Tuesday, April 29, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखसर्वसमावेशक नेता

सर्वसमावेशक नेता

गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • प्रा. नंदकुमार गोरे

गेल्या दीड वर्षांपासून असाध्य आजाराशी खासदार गिरीश बापट यांचा सुरू असलेला लढा अखेर संपला. असाध्य आजारानं त्यांना अखेर हरवलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा सैनिक, नगरसेवक ते आमदार, मंत्री, खासदार असा त्यांचा प्रवास होता. संघाचे संस्कार आणि भारतीय जनता पक्षाचा त्यांच्यावर प्रभाव असला, तरी त्यांच्या मैत्रीआड पक्ष आणि विचार कधीच आले नाहीत.

गिरीश बापट यांचं पुण्याच्या राजकारणातलं स्थान अतिशय महत्त्वाचं होतं. कसबा विधानसभा मतदारसंघातून ते २२ वर्षे आमदार होते. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अन्नपुरवठा मंत्रीपदाची जबाबदारी होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली, तर त्यांची सर्वसमावेशक नेता अशी प्रतिमा तयार झाली होती. बापट यांचं जाणं हा भाजपच्या पुणे आणि राज्यातील कार्यकर्त्यांसाठी धक्का आहे. बापट यांनी नगरसेवक म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. नगरसेवक ते खासदार असा जवळपास चाळीस वर्षांचा त्यांचा प्रवास होता. पुण्यात कसबा भागात भाजपचा बालेकिल्ला तयार करण्याचं श्रेय बापट यांनाच जातं. लढवय्ये असलेले बापट आजारावर मात करतील, असं सर्वांना वाटलं होतं; पण नियतीनं त्यांची झुंज अपयशी ठरवली. बापट हे सर्वसामान्यांशी जुळलेले, जमिनीवरची माहिती असलेले नेते होते. अत्यंत हजरजबाबी, उत्तम संसदपटू आणि चांगले वक्ते होते. नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार म्हणून त्यांनी प्रत्येक कामात आपला ठसा उमटवला. त्यांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे आणीबाणीच्या वेळी योग्य मार्ग काढण्यात त्यांची हातोटी होती. पुण्याच्या विकासातील त्यांचं योगदान कुणीच विसरू शकणार नाही. गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून बापट निराश झाले होते. आपण भाजपसह सर्वच पक्षांवर नाराज आहोत, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. ‘राजकीय जीवनामध्ये जसं सामाजिक, शैक्षणिक काम आपण करतो, तसं मूळ पायाभूत समाजाच्या तळापर्यंत जाणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, हे खरं काम आहे. आपण हल्ली काय करतो की कार्यकर्त्यांमधील कार्य मेलं आणि पुढारीच केवळ राहिला, हे बरोबर नाही. आपली बांधिलकी समाजासोबत आहे. मतांच्या राजकारणासाठी काहीही करत राहिलो, तर चुकीचं आहे. आपण फ्लेक्स लावले, पेपरला जाहिरात दिली, जेवणं दिली म्हणजे आपण खूप मोठं काहीतरी केलं, असं हल्ली काहींना वाटतं. वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत आहे का, पण असं करू नये. लोक आपल्याकडं पाहत असतात. कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावं, पक्ष त्यांच्याकडं पाहतच असतो. एखाद्याचं काम करून दिल्याच्या आनंदापेक्षा दुसरा कोणताही आनंद नाही. आजच्या नव्या संस्कृतीत काम सोडून दुसरंच काहीतरी केलं जातं. तुम्ही आम्हाला जुन्या पिढीचं म्हणा किंवा काहीही म्हणा, आम्हाला हे पटत नाही. मग तो कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, भाजपचा कार्यकर्ता असला तरी आम्हाला ते पटत नाही. आपलं भांडण वैचारिक असलं पाहिजे, वैयक्तिक असता कामा नये. एकमेकांचं काही पटत नसेल तर ते सांगता आलं पाहिजे,’ हे त्यांचं मत किती योग्य आणि स्पष्ट आहे. हे लक्षात यावं.

बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी तळेगाव दाभाडे इथं झाला. तिथंच प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांचं माध्यमिक शिक्षण पुण्याच्या रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. यानंतर त्यांनी बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतली. कॉलेज वयापासूनच त्यांनी संघाचे कार्यकर्ते म्हणून काम सुरू केलं होतं. १९७३ मध्ये ते टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. तिथंही त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी लढा देण्यास सुरुवात केली. नोकरी लागल्यानंतर आणीबाणी लागू झाली. आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास त्यांना झाला. नाशिकच्या कारागृहात अनेक नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. सूर्यभान वहाडणे पाटील, उत्तमराव पाटील आदी नेते तिथे होते. शिक्षा भोगून आल्यानंतर बापट यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखलं. याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. १९९५ मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन् पुढं सलग पाच वेळा निवडून आले. २०१९ साली पुण्याचे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. राजकारणात उंची गाठत असतानाही बापट यांनी टेल्कोमधील आपली नोकरी कधीच सोडली नाही. याविषयी ते सांगतात, “मी टेल्कोमध्ये ३५ वर्षे नोकरी केली. नगरसेवक-आमदार झाल्यानंतर मी नोकरी सोडू शकलो असतो; पण निवृत्त होईपर्यंत मी तिथं नोकरी करत होतो. याचं कारण म्हणजे राजकारण हा माझा व्यवसाय नाही, ते माझं व्रत आहे, असं मी मानतो.” त्यांचं हे म्हणणं एकदा लक्षात घेतलं, तर त्यांनी राजकारण हे पैसा कमवण्याचं साधन आणि साध्य कधीच मानलं नाही, हे लक्षात यायला हरकत नाही. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. त्याचा उल्लेख वारंवार ते आपल्या भाषणात करत असत. काकडे यांच्या ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमास बापट आवर्जून उपस्थित होते. त्या वेळी काकडे यांना विधान परिषद आमदारकी देणार असाल, तर भगतसिंह कोश्यारी असेपर्यंत त्यांचं नाव पाठवू नका, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली होती. या वेळी जर निवडणूक लागली, तर मी अंकुश यांना मतदान करणार नाही, तेसुद्धा मला मतदान करणार नाहीत, असंही बापट म्हणाले होते.

पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून बापट ओळखले जात. भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी ते एक होते. पुण्यात भाजप वाढवण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. मुक्ता टिळक, लक्ष्मणराव जगताप आणि बापट या त्रिकुटाचं काही दिवसांच्या अंतरानं झालेलं निधन हा भाजप आणि पुण्यालाही मोठा धक्का आहे. कार्यकर्ते हाच त्यांचा जीव की प्राण होता. काही दिवसांपूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता; मात्र ऑक्सिजनची श्वसननलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. कायम पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणं विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ या घोषणेनं परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता.

कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती. पुणे जिल्ह्यात शरद पवार याचं वर्चस्व असताना बापट यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं. १९९६ साली त्यांना भाजपनं पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती; पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. २०१४ मध्ये बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती; मात्र पक्षानं अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळं त्यांची संधी हुकली; परंतु २०१९ मध्ये योग्य मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचं तिकीट मिळवलं. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला. विरोधी पक्षाची सत्ता असली, तरी आपलं काम साधून घेण्याचं कसब त्यांना होतं. दांडगा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली गेली. सगळ्यांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळं बापट यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुकर झाला. कार्यकर्त्यांमध्ये रमतानाच कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची हातोटी असल्यामुळं कुठं काय घडतं, याची बित्तंबातमी त्यांच्यापर्यंत पोहोचत असे. त्यांच्या माहितीचा उपयोग त्यांनी सातत्यानं चांगल्या कामासाठी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -