Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखहिमनगाचे टोक

हिमनगाचे टोक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महाराष्ट्र विधानमंडळात महाविकास आघाडीच्या काळातील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा महालेखापालांचा अहवाल पटलावर ठेवला. चौकशीची व्याप्ती १२ हजार कोटी रुपयांच्या बेहिशोबी कामांची होती. पण फडणवीस यांनी ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर तो अभी बाकी है, असेही म्हटले आहे. यावरून हा भ्रष्टाचार किती महाकाय असावा, याची कल्पना येते. हा सारा बेकायदा प्रकार उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना झाला आहे. कॅगने ज्या प्रकारांवर ठपका ठेवला आहे ते हिमनगाचे टोक आहे. जेव्हा ठाकरे स्वतःला बेस्ट मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या प्रयत्नात होते, त्याचवेळी त्यांच्या नाकाखाली त्यांचेच बगलबच्चे हा भ्रष्टाचार करत होते आणि त्याची कल्पना ठाकरे यांना नसेल असे मानणारा केवळ मूर्ख असू शकतो. महापालिकेतील भ्रष्टाचार हा किती खोलपर्यंत पसरलेला आहे, याची उदाहरणे पालिकेच्या वर्तुळात फिरले की दिसतेच. उबाठा गटाचा जीव महापालिकेत का आहे, हे लपून राहिलेले नाही. गौरी भिडे यांनी मध्यंतरी न्यायालयात याचिका दाखल करून ठाकरे कुटुंबाच्या ज्ञात उत्पन्नाच्या व्यस्त प्रमाणात असलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. अर्थात न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. पण ठाकरे गटाच्या संपत्तीप्रकरणी महाराष्ट्रात कायमच कुजबुज चालत आली आहे. थेट आरोप करण्याची हिंमत कुणी करत नव्हते.

काही पत्रकार तेव्हा अप्रत्यक्षपणे तसे आरोप करत, पण कुणाचीच उघड बोलण्याची छाती झाली नव्हती. आता तशी हिंमत लोक करू लागले आहेत. पण ती केवळ कुजबुज नव्हती, तर तिला काही आधार होता, असे मानण्याइतपत पुरावा कॅगच्या अहवालाने दिला आहे. अर्थात अजून चौकशी सुरू झालेली नाही. त्यामुळे आतापासूनच ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. पण कुणाच्या आशीर्वादाने हे बेहिशोबी प्रकार सुरू होते, याची अस्पष्ट कल्पना तर येतेच. महापालिका निवडणूक जवळ येत असताना पालिकेतील कथित भ्रष्टाचाराचे प्रकार समोर आल्याने ठाकरे गटाला हा जबरदस्त धक्का आहे.

अगोदरच शिवसेना हे नाव आणि चिन्ह गेले आहे, सर्वोच्च न्यायालयात निकाल अजून लागायचा आहे आणि आता कॅगने महापालिकेतील बेकायदा प्रकारांवर ठपका ठेवला आहे. त्यामुळे ठाकरे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. अनेक राज्यांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा आहे आणि त्यामुळे ती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पूर्वाश्रमीच्या शिवसेनेने जंग जंग पछाडले. त्यात त्यांना भाजपने जोरदार टक्कर दिली. पण आता शिवसेनेतच मोठा उठाव होऊन मोठा गट शिंदे यांच्याबरोबर गेला. महापालिकेत भ्रष्टाचाराची पायाभरणी आणि पालनपोषण ठाकरे गटानेच केले आहे, असे आरोप पूर्वीही झाले होते. पण पुरावे नव्हते किंवा कॅगनेही या प्रकरणी कधी चौकशी केली नव्हती. पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे इतकी सुरस आणि चमत्कारिक आहेत की, त्यावर एखादा मोठा ग्रंथ होऊ शकतो. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांनाच नाव बदलून पुन्हा नव्याने कंत्राट देणे, महासपालिकेतील अधिकाऱ्यांनीच कंत्राटे बनावट नावाने घेणे, रस्त्यांसाठी वापरली जाणारी खडी ही नियमानुसार जाडीची न वापरता कमी दर्जाची वापरणे आणि रस्ते पुन्हा पुन्हा खड्ड्यात जाणे आणि त्याच त्याच रस्त्यांची कामे पुन्हा निघणे, नालेसफाई ही तर भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी अलिबाबाची गुहा आहे, असे कितीतरी प्रकार आहेत. म्हणूनच शिंदे-फडणवीस सरकारने जेव्हा सहा हजार कोटी रुपयांच्या मूल्याचे काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा ठाकरे परिवारातील युवा नेत्याने इतका थयथयाट का केला, हे सहज समजू शकते. कंत्राट मिळाले आहे, असे दूरध्वनी करून सांगणाऱ्या शिपायालाही हजार रुपये काढून देण्याचा प्रघात पालिकेत होता. ज्या उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर आमची पंचवीस वर्षे युतीत सडली, असे म्हटले होते, त्याच भाजपबरोबर ठाकरे यांनी महापालिकेत मात्र सत्ताधारी म्हणून सत्ता भोगली, हे विसरता येणार नाही. पण कॅगने उघड केलेले अवैध प्रकार हे महाविकास आघाडीच्या काळातील आहेत. त्यामुळे त्यांची तपशीलवार चौकशी केली गेली, तर महापालिकेतील अवैध प्रकारांचा लेखाजोखा समोर येईलच.

किरीट सोमय्या यांना ठाकरे गटाच्या लोकांनी तोतला तोतला म्हणून हिणवले असले तरीही त्यांनी महापालिका भ्रष्टाचारातील डॉन मातोश्रीत बसला आहे, असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडीच्या काळात कोरोनामुळे सारे व्यवहार बंद होते. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी प्रकार कसे झाले, याचीही चौकशी करण्यात आली पाहिजे. कारण त्यावरही कॅगने प्रकाश टाकला आहे. अगदी मातोश्रीच्या नावावर पन्नास लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीत असल्याचे सांगितले जाते. कसलाही मोठ्या उत्पन्नाचा स्त्रोत नसताना ठाकरे कुटुंबाची रहाणी इतकी अालिशान कशी, हा सवाल कित्येक वर्षांपासून रहिवाशांच्या मनात आहे. त्याला आता वाचा फुटली आहे आणि लोक उघड बोलू लागले आहेत. आता सारे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -