शिकागोच्या कालीबारी मंदिरात भक्तांची मांदियाळी
मुंबई (वार्ताहर) : अमेरिकेतील शिकागोच्या उपनगरात प्रथमच विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना नुकतीच करण्यात आली. भक्तीभावाने पार पडलेल्या या सोहळ्यात शिकागो परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिकागोच्या कालीबारी मंदिरात महाराष्ट्राचे आद्य दैवत, वारकरी संप्रदायाचे कुलदैवत आणि अवघ्या विश्वाची माउली असलेल्या विठू माउलीची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली.
या कार्यक्रमाचे आयोजन अवधूत दाते, सुजित कुलकर्णी, प्रसाद आधणीकर, माधव गोगावले, उर्मिला दामले, संजीव कुलकर्णी, राहुल सराफ, रवी पोळ आणि कालीबारी मंदिरातील स्वयंसेवक महाराष्ट्र मंडळातील अनेक भक्तगण व गीताराम दांगट यांनी केले होते. विठ्ठल रखुमाईची मोहक मूर्ती खास पंढरपूर येथून मागवलेली आहे. विठ्ठलाची मूर्ती ३२ किलो व रखुमाईची २९ किलो वजनाची असून या दोन्ही मूर्ती तीन फूट उंचीच्या आहेत व खास काळ्या पाषाणातून घडवलेल्या आहेत. ‘तुळसी हार गळा, कांसे पितांबर आणि श्रवणी तळपती मकरकुंडले असे वर्णन असलेल्या या सावळया सुंदर मनोहर रूपाच्या दर्शनासाठी आसावलेल्या शिकागोतील भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
मूर्ती स्थापनेनंतर माउली झांज पथकाचा कार्यक्रम, भजन, कीर्तन, विठ्ठलाची वारी, दिंडी, आरती आणि महाप्रसाद अशा दिवसभर चाललेल्या ह्या सोहळ्यात भक्तगण रमून गेले. शिकागोचे हवामान खूप बेभरवशाचे असते. सकाळी हिमवर्षाव होत होता, नंतर पाऊस आणि तापमान तर शून्य डिग्री सेल्सिअसच्या जवळपास होते. दाट ढगांनी आकाश भरून गेले होते. हवामान शास्त्रज्ञांनी दिवसभर हिमवर्षाव होईल आणि ढगाळ वातावरण राहील असे वर्तविले होते. अशा हवामानात बाहेर दिंडी वारी काढणे कठीण वाटत होते. मूर्ती स्थापना, भजन संपल्यावर माउली झांज पथक सुरू असताना लख्ख प्रकाश आणि पडलेल्या उन्हाने सर्वांनाच उभारी आली. संध्याकाळच्या उन्हात दिंडी व पालखी सुरू झाली. एरवी अशा वातावरणात जाड लोकरीचे पायमोजे, हिवाळी बूट आणि हिवाळी कोट घालूनच बाहेर पडणारे शिकागोचे रहिवासी पांडुरंगभक्त पायताण घातल्याविना विठ्ठलाच्या वारीत देहभान विसरून सामिल झाले.
यामध्ये ३ वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वयोवृद्धांचा समावेश होता. वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पुढे पुढे सरकत होते. काही तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, तर काही टाळ, चिपळ्या, झांज यांच्या तालावर झेंडे उंचावत, लेझीम आणि फुगड्या खेळण्यात दंग होत होते.
आपल्या नवीन पिढीला महाराष्ट्राची संस्कृती कळावी व विठुरायाची भक्ती अनुभवता यावी यासाठी बालगोपाळांसाठीही एक छोट्या आकाराची पालखी सजवली होती. ते चिमुकले भोई भक्तगण पालखी आपल्या खांद्यावर घेऊन चालले. दिंडी संपल्यानंतर विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.