नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षात आज १ एप्रिलपासून अनेक व्यवसायात नवीन अटी लागू केल्या असून काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे आजपासून फक्त ६ अंकी हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिनेच विकू शकता येतील. याशिवाय पेनकिलर, अँटिबायोटिक्स आणि हृदयाशी संबंधित औषधेही आजपासून १० टक्क्यांनी महाग झाली आहेत. तर पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९१.५० रुपयांनी कपात केली आहे.
हॉलमार्किंगशिवाय सोने विक्री नाही
नवीन नियमानुसार, आता चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होणार आहे. आता सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री होणार नाही. ज्याप्रमाणे आधार कार्डमध्ये १२ अंकी कोड असतो, त्याचप्रमाणे सोन्याला ६ अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात. या क्रमांकाद्वारे सोने किती कॅरेटचे आहे हे शोधणे शक्य होणार आहे.
अर्थसंकल्पात सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क २०% वरून २५%, चांदीवर ७.५% वरून १५% करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही नवी करप्रणाली १ एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती वाढणार आहेत.
स्मॉल सेव्हिंग्ज बचत योजनेचे नवीन व्याजदर
सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि टाइम डिपॉझिटसह लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, मासिक उत्पन्न योजना आणि किसान विकास पत्रावरील व्याजदरातही वाढ झाली आहे. मात्र, पीपीएफ आणि बचत खाते योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता छोट्या बचत योजनांवर ४% ते ८.२% पर्यंत व्याज दिले जाणार आहे.
आता पॅनशिवाय पीएफ काढण्यावर कमी कर
भविष्य निर्वाह निधी (PF) मधून पैसे काढण्याबाबत कर नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. एक एप्रिलपासून, पीएफ खात्याशी पॅन लिंक नसल्यास, तुम्ही पैसे काढल्यास, आता टीडीएस ३०% ऐवजी २०% असणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा त्या पीएफ धारकांना होईल, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत अधिक गुंतवणूकीची संधी
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त ३० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील. आतापर्यंत या योजनेत जास्तीत जास्त १५ लाख रुपयेच गुंतवले जाऊ शकत होते. या योजनेत वार्षिक ८% व्याज दिले जात आहे.
याशिवाय ज्येष्ठ नागरिक आता मासिक उत्पन्न योजनेत जास्तीत जास्त ९ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील. जोडीदारही तेवढीच रक्कम जमा करू शकतो आणि संयुक्त खात्यात १५ लाख जमा करू शकतो. या योजनेवर ७.१% वार्षिक व्याज मिळत आहे.
महिला सन्मान योजनेला सुरूवात
‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ बजेटमध्ये ७.५% व्याजदरासह लॉन्च करण्यात आले आहे. महिला २ वर्षांसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करू शकतील. सध्या देशातील ७८% नोकरदार महिला बचतीच्या सुवर्ण नियमानुसार २०% देखील बचत करत नाहीत. २ लाख रुपयांच्या योजनेतून दोन वर्षांत ३२ हजार रुपयांचा फायदा होणार आहे.
प्रधानमंत्री वय वंदना योजना बंद
प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) एक एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे. आता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे ३१ मार्च २०२३ पर्यंतच वेळ होता. PMVVY ही ६० वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. या योजनेत एकरकमी रक्कम जमा करून स्वतःसाठी पेन्शनची व्यवस्था करू शकत होता. पण आता ही योजना बंद केली आहे.