मुरबाड: बातमीतील फोटो पाहिला की तुमच्या लक्षा येईल की कल्याण – माळशेज महामार्गतील वैशाखरे नदीवरील पुलाकडे प्रशासनाचे किती लक्ष आहे. शेवटच्या घटका मोजत असलेला हा पूल जिवंत ठेवण्यासाठी चक्क ‘होम मिनिस्टर’ तेलाच्या रिकाम्या डब्यांमध्ये माती भरून त्यात बांबू रोवून त्या बांबूना रिबीन बांधण्यात आल्या आहेत. पुलाची ही दुरवस्था पाहता महाड येथील सावित्री नदीवरील झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पुलावर रात्रंदिवस हजारों वहानांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी वहाने खड्ड्यांमध्ये आदळुन पुलाचा कठडा तोडून खाली कोसळतात. असे अपघात सातत्याने घडत असुन वहान चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, बांधकाम खात्याच्या या नावीण्यपूर्ण खास भारतीय टेक्नॉलॉजीचा माळशेज मार्गे जाणारे येणारे पर्यटक फोटो काढून आपल्या नातेवाईकांना तसेच देशविदेशातील, मित्रमैत्रिणींना पाठवत असल्याचे काहींनी सांगितले. अंदाजे १९७५ साली बांधण्यात आलेला पुल पुर्णपणे जीर्ण व नादुरुस्त झाला असुन शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.