
कर्णधार रोहित शर्माने जागवल्या आठवणी
मुंबई (प्रतिनिधी) : रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून कार्यभार स्वीकारल्याला आयपीएल २०२३ मध्ये दहा वर्षे पूर्ण होत आहेत आणि या दहा वर्षांत तो पाच विजेतेपदांसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयपीएलच्या १६व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी रोहितने फ्रँचायझीसोबत त्याच्या दीर्घ प्रवासाबद्दल सांगितले आणि या सहवासातील प्रत्येक क्षण आवडता असल्याचे त्याने म्हटले. ''१०वर्ष हा मोठा काळ आहे. साहजिकच १० वर्षांत तुम्ही खूप आठवणी निर्माण होतात. त्यातला प्रत्येक क्षण मी नक्कीच एन्जॉय केला आहे. तुम्ही मला एखादी आवडती आठवण सांगायला सांगितल्यास, मी ते करू शकणार नाही कारण ते कठीण आहे,''असे रोहित म्हणाला.
२०११च्या मोसमात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एक तरुण खेळाडू म्हणून सामील झाल्यानंतर, रोहितने पाच विजेतेपदात संघाचे नेतृत्व केले आहे. २०१३ च्या स्पर्धेत त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि पहिल्याच वर्षात संघाला विजेतेपद मिळवून दिले.
''गेल्या काही वर्षांत आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलो आहोत. या संघासोबतचा माझा अनुभव अभूतपूर्व आहे. या संघाने मला प्रथम खेळाडू म्हणून आणि नंतर कर्णधार म्हणून स्वतःचे कौशल्य दाखवण्याची आणि व्यक्त होण्याची उत्तम संधी दिली आहे. एक व्यक्ती म्हणून आणि या संघाचा एक कर्णधार म्हणून माझ्यात नक्कीच प्रगती झाली आहे, असे रोहित म्हणाला.