- सेवाव्रती: शिबानी जोशी
विद्यार्थी विकास हेच आमचे ध्येय या उद्देशाला अनुसरून पनवेल येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय गेले २५ वर्षं ज्ञानदानाचे काम करत आहे. इ.स. १८६० साली राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील सुमारे एकशेसाठ वर्षांची प्रदीर्घ वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुणे आणि आजूबाजूच्या परिसराबरोबरच, ‘एज्युकेशन हब म्हणून’ नव्याने विकसित होत असलेल्या नव्या मुंबईत संस्थेचे आद्य संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृती वास्तुरूपाने चिरंतन ठेवण्यासाठी नवीन पनवेल येथे २१ जून १९९९ मध्ये विद्यालयाची स्थापना केली.
पनवेलनजीक शिरढोण हे आद्यक्रांतिवीरांचे जन्मस्थळ असल्यामुळे त्यांच्या नावाने राष्ट्रीय विचारांचे शिक्षण देणारी शाळा पनवेलमध्ये असावी, असे संघ कार्यकर्त्यांनाही वाटत होते. सिडकोची जागा मिळाल्यानंतर पनवेलमध्ये वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने शाळेचा प्रारंभ झाला. पुढच्या वर्षी शाळा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. आज सतराशे विद्यार्थी मराठी – सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. केवळ शालेय पाठ्यपुस्तकातील धडे न गिरवता मुलांचा सांस्कृतिक व सामाजिक विकास व्हावा याकरिता विविध उपक्रम संस्था व विद्यालयामार्फत राबवले जातात. अवघ्या ३५० विद्यार्थ्यांसह आपल्या वाटचालीस सुरुवात करत अल्पावधीत विद्यालयाने परिसरात नावलौकिक मिळवला व विद्यार्थी संख्येचा आलेख चढता राखला आहे. काळाची पावले ओळखून संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सेमी इंग्रजी माध्यम, इंग्रजी संभाषण कौशल्य विकसन वर्ग, संस्कृत संभाषण वर्ग, डिजिटल क्लासरूम, शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यास वर्ग व क्रीडावर्धिनी यासारखे अनेक उत्तम व विद्यार्थी कल्याणकारी उपक्रम विद्यालयात यशस्वीपणे सुरू आहेत. गेली सतरा वर्षं शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक व सहशालेय घटक त्यांच्या समाजभिमुखतेमुळे विद्यालयाचा संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगतीचा आलेख चढता राहील व भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे राष्ट्र मन येथेच घडेल यासाठी खूपच नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यालयात हाती घेतले जातात. त्यातलाच एक उपक्रम आहे बनी टमटोला हा काय शब्द आहे? असा तुम्हाला प्रश्न पडेल.
३ ते ६ वयोगटातील मूल शालेय जीवनाला सुरुवात करताना पर्यावरणातील बदल, आधुनिक तंत्रज्ञान व त्यांचे ज्ञान व निरीक्षण याविषयी आत्मविश्वास मिळवून देणारा बनी टमटोला उपक्रम गेली ७ वर्षे यशस्वीरीत्या सुरू आहे. स्काऊट गाईड आणि कब बुलबुल यावर हा उपक्रम आधारित आहे. मुलांच्या डोक्यात काही कोंबणे हे शिक्षण नव्हे. मूल जन्माला येताना ज्या क्षमता बरोबर घेऊन येते त्या क्षमतांचा विकास करणे हे खरे प्राथमिक शिक्षण होय. हा विकास साधण्यासाठी विद्यालयातील प्राथमिक स्तरावर अनेक कृतिशील अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. हा विचार फार कमी प्राथमिक शाळा करताना दिसतात. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती मिळविण्याचा अनुभव देण्यासाठी क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. पालकांचा सहभाग प्रत्येक वेळी घेतला जातो हे शाळेचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. पालकांना त्याच्या बालपणाची आठवण करून देण्यासाठी पालकशाळा हा उपक्रम आयोजित केला जातो. पर्यावरणपूरक उपक्रमांत शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनविणे, कागदी पिशव्या बनविणे, दहीहंडी, नागपंचमी, सामाजिक भोंडला, वृक्षरक्षाबंधन, प्रदूषणविरहीत दिवाळी यांसारख्या पर्यावरणस्नेही उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. वर्ग तुकड्यांना फुलांची, पर्वतांची, थोर महापुरुषांची प्रेरणादायी नावे देण्याचा अभिनव कल्पनेमुळे मुलांच्या डोळ्यांसमोर सतत ही नावे राहतात. विद्यार्थीच्या लेखन कौशल्याला वाव देण्यासाठी मुक्तांगण व स्पंदन हे वार्षिक अंक प्रकाशित केले जातात. शाळेला प्रशस्त क्रीडांगण आहे. ह्या क्रीडांगणाचा शाळा सुटल्यावर वापर विद्यार्थ्यांनी करावा ह्यासाठी संस्थेमार्फत क्रीडावर्धिनी आहे. ह्यात खो-खो, कबड्डी, जिम्नॅस्टिक, तायकांदो ह्यात देशी-विदेशी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.ज्ञानवर्धिनी MTS, होमी भाभा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र अशी अद्ययावत यंत्रणा मुलांच्या विकासासाठी उपलब्ध आहे. शिक्षणाचा दर्जा राखला जातोच त्याशिवाय उत्तम भौतिक सुविधा ही इथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते.
डिजिटल वर्गखोल्या, मिनी सायन्स सेंटर, अत्याधुनिक प्रयोगशाळा, आज-काल अभावाने शाळांना असणारे भव्य क्रीडांगण, संपन्न ग्रंथालय शाळेला लाभले आहे. व्यवस्थापनाचा आणखी एक निर्णय म्हणजे शाळेचा संपूर्ण वातानुकूलित हाॅल कधीही लग्न, मुंजीसाठी दिला जात नाही, तर केवळ सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, संमलने ह्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. विद्यालयाची पुढील सात वर्षांतील वाटचालीचे नियोजन ‘भवितव्य लेखातून’ विद्यालयाने तयार केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणनुसार राष्ट्र सर्मपित विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालय सज्ज आहे. भविष्यात जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम पिढी घडविण्यासाठी विद्यालय कटिबद्ध आहे.