Monday, July 15, 2024
Homeदेशकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

कर्नाटकात १० मे रोजी मतदान, तर १३ मे रोजी निकाल

नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कर्नाटकात १० मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल आणि १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. २० एप्रिलपासून नाव नोंदणी सुरू होईल. २१ ते २३ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रांचा आढावा घेतला जाणार आहे. २४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, यापूर्वी एक प्रक्रिया सुरू केली होती. याअंतर्गत १ एप्रिल रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होईल, त्यांनाही मतदान करता येणार आहे. निष्पक्ष निवडणुका घेणं हे आमचं ध्येय आहे. कर्नाटकात ५.२२ कोटी मतदार आहेत. नवीन मतदार जोडण्यावरही आमचा भर आहे. ज्यांचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. राज्यात ८० वर्षे वयोगटातील १२.१५ लाखांहून अधिक मतदार आहेत. २७६ मतदार १०० वर्षांवरील आहेत. निवडणूक आयोग त्यांच्यासाठी विशेष मदत करेल. एकूण ५.२१ कोटी मतदार असून त्यापैकी २.६२ कोटी पुरुष आणि २.५९ कोटी महिला आहेत. तसेच राज्यात एकूण ४२,७५६ ट्रान्सजेंडर आहेत, त्यापैकी ४१,००० नोंदणीकृत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ५८ हजारांहून अधिक मतदान केंद्रं असतील. त्यापैकी २८,८६६ शहरी मतदान केंद्रं असतील. १,३०० हून अधिक मतदान केंद्रं केवळ महिलांसाठी असणार आहेत. १०० बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकात यावेळीही मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत जेडीएस स्वतंत्र लढणार आहे.

कर्नाटकातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ २४ मे रोजी संपणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -