
बीसीसीआयची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला बढती मिळाली असून त्यांचा ‘ए+’ श्रेणीत समावेश करण्यात आला. तर लोकेश राहुलच्या ग्रेडमध्ये घसरण झाली असून त्याचा ‘बी’ श्रेणीत समावेश केला आहे. कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी ‘ए+’ ग्रेडमधील आपले स्थान कायम ठेवले आहे. बीसीसीआयने २०२२-२३ सीझनसाठी भारतीय खेळाडूंची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली. या लिस्टमध्ये २६ खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
‘ए+’ श्रेणीत समावेश केलेल्या खेळाडूंची संघ्या चारवर पोहचली आहे. या चार खेळाडूंना ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत ७ कोटी रुपयांचे मानधन दिले जाईल. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनाही ग्रेडमध्ये बढती मिळाली आहे. अक्षर पटेल आधी ‘बी’ ग्रेडमध्ये होता आणि हार्दिक पंड्या ‘सी’ ग्रेडमध्ये होता, पण आता दोघांनाही ‘ए’ ग्रेडमध्ये समाविष्ट केले आहेत. हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांचा ‘ए’ ग्रेडमध्ये समावेश आहे. ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळणार आहेत.
चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे खेळाडू ‘बी’ श्रेणीत आहेत. यंदा या लिस्टमध्ये शुभमन गिललाही बढती मिळाली आहे. ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना प्रत्येकी ३ कोटी रुपये मिळणार आहेत. उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हे ‘सी’ श्रेणीचा भाग आहेत. त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये मिळतील.