मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड येथील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभा यात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतलं आहे, तर २०० ते ३०० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं समजतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, काल मालवणी येथे रामनवमीनिमित्त भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये घोषणाबाजीवरुन तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन गटांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरही सर्व सुरळीत न झाल्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.
लोकांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये
दरम्यान, याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. तणाव निर्माण झालेल्या परिसरासह आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू होतं. तसेच, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ठेवावी, असं आहवानही पोलिसांनी केलं आहे.