Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुंबई-गोवा महामार्गावरील ओव्हरलोड वाहतूक बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

मुंबई-गोवा महामार्गावरील ओव्हरलोड वाहतूक बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

हरीष बेकावडे यांचे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

  • देवा पेरवी

पेण : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरून तसेच पेण-खोपोली मार्गावरून मागील अनेक दशके येथील असंख्य कंपन्यांमधील विविध प्रकारचा कच्चा आणि पक्क्या मालाची ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही वाहतूक संबंधित शासकीय अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमताने होत असून ही ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन स्वतः रस्त्यावर उतरून ही वाहतूक बंद करावी लागेल, अशा प्रकारचे निवेदन सामजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात देऊन ओव्हरलोड वाहतुकीबाबत एल्गार उभारला आहे. विशेषतः धरमतर, वडखळ, पेण, खोपोली व पळस्पे मार्गावरील सुरू असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठंमोठे खड्डे पडत असल्याचाही आरोप बेकावडे यांनी केला.

रायगड जिल्ह्यातील कंपन्या व बंदरे यामध्ये पीएनपी, जेएनपीटी पोर्ट, दिघी पोर्ट, जेएसडब्ल्यू, आरसीएफ, पोस्को, इंडो एनर्जी व अन्य कंपन्यांमधून लोखंडी कॉईल, कोळसा, सल्फर(खत), माती पावडर, चीप, रेती, खडी व इतर मालवाहतूक ही ओव्हरलोड अवैधरीत्या होत आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक गेली अनेक दशके मुंबई-गोवा आणि पेण-खोपोली मार्गावरून होत असून देखील संबंधित परिवहन खात्याचे अधिकारी अशा वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठविला़ त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांनी वृत्तदेखील प्रसिध्द केले, मात्र संबंधित अधिकारी आणि काही राजकीय दलाल यांच्यातील संगनमताने ही ओव्हरलोड वाहतूक आजही सुरू असून, आता मीच स्वतः सर्वप्रथम निवेदन दिले असून आणि त्यानंतरही ही वाहतूक सुरू राहिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हरीष बेकावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ओव्हरलोड वाहतुकीबाबत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढूनही आणि कारवाईचे आदेश देऊनही या आदेशाची पायमल्ली हे मुजोर अधिकारी करीत असून, ‘हप्ता लावा आणि ओव्हरलोड भरून जावा’ या सूत्रानुसार येथील वाहतूक करण्यास हे अधिकारी परवानगी देत आहेत. हे अधिकारी आणि दलाल एकमेकांच्या सहकार्याने ही ओव्हरलोड वाहतूक चालवित असून, दरमहा ३०० ते ४०० ओव्हरलोड गाड्या मागील ८ ते १० वर्षे या मार्गावरून चालत असून, दलालांच्या गोपनीय संघटनेच्या माध्यमातून वीस टक्के दलाल आणि ऐंशी टक्के अधिकारी यानुसार यांचे वाटप होत असल्याचा आरोप बेकावडे यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

आज मी फक्त इशारावजा निवेदन दिले आहे आणि या निवेदनातून आम्ही एकच सांगतो की, ही ओव्हरलोड वाहतूक रोखण्यासाठी आपण आपले वायुवेग पथक वडखळ, नागोठणे (वाकण फाटा), रोहा, पेण(तरणखोप), पेण-खोपोली बायपास आदी ठिकाणी चोवीस तास उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा ही ओव्हरलोड वाहतूक अशीच सुरू राहिल्यास आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्य परिवहन मंत्री व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे या वाहतुकीस अभय देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची निलंबनाची व त्यांच्यासह दलालांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करू, असा इशारा बेकावडे यांनी दिला आहे.

या महामार्गावरून दररोज हजारो गाड्यांची ओव्हरलोड वाहतूक होत असताना भरारी पथक, आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस, पोलीस अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर कोणती गुंगी आलेली असते? असा सवाल करीत फक्त अधिवेशन काळातच या ओव्हरलोड गाड्या बंद ठेवण्यात येतात, फक्त दिखावा म्हणून काही किरकोळ गाड्यांवर करवाई दाखविण्यात येते, मात्र या करवाई केलेल्या गाड्यांवर जप्ती का येत नाही? जप्त केलेल्या गाड्या प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा इतर शासकीय परिसरात जप्त करून आणून का ठेवल्या जात नाहीत?, असा सवाल देखील या निवेदनातून हरीष बेकावडे यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -