Thursday, October 10, 2024
Homeक्रीडाIPL 2024आयपीएलबाबत 'या' दुर्मिळ गोष्टी, तुम्हाला माहित आहेत का?

आयपीएलबाबत ‘या’ दुर्मिळ गोष्टी, तुम्हाला माहित आहेत का?

इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलचा थरार नव्या नियमांसह येत्या ३१ मार्चपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने आयपीएलसंबंधी काही दुर्मिळ गोष्टी…

  • आतापर्यंत भारताच्या केवळ दोन दिग्गज खेळाडूंनी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्कार म्हणजे एमव्हीपी पुरस्कार आयपीएलमध्ये जिंकला आहे. यात एक आहे अर्थातच आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. २०१० च्या आयपीएल मोसमात हा किताब जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. त्या मोसमात मास्टर ब्लास्टरने मुंबई इंडियन्स या संघासाठी तब्बल ६१८ धावा केल्या. त्याच स्पर्धेत त्याने ऑरेंज कॅपचाही मान पटकावला होता.
  • यानंतर दुसरा हा किताब पटकावणारा खेळाडू ठरला विद्यमान फलंदाजीचा झंझावात विराट कोहली. आठव्या आयपीएल मोसमात कोहलीने तब्बल ९७३ धावा फटकावल्या. या स्पर्धेत हा किताब जिंकणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहेत. त्यांच्या शेन वॉटसनने दोन वेळा, तर अॅडम गिलख्रिस्ट आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी एक वेळा हा किताब जिंकला आहे.
  • २०१८ च्या आयपीएलमध्ये प्रत्येकी एका चेंडूची किंमत ठरली २१ लाख रुपये. ती कशी हे पहा. त्या मोसमात स्टार इंडिया नेटवर्कला आयपीएल सामन्यांचे प्रसारणाचे हक्क १६,३४७ कोटी रुपयांना विकण्यात आले. यामुळे प्रत्येकी एका चेंडूची किंमत ठरली २१ लाख रुपये.
  • पियुष चावला हा आपल्याकडे सर्वात कमी गाजावाजा झालेला फिरकी गोलंदाज आहे. पण त्याच्या नावावर आयपीएलमध्ये एक दुर्मिळ विक्रम आहे. चावलाने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना ३८६ षटकांत एकही नोबॉल टाकला नाही. हा अद्भूत रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. सलग आठ वर्षे त्याने अत्यंत शिस्तबद्ध रीतीने गोलंदाजी केली त्याचे हे उदाहरण आहे.
  • १०० हून अधिक सामने एकाच संघाकडून खेळणारे फक्त दोन खेळाडू आतापर्यंत झाले. २००८ पासून सुरू झालेली ही स्पर्धा आता इतकी वर्षे प्रवास करून आली आहे. पण इतक्या वर्षांत अनेक खेळाडू या संघाकडून त्या संघाकडे गेले. पण दोन खेळाडू असे आहेत की त्यांनी एकाच संघाकडून शंभरहून अधिक सामने खेळले आहेत. कायरन पोलार्ड आणि एबी डिव्हिलियर्स हे खेळाडू आहेत. डिव्हिलियर्सने सुरूवात दिल्लीकडून केली, पण त्याने २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्यास सुरूवात केली आणि १०१ सामने त्याने त्या संघाकड़ून खेळले आहेत. तर दुसरा आहे पोलार्ड ज्याने मुंबई इंडियन्सकडून १२३ सामने सुरूवातीपासूनच खेळले आहेत.
  • विराट कोहली हा जेव्हा संपूर्ण फॉर्ममध्ये असतो, तेव्हा तो प्रतिस्पर्धी संघाला भयपटासारखा वाटतो. त्याचेच प्रत्यंतर आहे की तीन द्विशतकी भागीदारीत तो एक फलंदाज राहिला आहे. प्रथम २०१२ च्या स्पर्धेत त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरोधात खेळताना ख्रिस गेलबरोबर मिळून २०४ धावांची भागीदारी रचली. तर २०१५ मध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरोधात एबी डिव्हिलियर्सबरोबर मिळून २१५ धावांची भागीदारी रचली. २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरोधात त्याने पुन्हा डिव्हिलियर्सबरोबर खेळताना सर्वोच्च म्हणजे २२९ धावांची भागीदारी केली.
  • हरभजनसिंग हा चांगला तडाखेबंद फलंदाज म्हणूनही लौकिक मिळवून आहे. पण त्याच्या नावावर आयपीएलमध्ये एक नकोसा विक्रमही आहे. तो मुंबई इंडियन्सकडून नऊ मोसम खेळला आणि नंतर तो चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला. १३ डावांत त्याला भोपळाही फोडता आला नाही.
  • एकाच स्पर्धेत सर्वोच्च आणि नीचांकी धावसंख्या नोंदवण्याची कामगिरी एकाच संघाने केली आहे. तो आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. आरसीबी हा संघ तुफान फटकेबाजी करणाऱ्या खेळांडूंनी भरलेला आहे. २०१३ मध्ये आरसीबीने पुणे वॉरियर्सविरोधात २६३ अशी विशाल धावसंख्या रचली. त्या डावात ख्रिस गेलने तडाखेबंद १७५ धावा फटकावल्या. २०१७ च्या आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सने याच संघाला फक्त ४९ धावांत गुंडाळले. त्यात केदार जाधवने सर्वोच्च धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -