गुढीपाडव्यानंतर मुंबईत विक्रमी मालमत्ता नोंदणी
मुंबई: कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली आहे. गत वर्षी बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस आले. त्यानंतर यंदाही नवीन वर्षात घर खरेदीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मराठी नवीन वर्षाचा शुभारंभ यंदा तर खास झाला असून गुढीपाडव्या नंतरच्या ४८ तासांत मुंबईत तब्बल १ हजार ९१० मालमत्तांची नोंदणी झाली आहे. यातून सरकारच्या तिजोरीत मालमत्ता नोंदणीतून २०४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
मायानगरीत हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्यकाचे असते. यासाठी परवडणाऱ्या किंमतीत सर्व सुविधांयुक्त परिसरातील घर खरेदीला ग्राहक प्राधान्य देतात. यातच मुंबईत मेट्रो, समुद्री मार्ग, उड्डाणपूल यासह विविध पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याने घर खरेदीदार उपनगरात घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण घर खरेदी करणे शुभ समजतात. अनेक लोक समृद्धीचे लक्षण आणि शुभ चिन्ह म्हणून सोने, घरे इत्यादीसारख्या उच्च-मूल्याची वस्तू खरेदी करतात. घर खरेदीदार गुढीपाडव्याला त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यास उत्सुक असतात. हीच संधी ओळखून विकासक घर खरेदीसाठी विविध सवलती जाहीर करतात.
२२ मार्च रोजी गुढीपाडवा होता. हा दिवस घर खरेदीसाठी शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला नोंदणी विभागातील कामकाज बंद असल्यामुळे मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी विक्रमी मालमत्ता नोंदणी झाली. गुढीपाडव्या नंतरच्या ४८ तासांत मुंबईत तब्बल १ हजार ९१० मालमत्तांची नोंदणी झाली आहे. यातून सरकारच्या तिजोरीत मालमत्ता नोंदणीतून २०४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
घर खरेदीदार गुढीपाडव्याला त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यास उत्सुक असतात. त्यामुळे यंदा विकासकांनी विविध आकर्षक ऑफर आणि सवलती देऊ केल्या होत्या. ग्राहकांनी या सवलतींचा लाभ घेऊन खरेदी केल्याचे पाहण्यास मिळाले, असे नरेडको संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप रुणवाल यांनी सांगितले.
मुद्रांक शुल्काचे दर वाढवू नये
सरकार एप्रिलपासून रेडी रेकनर आणि मुद्रांक शुल्काचे दर वाढविण्याचा विचार करत आहे. जर दर वाढले तर सध्या मजबूत दिसत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रावर त्याचा खूप वाईट परिणाम होईल. अशा परिस्थितीत सरकारने दरात कोणतीही वाढ करू नये. मुद्रांक शुल्काच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील, असे रुणवाल म्हणाले.
मुंबईत गेल्या तीन महिन्यात झालेली घर खरेदी
– जानेवारी – ९००१
– फेब्रुवारी – ९६८४
– मार्च – (आजपर्यंत) – ९६७०