Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजरामो राजमणी

रामो राजमणी

  • स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील

खरं तर एखादं भजन असो किंवा गजर रामनामाशिवाय तो अपूर्ण भासून जातो. रामाचे नाम मुखी ठेवून म्हटलेलं भजन तल्लीन करणारं ठरतं. गदिमांच्या गीतरामायणाची आतुरता तर अवघ्या जनतेला लागलेली असायची आकाशवाणीवरून ऐकण्यासाठी. गुढीपाडवा सुरू झाला की घराघरांत घुमणारे गीतरामायणाचे सूर दुमदुमून जायचे. रामायणातून जसा लोकांना राम कळला तशी सीतेची सहनशीलताही कळली. रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम… म्हणताना जो तो तल्लीन होऊन जातो. राम जन्मापासूनच्या गीतांचा आढावा घेतला तर ‘राम जन्मला गं सखे… राम जन्मला या गीतातून प्रकट केलेल्या आनंदमयी वातावरणाचा आजही भास होऊन जातो. त्यावेळच्या माहोलाचं यथार्थ वर्णन दृष्टीसमोर येतं. ‘कौसल्येचा राम’मधून आईच्या वात्सल्याची जाणीव होऊन जाते. प्रभू श्रीरामाचं आयुष्य उलगडवणारी अनेक गीते मनावर बिंबणारी आहेत.

एक मुलगा, बंधू, पती म्हणून रामाचं आचरण पाहता आजच्या पिढीसमोर आदर्शवत आहे. आयुष्यात काही राम उरला नाही असं म्हणताना आयुष्याचं सारं ‘सार’ संपलं असा त्याचा अर्थ होऊन जातो. राम आणि लक्ष्मणाचं बंधुप्रेमाचं नातं आजही अजरामर आहे. हनुमंताच्या भक्तीचा महिमा आजही गाजतोच आहे आणि सीतेचा हट्ट जो तिने सोन्याच्या हरणासाठी केलेला तोही सगळ्यांसमोर उलगडतो.
एक पती म्हणून पत्नीने केलेला हट्ट पूर्ण करण्याचा प्रभू श्रीरामानी केलेला यत्न खऱ्या अर्थाने आयुष्यातील निर्णय चुकविणारा ठरला का? पत्नीच्या हट्टापुढे सारं काही व्यर्थ जरी ठरले तरी ते सोन्याचे मृग आणण्यासाठी रामाने त्या हरणापाठोपाठ घेतलेली धाव आणि घडलेला अनर्थ हा संपूर्ण रामायणाला कलाटणी देणारा ठरला.

आयुष्यात रावण आला की काय होते त्याची ही प्रचितीच जणू. आयुष्यात राम असणे म्हणजे सन्मार्गाचं प्रतीक तर रावण म्हणजे दु:श्नीती दर्शवणारा… कलंक आणि कलहाचं प्रतीक. सीतेने केलेला हट्ट स्वाभाविक होता. सोन्याचं हरीण पाहिल्यावर ते आपल्याला हवं हा स्त्री हट्ट आपसुकच स्त्री सुलभतेचे प्रतीक दर्शवतो. रामासोबत वनवासाला येताना सीतामाईने रामाला आयुष्यभर साथ देण्याचं वचन निभावलेले दिसून येते. रामासोबत अनवाणी चालताना, वावरताना पायाला लागणारे काटे, सारं राजऐश्वर्य सोडून तिने पतीला दिलेली साथ ही आजच्या पिढीसमोरही आदर्शवत मानावी लागेल. जिथे पती तिथे पत्नी ही साथ निभावताना तिचा एक हट्ट मात्र साऱ्या रामायणाची कथा पुढे सरकावणारा ठरलेला दिसून येतो. प्रभू श्रीरामांनाही सीतेच्या या हट्टापुढे पुढील संकटाची चाहुल लागली नसावी का? पण पत्नीप्रेम आणि तिची साथ यापुढे हा हट्ट क्षुल्लकच तसा काहीसा. पुढे जे काही घडलं ते रामाच्या आयुष्यातही दु:ख आणणारंच होतं. आधीच वनवास आणि त्यात सीतेच्या शोधासाठी रामाची आर्त हाक ही काळीज पिळवटणारीच.

मोहाचं प्रतीक सोन्याचं हरीण हे आजच्या पिढीसमोर मोह मायेपासून दूर राहण्याचे संकेत देऊन जातं. लहानपणी राम कळला तो भिंतीवरल्या आजोबांनी साकारलेल्या चित्रातून. त्यानंतर रामायणाच्या कथा, सीतेने केलेला सोन्याच्या हरणासाठीचा हट्ट, राम-रावण युद्ध आदी घटना रामायणाच्या माध्यमातून उलगडत गेल्या. पण रामाच्या इतक्याच कथांतून राम कळतो असे नाही, तर प्रभू श्रीरामाची वचनबद्धता, बंधू प्रेम, प्रजेवरचे प्रेम पाहता रामाविषयीच्या अनेक कथांची गोडी लागली. पण सीतेच्या नशिबी आलेला वनवास, तिने दिलेली अग्निपरीक्षा या गोष्टी कितीतरी मनावर घाव घालणाऱ्या ठरल्या. एक स्त्री एवढ्या मोठ्या दिव्याला सामोरी जाऊन स्वत:ला सिद्ध करते. यातून सीतामाईच्याही अंत:करणाचा ठाव घेता येतो.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -