पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला – विरोधी पक्षनेते अजित पवार
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. १९९५ पासून २०१४ पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. २०१९ ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला.
गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.