उघड्या घ्याव्या लागत नाहीत. अभिनय आणि संवाद यांचे हे नाटक आहे. ते कलाकारांनी अचूकपणे व्यक्त केले, तर प्रभावी नाटक होऊ शकते. हे ओळखून विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले केले आहे. ते कलाकार म्हणून प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात श्वेता पेंडसे आणि गिरीश ओक या दोन डॉक्टरांनी केलेले आहे. नाटकाची कथा म्हणण्यापेक्षा लेखन जसे लक्षात राहते, तसे यातील कलाकारसुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. खरं तर ओक यांनी यापूर्वी भावना, तटस्थ, संवेदनशील म्हणाव्यात अशा अनेक भूमिका केलेल्या आहेत. पण ही व्यक्तिरेखा फक्त शब्दाला प्राधान्य देणारी नाही, तर पात्राची स्वतःची अशी एक जगण्याची शैली आहे. जी वयोमानाप्रमाणे भूमिकेत बदललेली आहे. त्या साऱ्या गोष्टी त्यांनी भूमिकेत आणलेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रवासात ओक त्यांची ही भूमिका वेगळी ठरते. श्वेता पेंडसे यांनी नंदिनीची आक्रमक तेवढीच भावनिक व्यक्तीरेखा कमालीची केली आहे. हे नाटक प्रभावी होण्याला शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, अजित परब यांचे संगीत, मंगला केंकरे यांची वेशभूषा कारणीभूत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -