झूलेलाल मंदिरात आलेले २५ भाविक विहिरीत पडले, बचाव पथकाने १८ जणांना बाहेर काढले
इंदूर : रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात विहिरीवरील छप्पर पडल्याने तब्बल २५ भाविक विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. पोलिस आणि भाविकांनी दोरीने लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. १८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
इंदूरच्या स्नेह नगरजवळील पटेल नगरमधील बेल्श्वर महादेव झुलेला मंदिरात रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. ही घटना हवनाच्या वेळी घडली. विहिरीच्या छतावर २५ हून अधिक लोक बसले होते. वजन जास्त झाल्याने छत तुटले आणि लोक खाली पडले.
दरम्यान, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.