टी-२० क्रिकेटमधील बनला सर्वाधिक धावांचा सामना
सेंच्युरियन्स (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिय यांच्यात रविवारी झालेल्या टी-२० सामन्याने अनेक विक्रम मोडीत काढले. दक्षिण आफ्रिका हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.
रविवारी सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २५९ या सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. तसेच या सामन्यात एकूण ५१७ धावा झाल्या. हा सामना आता टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा सामना बनला आहे. यापूर्वी पीएसएल २०२३ मध्ये मुलतान सुलतान्स विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यात ५१५ धावा झाल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या केली. यापूर्वी या फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक २४१ धावा केल्या होत्या. या सामन्यात वेस्ट इंडिजनेही त्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २५८ ही सर्वात मोठी धावसंख्या केली. याआधी विंडीज संघाने टी-२० मध्ये सर्वाधिक २४५ धावा केल्या होत्या.
या सामन्यात टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजेच ८१ इतके चौकार लगावले गेले. या सामन्यात एकूण ३५ षटकार मारले गेले, जे टी-२० सामन्यातील सर्वाधिक आहे. विंडीजच्या फलंदाजांनी २२ षटकार ठोकले. हा विक्रम एका संघाने टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. क्विंटन डिकॉकने अवघ्या १५ चेंडूंत ५० धावा पूर्ण केल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा स्वतःचा विक्रम मोडला.