मुंबई: शहरातील प्रसिद्ध डबेवाले गावातील वार्षिक जत्रोत्सवासाठी ३ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान रजेवर जाणार आहेत. मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे सहा दिवस मुंबईतील हजारो कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी शिजवलेले ताजे अन्न मिळणार नाही.
याबाबत अधिक माहिती देताना सुभाष तळेकर म्हणाले, डबेवाले त्यांचे दैवत खंडोबाचा उत्सव साजरा करण्यासाठी तसेच तसेच ३ ते ८ एप्रिल दरम्यान त्यांच्या गावांतील ग्रामदेवतांच्या यात्रांसाठी आपापल्या गावी जाणार आहेत. रविवारी ९ एप्रिल रोजी मुंबईला ते परत येतील आणि सोमवारपासून ग्राहकांना गरमागरम खाद्यपदार्थांनी भरलेले डबे पोहोचवण्यासाठी पुन्हा कामाला लागतील.
बहुसंख्य डबेवाले हे खेड, अकोला, संगमनेर, जुन्नर, मावळ आणि मुळशी या गावांतील असून उरलेले उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेले आहेत.
तळेकर यांनी या रजेबाबतची माहिती ग्राहकांना आधीच दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना आधीच माहिती दिली होती. मात्र, या सहा दिवसांच्या सुट्यांमध्ये महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे.”
दरम्यान, डबेवाल्यांच्या या सुट्टीमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल डबेवाला संघटनेने दिलगिरी व्यक्त केली असून ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी डब्बेवाल्यांचे पैसे कापू नयेत.