शिर्डी : शिर्डीमध्ये साई संस्थान परिसरात साईभक्त आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंदिरात जाण्यापासून रोखल्याने हा वाद पेटला. या हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शिर्डीतील साई संस्थानमध्ये रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या काळात देशभरातून मोठ्या प्रमाणावर पालख्या शिर्डीत येत असतात. त्यानुसार यंदाही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आज या उत्सवाची सांगता झाली. या पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत. यातच मुंबईची साईलीला पालखी ही गेट क्रमांक पाचमधून बाहेर पडली होती. बाहेर आल्यानंतर या पालखीतील भाविकांचे काहीतरी सामान आतमध्ये राहिले, त्यामुळे एकाने ते आणण्यासाठी या गेटमधून पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सुरक्षा रक्षकाने रोखले, त्यातून वाद निर्माण झाला.
यानंतर हा किरकोळ वाद विकोपाला गेला. त्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाकडून शिर्डी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे संस्थानचे सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांनी सांगितले.
शिर्डीत अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. सुरक्षारक्षकांशी झालेल्या वादातून अशा हाणामाऱ्या यापूर्वीही झाल्या आहेत.