Monday, May 5, 2025

अग्रलेखसंपादकीय

मुंबई-पुणे टोल वाढता वाढता वाढे...

मुंबई-पुणे टोल वाढता वाढता वाढे...

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अपघाती मृत्यूनंतर एक्स्प्रेस वे पुन्हा चर्चेत आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला गेला; परंतु मेटे यांचा एक्स्प्रेस वेवरील काही पहिलाच मृत्यू नव्हता, तर या आधी अनेकांना या ठिकाणी जीव गमावावे लागले होते. अपघात झाल्यास वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी विलंब कसा होतो, याच्या अनेक कहाण्या समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार करणे शक्य न झाल्याने अशा छोट्या-मोठ्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या अपघातानंतर अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अपघाताचे सत्र आज थांबले का? तर त्याचे उत्तर आजही नाही असेच येईल. सोयीसुविधा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना १ एप्रिल २०२३ पासून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. २००४ साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. या आधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असणार आहेत.

पुणे-मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसते. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरून प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा आणि प्रवाशांना लवकर पोहोचता यावे, यासाठी हा एक्स्प्रेस वे तयार करण्यात आला. मात्र आता पुन्हा टोलवाढ होणार असल्याने त्यांचा मोठा भुर्दंड प्रवासी नागरिकांना सहन करावा लागणार आहे. अनेकदा या महामार्गावर सुविधा नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागते. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ कायम चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोलवाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या महामार्गावर टोलवाढ दर तीन वर्षांनी केली जाते. मात्र सुविधा मात्र पूर्ण मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येते. त्यामुळे तुम्ही टोलवाढ करा. पण सुविधादेखील तशा पुरवा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ती अत्यंत रास्त मागणी आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हटला की, काहींना तो रेसिंग ट्रॅक असल्यासारखाच वाटतो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एक तरी गाडी वाऱ्याच्या वेगाने सुस्साट जाताना दिसून आली नाही, असे होत नाही. मात्र वाऱ्याच्या वेगासोबत खेळ करणाऱ्या या जीवघेण्या वेगावर पोलिसांचा वचक किती आहे? असाही सवाल उपस्थित होतो. प्रचंड वेगाने अपघात घडून अनेक निष्पापांना जीव गमवावा लागल्याच्या घटना फक्त मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरच घडल्या आहेत, असे नाही. पण मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगमर्यादेचे उल्लंघन सर्रास करणाऱ्यांवर कारवाई कितपत होते? असा सवालही यानिमित्ताने पुढे आला आहे. वेगमर्यादा पाळली जात नसेल, तर याचा अर्थ पोलिसांचा धाक मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून गाड्या हाकणाऱ्यांना आहे की नाही, अशी शंका येते. नेहमीच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत? याची माहिती असते. त्यामुळे त्या परिसरातून गाडी चालवताना वेगमर्यादेचे भान ठेवण्याची काळजी वाहनचालक घेताना दिसतात.

टोलवाढ करताना कोणालाही विश्वासात घेतले जात नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेतल्याचे आठवत नाही. एक पत्रक काढून टोल दरवाढ झाल्याचे जाहीर केले जाते; परंतु या महामार्गाच्या सुरक्षेचे काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झालाच, तर अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी थेट मुंबई किंवा पिंपरी पुण्याशिवाय कोणतेच मोठे हॉस्पिटल नाही. त्यामुळे कोणताच पर्याय नसल्याने अनेकदा गंभीर रुग्णांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात आणले जाते. अशा वेळी रुग्णाला वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्याने जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. रुग्णवाहिकेचा प्रश्न, रुग्णालये हा मूलभूत समस्या आजही मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आहेच. या प्रश्नांना १० वर्षांत कोणतंही उत्तर मिळू शकलेल नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अजूनही काही भागात काम सुरू आहे. दुरुस्ती-देखभालीच्या कामासाठी डायव्हर्जन केलेले असो किंवा मग मुंबईहून पुण्याला जात असताना खालापूर सोडल्यानंतर रुंदीकरणाऱ्या कामानिमित्त केलेला वाहतुकीतील बदल असेल, मुंबई-पुणे महामार्गावरून गाडी चालवणे अधिकच जिकिरीचे होते. त्यात लेनमधल्या चरींमुळे देखील मुंबई-पुणे महामार्गावर शंका उपस्थित केली जाऊ लागली. गेल्या काही वर्षांत दर तीन वर्षांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरचा टोलही महागला आहे. अफाट टोल देऊनही सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ‘राम भरोसे’ आहे, अशीही सर्वसामान्यांची भावना झाली आहे.

Comments
Add Comment