मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात येत्या दोन दिवसात विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा ११ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा ११ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी कडाक्याचे ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अवकाळी पाऊस कोसळत असल्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम होत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अति भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे. मात्र, सावधानता बाळगावी, असे आवाहन खुळे यांनी केले आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात वाढलेल्या तापामानत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.