
मुंबई : अंधेरी परिसरात साकीनाका येथील दुकानाला लागलेल्या आगीत राकेश गुप्ता आणि गणेश देवासी या दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते.
आग लागली तेव्हा दुकानात ११ कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले तर दोघे अडकले होते. यात या दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
साकीनाका भागात आज पहाटे दोनच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत हार्डवेअरचे आणि त्याच्या शेजारचे दुकान जळून खाक झाले. ही दुकाने साकीनाका मेट्रो स्टेशनच्या जवळच होती. राज श्री असे या दुकानाचं नाव आहे. ही आग एवढी भीषण होती की दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. यानंतर पुन्हा काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.