नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस झपाट्याने पसरत आहे. देशात सुमारे दोन हजार नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा १० हजार ३०० च्या पुढे गेला आहे. देशात आज १८०५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे १५०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सातत्याने वाढत्या कोरोनाबाधितांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
देशात गेल्या २४ तासांत ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच मागील २४ तासांत १८०५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर ०.०२ टक्के आहे. देशात
कोविड विषाणू संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी आजाराला लोक बळी पडत आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. H3N2 फ्लूच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे.
H3N2 आणि कोरोना हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यांसह दोन्ही व्हायरसची लक्षणे सारखी आहेत. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीत योग्य उपचार घ्या आणि खबरदारी बाळगा.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचार पद्धतीबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. बॅक्टेरिअल इन्फेक्शन नसेल तर अँटीबायोटीक औषधं देणं टाळण्यास सांगितलं आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाच्या रूग्णांच्या उपचारांसाठी ‘लोपीनाविर-रिटोनावीर’, ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’, ‘आयव्हरमेक्टिन’, ‘मोलनुपिराविर’, ‘फॅविपिरावीर’, ‘अझिथ्रोमायसिन’ आणि ‘डॉक्सीसायक्लिन’ यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.