Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमी'आपल्या बापाच्या विचारांशी गद्दारी करणा-या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार...

‘आपल्या बापाच्या विचारांशी गद्दारी करणा-या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही’

मालेगावातील सभेवरून रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

मुंबई : आपल्या बापाच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली, ते उद्धव ठाकरे इतरांना गद्दार कसे म्हणू शकतात? बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्ष केला. मात्र, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री बनणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही”, अशी जोरदार टीका रामदास कदम यांनी केली आहे.

मालेगाव येथील सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपावर टीका केली होती. तसेच भाजपा मिंध्यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढणार असेल तर ते त्यांनी ते जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

“उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेल्याने ज्या ४० आमदारांमुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्या ४० आमदारांना कसे बदनाम करता येईल, याचा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हाती घेतला आहे. ते आम्हाला गद्दार म्हणतात, पण गद्दार नेमके कोण? याचा निर्णय महाराष्ट्र करेल. मुळात गद्दारीचा शिक्का खरे तर उद्धव ठाकरे यांच्या कपाळावर बसला आहे, तो आता कधीही पुसला जाणार नाही. भाड्याची माणसं आणून ते बेंबीच्या देठापासून ओरडले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. भगवा झेंडा हातात घेण्याचा नैतिक अधिकार आता उद्धव ठाकरेंना नाही, तो अधिकार आता फक्त आम्हाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कितीही ओरडले, तरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही”, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “काल आमदार सुहास कांदे यांनी दोन कंत्राटदारांची नावे सांगितली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून खोके घेतल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी नार्को चाचणी करण्याचे आव्हानही दिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे त्यांचे आव्हान स्वीकारणार नाही. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे हुकूमशहा झाले, त्यांनी मिठाईच्या खोक्यांचे दुकान थाटले. याचे साक्षीदार आम्ही आहोत”, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना रामदास कदम म्हणाले की, “संजय राऊतांवर मला काहीही बोलायचे नाही. त्यांच्या मताला कोणीही किंमत देत नाही. ते निवडणूक आयोगाचा बाप काढतात, कोणावरही आरोप करतात, ते विधिमंडळाला चोरमंडळ म्हणतात. खरे तर महाराष्ट्र त्यांना कंटाळला आहे, त्यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -