Wednesday, July 17, 2024

दृष्टिकोन

  • गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

बाल्यावस्थेपासून तारुण्यावस्थेपर्यंत आपली बालकाची होणारी आंतरिक वाढ ही सर्वस्वी पालकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. पालकांचा दृष्टिकोन मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवीत असतो.

विद्यार्थी प्रगतिपुस्तकात गुण वाढवितात. एका सामंजस्य पालकांचा अनुभव : अक्षयाने प्रगतिपुस्तकात एका विषयात गुणात केलेला बदल शिक्षक असलेल्या वडिलांच्या लक्षात आले. प्रथम काहीही न बोलता, न रागावता, न अपमान करता थोड्या वेळाने सही करतो असे सांगितले. घरात कोणी नसताना वडिलांनी तिच्याशी संवाद साधला. अक्षयाने तिची चूक कबूल केली. तुम्ही मला माराल किंवा घरात घेणार नाही, या भीतीने एका विषयात प्रगतिपुस्तकात मी खाडाखोड केली. मी तिला म्हणालो, ‘अक्षया तू सर्व विषयात नापास झाली तरी चालेल, पण वागण्यात आणि वर्तणुकीत कधीही नापास होऊ नकोस. त्यानंतर शाळेत आणि अभ्यासातही एक चांगली मुलगी म्हणून सर्वश्रुत झाली. आपली मुले वाढताना आणि वाढविताना प्रथम स्वतःचा दृष्टिकोन विकसित करावा.

एकदा एडिसनच्या फिलियामेंट फॅक्टरीच्या आगीत सर्व रेकॉर्ड साहित्य जळून खाक झाले. सर्वांच्या प्रतिक्रया, अरेरे… फार वाईट झाले. पण, एडिसनची प्रतिक्रिया होती, “Now I have burned all my mistakes “(ज्या चुका झाल्या त्या जळून गेल्या). पुन्हा जिद्दीने कामाला लागून पहिल्यापेक्षा उत्तम फॅक्टरी त्याने उभी केली.

शंभर वर्षांपुढचे प्रश्न ज्याला दिसतात तो द्रष्टा. महात्मा जोतिबा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी ‘शेतकऱ्याचे आसूड आणि गुलामगिरी’ या पुस्तकातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. आजही तेच प्रश्न उपस्थित आहेत. त्यांच्या द्रष्ट्या दृष्टिकोनाला काय म्हणावे?

पिढीजात चालत आलेल्या अनेक दृष्टिकोनाचा दुसऱ्या बाजूने विचारच केला जात नाही. जेव्हा घरात तरुणपिढी आक्षेप घेते त्यावेळी किंवा त्यानंतर आपण विचार करतो नि आपल्या दृष्टिकोनात बदल करतो. उदा. संतुरवादक पंडित उल्हास बापट यांचा नवा दृष्टिकोन : एकदा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सात-साडेसातच्या सुमारास गुरखा पगार न्यायला आला. मी त्याला पगार द्यायला लागलो तोच आतून आवाज आला, ‘अरे त्याला उद्या सकाळी पगार न्यायला बोलावं. दिवे लागणीच्या वेळी तिन्हीसांजेला लक्ष्मी घरात येते तेव्हा घरातील लक्ष्मी बाहेर जाता कामा नये.’ मी विचारले, ‘तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात आली तर चालते मग ती गुराख्याच्या घरात लक्ष्मी येतेय! ’

कर्नल सँडर्स वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झाले. ते कोणी मोठे श्रीमंत नव्हते की विशेष अशी हावर्ड विश्व विद्यालयाची मोठी पदवी नव्हती. चिकन बनविण्याची विशिष्ट पाककृती त्यांना ठाऊक होती. तळलेली कोंबडी बाहेरून कुरकुरीत पण आतून लुसलुशीत व रंगतदार असायची. साठी उलटलेल्या कर्नलनी जवळजवळ १००६ हॉटेलच्या पायऱ्या झिजविल्या, पण हार मानली नाही. दोन वर्षांनी एका हॉटेल मालकांनी त्या पाककृतीचा प्रयोग आपल्या हॉटेलमध्ये करून पहिला. त्यानंतर आज जे कर्नल सँडर्स यांचे केंटकी चिकन जगप्रसिद्ध आहे.’( KFC) मी यशस्वी होणारच हा त्याचा ‘जीवनविषयक दृष्टिकोन’ म्हणून ते यशस्वी झाले. ‘शक्य आहे’ हा दृष्टिकोन यश खेचून आणतो. ‘शक्य नाही’ हा दृष्टिकोन अपयश मिळवितो. सर विस्टन चर्चिल तरुणांना प्रेरित करताना सांगतात, कधी हार मानू नका.

नेहमीचे पाहण्यातले उदाहरण, घरच्या बिकट परिस्थितीत एक मुलगा घराबाहेर पडतो, झगडतो नि स्वतःच्या पायावर कर्तृत्वाने उभा राहतो. त्याच परिस्थितीत दुसरा मुलगा आळशीपणाने, नकारत्मकतेने, नशिबाला, परिस्थितीला, पालकांना दोष देत इतरांशी तुलना करीत बसतो. एकच घटना दोन भिन्न दृष्टिकोन अनुभवतो. भिन्न दृष्टिकोनाची माणसे एकाच घरात? दृष्टिकोन बदलता येईल असा चष्मा नाही.

अनेक प्रसिद्ध लोकांचे सुरुवातीचे दिवस फार कष्टाचे, धडपडीचे गेलेले असतात. हार न मानता, मानहानी, नकार पचवित ते काम करतात. ज्यावेळी त्याचे नाव होते, त्यावेळी एका रात्रीत चित्र बदलते. हा फरक, अनुभवलेले कॅमेरामन, दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ‘धडपडीच्या दिवसात एका चित्रपटाच्या वेळी क्लॅप देताना चुकलो. माझ्यावर शिव्यांचा भडीमार झाला… मला सेटवरून हाकलून दिलं गेलं… पुढचे पंधरा दिवस मी रोज सेटवर जायचो नि ते मला बाहेर काढायचे. रोज रात्री रडायचो. आईचे शब्द आठवायचे, मी इंजिनीअर होतो तरी शिव्या खात होतो. कारण मला कॅमेरामन, दिग्दर्शक व्हायचे होते.’ ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या त्या रात्रीनंतर युनिटमधल्या सर्वांचा माझ्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक पडला. डोंबिवली फास्ट चित्रपटाने मला खूप दिले. मुख्यतः कॅमेरामनला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या बिना तक्रार मिळू लागल्या.

अमृता सुभाष एक संपन्न अभिनेत्री, थोड्या नकारात्मक विचारातून ‘अवघाचि संसार’ या दैनंदिन मालिकेत त्यांची कामाला सुरुवात झाली. त्यावेळी दुबे सरांनी मला एक वेगळा दृष्टिकोन दिला, ‘तू एक अभिनेत्री आहेस नि तुला रोज १५ तास कॅमेऱ्याच्या समोर जाण्याची संधी मिळते. तेव्हा १५व्या तासाला देखील तितकाच सशक्त अभिनय केला गेला पाहिजे, हा सुंदर अॅक्टिंग एक्सझरसाइज आहे.
वरील अनेक उदा. दृष्टिकोनाची व्यापकता लक्षात येते; सरते शेवटी, आपल्या आयुष्यातील घटनांकडे तीन प्रमुख दृष्टिकोनातून पाहिले जाते.

  • पहिला दृष्टिकोन : माणसाचं जीवन नियती ठरविते. आपण म्हणतो, ‘जे प्राक्तनात असते तेवढेच मिळते.
  • दुसरा दृष्टिकोन : आयुष्याला वळण लावणारे योगायोग हेच खरे. योगायोगाने माणसं भेटतात.
  • तिसरा दृष्टिकोन : आपल्या आयुष्यातील संभवनीय आणि असंभवनीय घटनांकडे कसे पाहायचे, त्याचा अर्थ कसा लावायचा, हा दृष्टिकोन आपला असतो.

आयुष्यात एका टप्प्यापर्यंत अभ्यास आवश्यक आहे. दुसऱ्या एका टप्प्यापर्यंत अनुभव आवश्यक आहे; परंतु एखादी घटना घडते, निर्माण होते तेव्हा त्याचा अर्थ कसा लावायचा, आपण जगायचं कसं हा चॉइस, निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे असते तेव्हा आपला निवडीचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा ठरतो.

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -