मुंबई : देशासह राज्यातही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबई महापालिकेच्या दोन रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये १,८५० आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ३० खाटा आहेत. तसेच जेव्हा-जेव्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा आवश्यकतेनुसार रुग्णालयातील बेडची संख्या आणखी वाढवण्याच येणार आहे. तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तसेच उपकरणे देखील वाढविली जातील.
दरम्यान, कोरोना आणि इन्फ्लूएंझा या दुहेरी संसर्गाकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्या. मास्क वापर, सोशल डिस्टंसिंग पाळा, शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
मुंबईत १२३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह
मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत मुंबईत १२३ नवीन प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत ४३ रुग्ण रुग्णालयात दाखल असून २१ रुग्ण व्हेंटिलटरवर आहेत.
मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५००च्या पुढे गेली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात रविवारी एकूण १९५६ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. राज्यात शनिवारी ४३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.