नागपूर: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे वक्तव्य वाह्यात असून त्यांच्या या वक्तव्याने जर पुन्हा दंगली झाल्या तर राऊतांवरच दंगलीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या छत्रपती संभाजीनगरातील दंगल प्रकरणावरुन केलेल्या भडकावू वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दंगली झाल्या त्या सरकार पुरस्कृत होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठीच हे कटकारस्थान रचल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या वक्तव्यावरुन राऊतांवर निशाणा साधत बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांनी असे बोलणे म्हणजे पु्न्हा एकदा चिथावणी देण्यासारखे आहे. यापूर्वी देखील राज्यात दंगली घडल्या. मात्र, आम्ही विरोधी पक्षात असूनही राऊतांसासरखे वाह्यात वक्तव्य केले नाही.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने त्यांची सभा घ्यावी, आम्ही देखील वीर सावरकर यात्रा काढणार आहोत. मात्र, संजय राऊत यांनी जर भडकाऊ भाषण केले तर महाविकास आघाडीची सभा कशी होईल मला माहिती नाही. त्या ठिकाणी संजय राऊत आणि चंद्रकांत खैरै यांच्यामुळे वातावरण बिघडू शकते, असे म्हणत सामाजिक सलोखा निर्माण करत महाविकास आघाडीने सभा घ्यावी, असेही त्यांनी सुचविले.