Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यइतरांचे दुःख पाहून समाधानी होण्याची वृत्ती...

इतरांचे दुःख पाहून समाधानी होण्याची वृत्ती…

  • फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

आपल्या सगळ्यांना असणारं दुःख आपल्याकडे जे नाही त्याच्यापेक्षा दुसऱ्याकडे ते आहे याचं असतं. निसर्गनियमानुसार आपल्या सगळ्यांनाच सगळं काही मनाप्रमाणे हवं असतं. चांगलं आरोग्य, उत्तम शिक्षण, चांगला पगार त्यातून येणार भौतिक सुख, बचतीसाठी पैसा, स्थावर मालमत्ता, करिअर, नोकरी, चांगला व्यवसाय, मनपसंद जोडीदार, चांगली हुशार मुलं- बाळ, नातेसंबंध, समजूतदार वेळोवेळी धावून येणारे नातेवाईक, मित्रमंडळी, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पद, प्रगती, उत्कृष्ट जीवनशैली, मोठेपणा, मान-सन्मान यांसारख्या अगणित गोष्टी आहेत ज्यासाठी आपण अहोरात्र झटत असतो, पळत असतो. यातील कोणतीही गोष्ट मिळाली नाही, थोडीफार कमी पडली, अपेक्षेनुसार नसली तर आपण प्रचंड हवालदिल होतो, अस्वस्थ होतो, आपली मानसिकता बिघडवून घेतो.

आपल्याला मिळालं नाही, याहीपेक्षा दुसऱ्याला कसं मिळालं, मीच का वंचित राहिलोय? मी कुठे कमी आहे? मी तर त्याच्यापेक्षा सरस होतो, जास्त लायक होतो तो कसा पुढे गेला, त्यालाच संधी कशी मिळते ही स्पर्धा, ही चढाओढ, हे विचार आपलं संपूर्ण आयुष्य पोखरून टाकत असतात. सतत इतरांच्या आयुष्यात डोकावताना आपली दमछाक होत असते. माणूस स्वतःचा स्वतःबद्दल जितका विचार करत नाही तितका तो इतरांचा करत असतो.

इतरांशी तुलना करता करता, इतरांच्या बरोबरीला येण्यासाठी आपल्याला सातत्याने दिखावा करत जगण्याची सवय लागते. आमचं सगळं कसं चांगलं चाललंय, आमच्याकडे सगळं कसं सुरळीत आणि व्यवस्थित आहे, कुठेच काही कमी नाही, कोणात काही कमतरता नाही हे नसलं तरी ते दाखवण्यासाठी आपण सतत धडपडतोय. आम्हाला सगळं सुख आणि समाधान आहे, हे निव्वळ दाखवण्याचा पोकळ प्रयत्न आपण करीत असतो.

आपल्याला सुखी राहण्यासाठी पैसा लागत नाही पण आपण सुखी आहोत हे दाखवण्यासाठी पैसा लागतोय. तसं दाखवलं नाही, दिसलं नाही, तर लोकं काय म्हणतील? समाज काय म्हणेल? हा आपल्यासाठी अत्यंत गंभीर प्रश्न असतो. कशीही असो दिसताना, दाखवताना सगळं कसं अलबेल वाटलं पाहिजे हा अट्टहास आपल्या आयुष्यातील सुख-समाधान आणि शांतता संपवून टाकत आहे. केवळ पैसाच नाही इतर अनेक गोष्टी आपण दाबून दडपून नेण्यासाठी प्रयत्न करत असतो. कोणाला आपली काहीच कमतरता, कमीपणाची बाजू दिसायला नको, सगळं कसं फोटो फ्रेमसारखं परफेक्ट दिसलं पाहिजे, यासाठी आपण वारंवार झाकपाक करत असतो.

स्वतःची सतत इतरांच्या सुखाशी तुलना करत राहणे, त्यावरून सतत झुरत राहणे, मनस्थिती बिघडवून घेणे आपल्याला आता सवयीचं झालं आहे. आपण आपल्याकडे जे नाही किंवा कमी आहे किंवा मिळणं अशक्य आहे हे स्वीकारतच नाही. इतरांकडे असलेला गाडी, बंगला, पैसासुद्धा आपल्या दुःखाच कारण असू शकतो? दुसऱ्याला मिळालेली प्रसिद्धी, प्रतिष्ठा, मोठेपणा आपली झोप उडवू शकतो? एखाद्याला चांगली नोकरी मिळाली, कोणी अगदी थाटामाटात लग्न केलं, कोणी सहकुटुंब मस्त एन्जॉय करतोय हे पाहून आपल्याला हे का जमत नाही? एखाद्याच एकत्र कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहतंय हे पाहून आपण अस्वस्थ होतो? आपल्या नशिबात असं का नाही? हा विचार करून आपण नाराज होत राहतो. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभिमान वाटण्यापेक्षा नसलेल्या गोष्टींची आपल्याला लाज का वाटते? सत्य स्वीकारण्याची आपल्याला भीती का वाटते? याहीपुढे जाऊन जे आपल्याकडे नाही किंवा जे आपल्याला जमलं नाही, जमत नाही त्यासाठी अनेकांना आपण कारणीभूत अथवा जबाबदार धरत राहतो. त्यात मग आपले आई, वडील, जोडीदार, नातेवाईक, सहसोबती, आपले सहकारी, आपली मुलं यातील प्रत्येकजण आपल्यासाठी कसं काही करत नाहीत, आपल्याला कोणाचा सहकार्य नाही, साथ नाही, सगळे कसे बिनकामी आहेत यांच्यावर खापर फोडून मोकळे होतो. मी आज कुठच्या कुठे असतो पण मला लोकांनी साथ दिली नाही, घरच्यांनी समजून घेतलं नाही, परिस्थितीने साथ दिली नाही, हा युक्तिवाद आपण खुपदा करतो.

अशा मनोवृत्तीमुळे आपण स्वकष्टाने,अथवा नशिबाने मिळवलेल्या गोष्टींचा देखील उपभोग घेऊ शकत नाही. सातत्याने काय करावे, पुढे काय हेच राजकारण मनात घोळत राहातं. आपलं आयुष्य बुद्धिबळाच्या पटासारखं दुसऱ्यांच्या चालीवर अवलंबून राहायला लागतं. प्रगती करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी इतरांचा आदर्श, अनुभव, मार्गदर्शन, सल्ले नक्कीच घ्यावे पण त्याही पलीकडे जाऊन स्वतःला मोठ, इतरांपेक्षा खूप शहाण, खूप बुद्धिमान आणि सुखी सिद्ध करण्यासाठी द्वेष-भावना अथवा मत्सर नक्कीच नसावा.

आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्यासाठी अनेकदा चुकीचे मार्ग वापरणे, अयोग्य निर्णय घेणे, चुकीच्या व्यक्तींना सोबत घेणे, तत्त्वांशी तडजोड करणे, नितीमूल्यांची पायमल्ली करणे अशा गोष्टी आपण करत जातो. आपल्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी, यश, प्रतिष्ठा, पैसा मिळवण्यासाठी आपण स्वतःच आयुष्य जगायचं विसरून जातो, आपल्याच माणसांना आपण दुरावतो आणि ज्या समाजाला, जगाला दाखवण्यासाठी आपण हे नाटक करतोय त्यांच्यापुढे त्यांच्यासाठी आपण हास्यास्पद ठरतो.

सुखाच्या खोट्या कल्पनांच्या मागे लागून स्वतःचं अवमूल्यन करून घेण्यापेक्षा आपण आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याला आपल्यापेक्षा अनेक दुःखी, कष्टी, अपयशी, त्रासलेले, मागे पडलेले, स्वप्न भंगलेले, आहे ते गमावून बसलेले लोकं दिसतील. अनेक असे लोकं दिसतील ज्यांच्या आयुष्यात अनेक कमतरता आहेत, संघर्ष आहे, वणवण आहे. अनेक लोकं असे दिसतील ज्यांना शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत, ज्यांना मुलं आहेत पण ती अपंग अथवा विकलांग आहेत, मनोरुग्ण आहेत. कोणाची बायको नांदत नाही तर कोणाला नवऱ्याने सोडून दिलं आहे. कोणी सुशिक्षित असून पण बेरोजगार आहेत, तर कोणी व्यवसायात खूप तोटा सहन केलेला आहे. कोणाची तरणीताठी मुलं अपघाती वारली आहेत, तर कोणाच्या पती अथवा पत्नी अर्ध्या संसारात स्वर्गवासी झाली आहे. कोणाला मुलांनी सोडून दिलं आहे, तर कोणाला समाजात खूप मानहानी सोसावी लागली आहे. कोणी सगळी भौतिक सुखं असून एकटं आहे. कारण त्याच्या जवळ माणसं नाहीयेत, त्याला जवळच कोणीच नाहीये. ज्यांच्याकडे कुटुंब आहे, माणसं आहेत त्यांना दोनवेळच्या पोट भरण्याची चिंता आहे. कोणाचे लग्न जुळत नाही, तर कोणी घटस्फोटित आहे. कोणी कर्जबाजारी आहे, तर कोणाच्या घरात आत्महत्या, अपघातअशा घटना घडलेल्या आहेत. कोणाला मूल-बाळ होत नाहीत हे दुःख आहे, तर कोणाला मूल-बाळ कायमस्वरूपी परदेशात सेटल झालीत याची सल आहे. कोणाची मुलं वाईट मार्गाला गेलीत, गुन्हेगारीकडे वळली आहेत. आपण जे नाही ते मिळवण्यासाठी जे आहे ते गमावून, तर बसत नाही ना याचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ, आपली माणसं, नाती, मनःशांती, आपल्याकडे असलेली संपत्ती, पद, प्रतिष्ठा, नावलौकिक जे आहे जेवढ आहे त्यावर कुठेतरी समाधान वाटणं, कुठे कुठे तरी थोडं थांबणं, जीवनाच्या प्रवासात विसावा घेणे गरजेचे आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -