- नूतन रवींद्र बागुल
मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्यासी। संत ज्ञानोबांच्या भगिनी मुक्ताई यांच्याबद्दल हे उद्गार काढले जातात. आमच्या “दादी जानकी” यादेखील अशाच एक मुक्ताई. खऱ्या अर्थाने नभाला गवसणी घालणारी, नव्हे नव्हे, तर याच नभांगणाच्या पार वास करणाऱ्या पार ब्रह्म, विश्ववंदनीय, ज्ञान सूर्याला आपलेसे करणारी आणि विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते ते हे की संपूर्ण चराचराला, अखिल मानव जातीला प्रभू प्रेमाच्या सूत्रात बद्ध करणारी एक आगळी-वेगळी माय. तेव्हा त्याकाळी १९३७ च्या वेळी केवळ बीज होतं. आज त्याचा वटवृक्ष झालाय. काय केलं या मायने? दुःखितांचे अश्रू पुसले. त्यांना आपलेसे केले. जीवन कसं जगावं त्याबरोबर ते सफल कसं करावं (भौतिक अर्थाने नाही) त्यात अलौकिकता कशी आणावी, केवळ याच भारत भूमध्ये नाही तर विदेशातही या मायने आपली आईची माया अर्थात प्रेम पसरवलं. जापनीज, अमेरिकन, जर्मन, ऑस्ट्रेलियन, श्रीलंकन कोणीही असो, प्रत्येकालाच ती मनापासून आवडली. तिचं बोलणं म्हणजे प्रत्येकाचे जगणं झालं. अशी आर्तता असायची तिच्या शब्दांत. तितकंच माधुर्य, जिव्हाळा, सप्तरंगी इंद्रधनुषीपण सुद्धा झळकायचं तिच्या वैखरीतून. खऱ्या अर्थाने सरस्वतीच जणू तिच्या जिभेवर वास करायची.
नावाप्रमाणेच सत्यता व समर्पणता यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे दादीजी. परमात्मा शिव हेच सत्य व त्यात समर्पणाची वृत्ती म्हणजेच दादी जानकी. आयुष्य असावं तर अगदी असं. सत्यम शिवम सुंदरम् असलेल्या, संपूर्ण ब्रह्मांडाला ज्याने निर्मिले त्या जगदीश्वराला, ज्याची लीला अपरंपार आहे त्या लीलाधराच्या गुणांविषयी व कर्तव्याविषयी त्याच्याच मुलांना जागृत करणे हे महानतम कार्य. “आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल” अर्थात आपणा सर्वही जीवात्म्यांपासून तो परमपिता परमात्मा खूप काळ दूर राहिला आणि गीतेच्या वचनाप्रमाणे “यदा यदा ही धर्मस्य” तोच एकमेव त्याच्याबद्दल बोलले जाते त्वमेव माता श्च् पिता त्वमेव असा तो करावनहार प्रभू सृष्टीवर अवतरीत होतो, त्याच्याच मुलांच्या कल्याणार्थ आणि नेमके हेच शाश्वत व चिरंतन असे सत्य दादीने सर्वांना समजावून सांगितले व अशा दुरावलेल्या माय लेकरांची भेट घडवली. विषय विकारांच्या अर्थात काम, क्रोध, लोभ मोह आणि अहंकार यांच्या विषवल्लीतून सोडवून अमर संजीवनी देणाऱ्या अमृता घनाशी सर्वांनी एकरूप व्हावं, हाच एक दादीचा निश्चय आणि म्हणतातच ना निश्चय बुद्धी विजयंन्ति।
वात्सल्य, ममता, दिव्यता, संतुष्टता, अंतर्मुखता, धिरोदात्तपणा या सर्वही दैवी गुणांनी संपन्न असा हा सर्व गुणसंपन्न आत्मा. काही व्यक्ती स्वयंप्रिय असतात तर काही लोकप्रिय व काहीच प्रभुप्रिय. पण तीनही बाबतीत प्रिय असणाऱ्या आमच्या दादीजी हे या पुरुषोत्तम संगम युगातील एक नवलच. परमेश्वराच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेलं आगळं वेगळं प्रभुप्रिय फूल.
या मायचा जन्म १९१६ ला हैदराबाद सिंध प्रांतात झाला. लहानपणापासूनच ईश्वराबद्दल अत्यंत प्रीती. तदनुसारच दादीचं प्रत्येक वर्तन घडत असे. एका जुन्या हिंदी गाण्यात म्हटले आहे –
दुनिया में ऐसा कहां सबका नसीब है।
कोई कोई अपने पिया के करीब है।
खरोखरीच दादीबाबतीत ही विधाने लागू पडतात. ती जमात खरोखरच भाग्यवंतांची जे प्रभूच्या अगदी समीप असतात. वयाच्या २१व्या वर्षी या मायने स्वतःला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित केले, कारण हे केवळ एक ईश्वरी कार्य नव्हते तर एक रुद्र ज्ञान यज्ञ होता. यात स्वतःला संपूर्णतः (मन, बुद्धी, संस्कार) स्वाहा करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्या कोवळ्या नवथर वयात या मायमध्ये निर्माण व्हावी याचे कारण म्हणजे –
जनसेवेचे बांधून कंकण
त्रिभुवन सारे घेई जिंकून
अर्पून अपुले दृढ सिंहासन
नित भजतो मानवतेला
तोची आवडे देवाला।
तत्कालीन समाज व्यवस्था अशी होती की, स्त्रीला पायाखालची दासी समजले जायचे. स्त्रीला असं स्वतःचं वेगळं अस्तित्व नव्हतंच मुळी. देशही पारतंत्र्यात अडकलेला व स्त्रीही संपूर्ण परतंत्र अवस्थेत. लहानपणी पिता, तरुणपणी पती, वार्धक्यात पुत्राच्या तालावर नाचणारी ती स्त्री होती. केवळ भोगदासी म्हणूनच तिच्याकडे बघितले जायचे. एक शोभेची, करमणूक करणारी बाहुलीच बनली होती ती त्यावेळी. मानवी मनांमध्ये देखील संस्कृतीच्या ऐवजी विकृतीच जास्त जन्म घेऊ लागली होती. अनेक विध अत्याचार, जुलुम यांनी त्यावेळीचा समाज भरडून निघत होता. नैतिक अवमूल्यन होऊ लागले होते. समाज अधिकाधिक अध्ःपतित होत चालला होता. अगदी अशाच वेळी त्या बाबुलनाथाचे (अर्थात बाभळासारख्या काटेरी बनू लागलेल्या मनबुद्धीचे सुंदर सुवासिक फुलात रूपांतर करण्यासाठी)करुणाकाराचे तारण हाराचे, निराकार शिव परमात्म्याचे विश्वकल्याणासाठी सृष्टीवर अवतरण झाले. स्वयं भगवान आपले आकाश सिंहासन सोडून आपल्या लाडक्या लेकरांसाठी पृथ्वीवर येता झाला. आकाश धरित्रीचे महामीलन, तो प्रसंग काय वर्णावा! जीवा शिवाची भेट जो घेईल त्यालाच त्यातला अमृतानुभव मिळेल. असो. दादी जानकी याच अमृतानुभवात न्हाऊन निघाली. पाना था सो पा लिया कुछ भी रहा न बाकी । हे ओठातून न येईल तरच नवल! आणि सुरू झाले मग विश्व कल्याणाचे अथांग ईश्वरीय कार्य.
हा राजस्व अश्वमेध यज्ञ आपल्या विजयाचा डंका वाजवत देश-विदेशात पोहोचू लागला. दादी द्वारा झालेल्या लोकोत्तर कार्याविषयी – १९३७ – दादी जानकी ईश्वरीय कार्याशी जोडल्या गेल्या. १९३७ ते १९५१ – ब्रह्माकुमारीच्या आरोग्य केंद्राच्या प्रमुख म्हणून कार्यरत राहिल्या. ते कार्य करीत असताना ठीकठिकाणी आरोग्य उपक्रम राबवले.
वर्तमान समयी ८७ वर्षांपासून संपूर्ण विश्वात ईश्वरी सत्यज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचे कार्य प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय करत आहे. स्वयं निराकार परमात्मा पित्याने सर्व आत्म्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेले हे एकमेव विश्वविद्यालय आहे. शिव परमात्म्याने ज्ञानाचा कलश माता भगिनींच्या मस्तकावर ठेवला आहे. हे विद्यालय सर्वांसाठी खुले आहे वयाची, जाती-धर्माची, पंथसंप्रदायाची अट नाही. तसेच येथे कुठलेही शुल्क आकारले जात नाही. मूल्यधिष्टित समाज घडवण्यात या विश्वविद्यालयाचा अति मोलाचा वाटा आहे. यात आपणांस नररत्नांची खाणच पहावयास मिळेल. अमूल्य हिऱ्याची खरी किंमत ज्यावेळी श्रेष्ठ जवाहिरी आपणास सांगतो तेव्हाच येते. अशाच प्रकारचा अनुभव आपणास या विश्वविद्यालयात आल्यावर येईल. यात शिकवल्या जाणाऱ्या राजयोगात असे कोणते रसायन आहे की जे सहारा वाळवंटातही नंदनवन निर्माण करू शकते? दादी सांगायची हे जर कळावे अशी इच्छा असेल तर जरूर याचा रसास्वाद घ्या. अमृतपान करा. यात आपणास काय मिळणार नाही? जीवनातील जटिल समस्यांची उकल, मानसिक कौटुंबिक शांती ,समृद्ध समाजाचे रहस्य ,आर्थिक विवांचनेतून मुक्ती, सर्व ही बाबतीत अंतर बाह्य शुद्धी याचे समग्र दर्शन आपणास येथे घडेल कारण हे सर्वोत्तम पावन तीर्थस्थान किंवा चैतन्य शिवालय आहे.
शिवाला मुक्तेश्वर असेही म्हणतात. जो आपणा सर्वांना भवबंधनातून सोडवतो तो मुक्तेश्वर ,जो आपणास मुक्ती जीवन मुक्ती प्रदान करतो तो मुक्तेश्वर, जो आपणास गती सद्गतीचे ज्ञान देतो तो मुक्तेश्वर, जो आपणास सर्वही विकर्मांपासून मुक्त करतो तो मुक्तेश्वर ,जो आपणास या लोकात असूनही वैकुंठ रस चाखवतो तो मुक्तेश्वर ,आणि बरं का याच मुक्तेश्वराला आपलं सर्वस्व अर्थात तन-मन धन समर्पित करणारी व त्याच्या सांगितलेल्या श्रीमताचा मेरुदंड अखिल विश्वभरात घेऊन जाणारी आमची अतिप्रिय अशी ही राजयोगिनी मुक्ताई .या मुक्ताईच्या स्मृतिदिना निमित्त आमचे कोटी कोटी प्रणाम.