कल्याण: उन्हाळ्यात लागलेली तहान शमवण्यासाठी प्रत्येकाला विकतचे पाणी परवडत नाही. अशावेळी जागोजागी पाणपोई असल्यास वाटसरूंचा प्रवास सुखकर होतो. याच हेतूने माणूसकी सेवा संघामार्फत रविवारी कल्याणमध्ये तीन ठिकाणी पाणपोई बसवण्यात आल्या आहेत.
बिर्ला कॉलेज रोडवरील साईश्रद्धा हॉटेल समोर, लॉर्ड शिवा सोसायटी समोर, तसेच झुलेलाल चौक येथील कायस्थ फूड सेंटर जवळ या तीन पाणपोई बसवण्यात आल्या आहेत. या आधी खडकपाडा, साईबाबा मंदिर, म्हसोबा मैदान, मैत्रिकुल आश्रम येथेही संघातर्फे पाणपोई बसवण्यात आल्या होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त पाणपोई स्थापित करून त्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना व्हावा, असे या संघाचे उद्दिष्ट आहे.