नवी दिल्ली: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना, या सगळ्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे. भारतात कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसंच यांचा अपमान झाला तरीही एवढी मुजोरी येते कुठून असाही प्रश्न अमित शहा यांनी विचारला आहे. एका खासगी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
अमित शहा पुढे म्हणाले, “काँग्रेसकडून सातत्याने असत्याचा प्रचार केला जातो आहे. आपल्याकडे कायद्यात तरतूद आहे की जर कुठल्याही राजकीय व्यक्तीला २ वर्षांची शिक्षा झाली तर आपल्या शिक्षेवर स्टे आणण्यासाठी त्या व्यक्तीला तीन महिन्यांची मुदत दिली जाते. मात्र ती तरतूद शिक्षेवर स्टे आणण्यासाठी असते जो दोष आहे त्यावर स्टे आणण्यासाठी नाही. राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्यांनी त्या शिक्षेवर स्टे आणण्यासाठी अपील का केलं नाही? गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का? ” असा प्रश्न अमित शहा यांनी विचारला आहे.