Tuesday, March 25, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखकॅन्सरग्रस्तांना म्हाडाचा निवारा

कॅन्सरग्रस्तांना म्हाडाचा निवारा

कॅन्सर या आजाराचा तोंडातून शब्द जरी काढला तरी जीवाचा थरकाप उडतो. आपल्या देशात आणि जगभरात या आजारामुळे आज कितीतरी लोक मृत्युमुखी पडतात. सर्वसामान्य आजारापेक्षा असामान्य असा हा आजार आहे. लवकर तो ओळखायला येत नाही. या आजाराचे निदान होते आणि कॅन्सर झाला आहे, असे सांगण्यापर्यंत डॉक्टर येतात, तेव्हा तोपर्यंत हा आजार दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. आपल्याला कॅन्सर झाला आहे, या रुग्णाच्या मनात बसलेल्या भीतीने तो खचून जातो, असा हा भयंकर आजार आहे. या आजारावर अत्याधुनिक उपचार करणारी आपल्या देशात फार कमी रुग्णालये आहेत. त्यासाठी मुंबईच्या परळ भागातील टाटांचे रुग्णालय देशभरात प्रसिद्ध आहे. या उपचारावर इलाज करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून मुंबईत रुग्ण येत असतात. या ठिकाणी योग्य निदान आणि योग्य उपचार केले जातात. रुग्ण म्हटला की, तो येताना एकटा येत नाही. त्याच्याबरोबर निदान दोनजण तरी असतात. मुंबईत सर्व काही मिळते, इतकेच काय मुंबईत कुणीही उपाशी राहत नाही किंवा उपाशी झोपत नाही, अशी या शहराची ख्याती आहे. कुणी कितीही गरीब असला तरी वडापाव खाऊन का होईना, तो दिवस अथवा रात्र काढत असतो. पण राहण्यासाठी लवकर जागा उपलब्ध होत नाही. म्हणून आमच्याकडे या आणि जेवण करून जा, असे अनेकजण म्हणत असतात. मात्र राहण्याचे नाव काढू नका, अशी मुंबईतील स्थिती आहे.

रुग्णांसाठी मुंबईत राहण्याची गोष्ट तर फार दूरची आहे. अगदी जवळचा नातेवाईक असला, तर काही दिवस त्याला त्यांच्या घरी आश्रय मिळू शकतो. पण एक दिवस त्याची त्यालाच मुंबईत राहण्याची व्यवस्था करावीच लागते. नाही तर गावाकडचा रस्ता धरण्याशियाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही. पण आता कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णाला व त्याच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांच्या राहण्यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाने सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंबईत घरांच्या उभारणीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हणजेच ‘म्हाडा’ने परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० खोल्या दिल्या होत्या. त्या खोल्यांची टाटा रुग्णालयाने अद्ययावत उभारणी करून धर्मशाळा बांधण्यात आली आहे. या धर्मशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्यामुळे कॅन्सरवर उपचार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची या धर्मशाळेत राहण्याची सोय होणार आहे. मुंबई शहर आणि महाराष्ट्रातून अनेक रुग्ण उपचारासाठी मुंबईत येत असतात. पण एकाही रुग्णालयाकडे रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाइकांसाठी राहण्यासाठीची मोठ्या प्रमाणात अद्ययावत सोय नाही. परिणामी मुंबईत येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना खूप हाल सोसावे लागतात. प्रत्येक रुग्णाला दररोज हॉटेलमध्ये राहून उपचार घेणे शक्य नाही. त्यामुळे ज्याला जसे जमेल, तशी तो आपली सोय करीत असतो. रस्त्याच्या कडेला, पुलाखाली तर कुणी फुटपाथवर आश्रय घेऊन दिवस काढत असतो, इतकी भयानक स्थिती राहण्याबाबतची आहे. आता टाटा रुग्णालयाने रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी धर्मशाळेच्या माध्यमातून सोय करून दिली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी म्हाडाने भोईवाडा येथील बॉम्बे डाईंग मिलच्या जागेवर उभारलेल्या संक्रमण शिबिरातील शंभर घरे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांची टाटा रुग्णालयाने धर्मशाळा उभारली आहे. रुग्णालयापासून काही अंतरावरच ही धर्मशाळा असल्याने देशभरातून येणाऱ्या गरजू, गरीब रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था होणार आहे. गरजेनुसार आणि किमान २० दिवस त्या रुग्णाला तेथे राहता येऊ शकणार आहे. राहण्याची सोय नसल्यामुळे अनेक रुग्ण उपचार सोडून देत होते.

मात्र आता राहण्यासाठी शंभर खोल्यांची व्यवस्था करण्यात आल्यामुळे रुग्णांच्या अडचणी दूर होतील, असे टाटा रुग्णालयाचे उपसंचालक आणि कॅन्सर शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले. पुढील ६ महिन्यांत वैद्यकीय क्षेत्रातील शासनाची संस्था असलेल्या हाफकिनच्या जागेवर ३०० खोल्यांची धर्मशाळा बांधण्यात येत असल्याने तीही रुग्णांसाठी मोठी वरदान ठरणार आहे. या धर्मशाळेची उपलब्धता हा टाटा रुग्णालयासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे, असे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाचे अंमलबजावणी भागीदार एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लि.च्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे हे कार्यरत आहेत. एकूणच मुंबईसारख्या महानगरात क्लिष्ट असा जागेचा बनलेला प्रश्न अनेकांसाठी मोठी डोकेदुखी असताना रुग्णांसाठी म्हाडा आणि टाटा रुग्णालयाने मोठा पुढाकार घेऊन कॅन्सरग्रस्त रुग्णांचा व त्यांच्या नातेवाइकांना राहण्याचा प्रश्न सोडविला. औद्योगिक क्षेत्रातील आघडीचे नाव असलेल्या टाटा मेमोरियल संस्थेस तसेच म्हाडा या घरबांधणी क्षेत्रातील संस्थेस धन्यवाद दिलेच पाहिजेत. रतन टाटा आज प्रत्यक्षात वयोमानामुळे सक्रिय नसले तरी, दानधर्म देण्याचे त्यांचे काम अखंडपणे चाललेले असते. अनेकदा संकटाच्या काळात ते धावून जात असतात. आजच्या वैद्यकीय आणि आधुनिक युगात पुण्य या संकल्पनेला थारा नसला तरी अनेकांचा दुवा घेण्याचे काम टाटा आणि त्यांच्या संस्था करीत असतात, हे काय आजच्या काळात थोडेथोडके नाही. गरिबीमुळे अनेकजण रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा रुग्णांना राहण्याच्या सोयीमुळे दिलासा मिळणार, एवढे मात्र निश्चित!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -