- कोकणी बाणा: सतीश पाटणकर
आतापर्यंत जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर वाईट शक्तींचे बळ वाढत गेलं तेव्हा तेव्हा आदिशक्ती पृथ्वीवर अवतरली व दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांसाठी त्यांची कैवारी बनली. अशा आदिशक्तींची अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. त्यातीलच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी मातेचे मंदिर. वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे. वज्रेश्वरी म्हणजे जगतजननी माता पार्वतीच होय. हे मंदिर अत्यंत पुरातन व पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे. मंदिर पूर्णतः पुरातन व दगडी बांधकाम केलेले आहे. अगदी थोड्याच पायऱ्या चढून जावे लागते. देवीच्या मंदिरात भव्य गाभारा आहे, सभामंडप आहे. मुख्य मंदिरात शेंदुरी रंगाची मातेची तेजोमय मूर्ती आहे. वज्रेश्वरी मातेच्या हातात खड्ग आणि गदा आहे. त्याचप्रमाणे एका बाजूस रेणुकामाता तर दुसऱ्या बाजूला कालिकामाता आहे. मंदिराजवळ दत्त मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर देखील आहेत.
श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर मुंबईपासून सुमारे ७७ किमी, तर वसई रोड स्टेशनपासून २८ किमी अंतरावर तानसा नदीच्या काठी वसलेले आहे. मंदाकिनी पर्वताच्या टेकड्यावर असलेले हे मंदिर मूळत: वज्रेश्वरी गावापासून सुमारे ८ किमी अंतरावरील गुंज गावात होते. पोर्तुगीजांनी त्याचा नाश केल्याने ते येथे हालवण्यात आले. प्राचीन काळी एका झाडाखाली या देवीची दगडी मूर्ती होती. चिमाजी आप्पा पेशवे हे जेव्हा वसईचा किल्ला सर करण्यासाठी आले, तेव्हा देवीने त्यांना याच ठिकाणी दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी किल्ल्यावर विजय मिळवून भगवा झेंडा फडकवला आणि नवस बोलल्याप्रमाणे किल्लेवजा मंदिर बांधले. या मंदिराचं बांधकाम इ. स. १७३४ मध्ये झालं आणि बांधकामासाठी काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला ६० फूट उंचीचा दीपस्तंभ दिसतो. त्यानंतर ५२ पायऱ्या चढून आल्यावर एक मोठी दगडी कमान दिसते. ती कमान म्हणजे या मंदिराचा भव्य महाद्वार आहे. या महाद्वाराच्या वरती नगारखाना आहे आणि दोन्ही बाजूला चौघड्यासाठी चौथरे आहेत, तिथेच दिवाबत्तीसाठी दगडी कोनारेसुद्धा आहेत. श्री वज्रेश्वरी देवीचे हे मंदिर पूर्वाभिमुख असल्यामुळे सूर्योदयाच्या वेळी गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरण परावर्तीत होऊन देवीच्या मुखमंडलावर पडतात.
वज्रेश्वरी देवीच्या डाव्या बाजूला कालिका माता आणि परशुराम स्वामींची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला रेणुका माता, महालक्ष्मी आणि गणेशाची छोटीशी मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला देवीचे वाहन व्याघ्रदेवता आहे. देवीच्या या तीन मूर्ती म्हणजेच प्रकृती, संस्कृती आणि विकृती यांचीच तीन रूप आहेत. श्री वज्रेश्वरी देवीचा उत्सव गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यात प्रतिपदेला रात्री १२ वाजता आणि दसऱ्याच्या दिवशी पहाटे ४ वाजता देवीची पालखी निघते. या संपूर्ण उत्सवातील पालखी हे मुख्य आकर्षण असतं. येथे गिरीगोसावी परमपूज्य महंत गोढडेबुवा यांची समाधी आहे. त्यांच्या समाधीबद्दल असे बोलले जाते की, समाधी अवस्थेत असताना देवीसोबत ते सारीपाठ खेळत होते आणि देवीच्या हातातून पाण्याची धार पडताना त्यांनी पाहिली. त्याबद्दल विचारल्यावर देवीने समुद्रातील कोळी बांधवांना मदतीचा हात दिल्याचे सांगितलं. पण यानंतर तू माझ्यासमोर परत कधीच येऊ नकोस, असेही तिने बजावले. या घटनेनंतर महाराजांनी गौतमी टेकडीवर जाऊन संजीवन समाधी घेतली.
वज्रेश्वरी माता मंदिराजवळ गरम पाण्याचे २१ कुंड आहेत व तानसा नदी देखील आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की, वसिष्ठ ऋषींनी स्त्री चंडी यज्ञ केला होता. यज्ञाच्या वेळी देवी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. वज्रेश्वरी देवी खूप सामर्थ्यवान आहे. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. श्रीरामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. तेथे जवळच रामाने बांधलेलं प्रसिद्ध मंदिर आहे. अकलोली गावाजवळ रामेश्वर महादेव मंदिर आहे. येथे गरम पण्याचे दोन कुंड हे रामकुंड या नावाने प्रसिद्ध आहेत. तेथून जवळच गणेशपुरी आहे. गणेशपुरी अकलोली येथे नित्यानंद महाराजांचे मठ आहे. मठाजवळ देखील गरम पाण्याचे एक कुंड आहे. त्याचप्रमाणे इथे अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी जवळच केलठन गावाजवळ शिर्डीचे प्रतिरूप मंदिर बांधले आहे. मंदिरात शिरल्यावर जणू शिर्डीला आल्यासारखेच वाटते. येथे शिर्डीसारखीच साईंची मूर्ती आहे. मंदिराबाहेर महादेवाची सुंदर मूर्ती आहे. तेथून जवळच निंबोळी गावाजवळ अनुसूया मातेचे मंदिर आहे. मंदिराजवळही गरम पाण्याचे दोन कुंड आहे. तेथून आम्ही दर्शन घेऊन पुढे जीवदानी मंदिराकडे निघालो. तेथून गाडीने आम्ही अर्ध्या तासात वसई-विरार जवळील जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो. सुंदर अशा जीवदानी मातेचे पुरातन मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी आता रेल्वेची सोय करण्यात आली आहे. अनुयायी स्वामी मुक्तानंद यांचा गुरुदेव आश्रम म्हणजे योग प्रशिक्षण, अध्ययन केंद्र आणि त्याच्या रमणीय परिसराचे स्थळदर्शन म्हणजे सामाजिक पर्यटनाचे दिशादर्शक केंद्र आहे. म्हणूनच वज्रेश्वरी स्थळदर्शनात तीर्थाटनाबरोबर पर्यटनाचाही लाभ घेता येतो.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे जिल्ह्याला हजारो वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिकप्रमाणे धार्मिक अधिष्ठानाची वैभवशाली पार्श्वभूमी आहे. वनवैभवासह सागर सान्निध्याच्या ठाणे जिल्ह्याला जे वैभव लाभलेय त्यात धार्मिक पार्श्वभूमीच्या मंदिर वास्तूंचाही सहभाग खूप मोठा आहे. त्या मंदिर वास्तूंना अजोड अशा शिल्पाकृतींबरोबर अनेक सत्ताधीशांच्या काळातील त्या शिल्पांवर त्यांची शैलीही पाहावयास मिळते.
मुंबई-ठाण्यापासून तास-दीड तासांच्या अंतरावरील वज्रेश्वरी माता मंदिर तसे सर्वपरिचित असून अनेक ज्ञाती, परिवारांचे ते श्रद्धास्थानासह कुलदैवतही आहे. त्यामुळेच या स्थानाला महाराष्ट्रातील पावित्र्यासह धार्मिक स्थळांत विशेष स्थान आहे. वज्रेश्वरी म्हणजे माता पार्वती देवीचे स्वरूप. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात पेशव्यांच्या काळात सरदार चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्यावर सर्व शक्तिनिशी जी यशस्वी युद्धमोहीम झाली त्याची पार्श्वभूमी या मंदिर वास्तूमागे आहे. इ. स. १७३९ मध्ये सरदार चिमाजी अप्पांनी आपल्या अंगभूत शौर्यासह कल्पकतेने मोहीम फत्ते करून पोर्तुगीजांना पराभूत केले. इतर प्राचीन मंदिरांप्रमाणे वज्रेश्वरी माता मंदिरालाही आख्यायिका, दंतकथेचे कोंदण आहेच. त्यानुसार, प्रारंभीच्या काळात वज्रेश्वरी मातेचे वास्तव्य आताच्या मंदिर वास्तूच्या नजीकच्या ‘वडवली’ गावात होते. कालांतराने ‘वडवली’ हे नाव मागे पडून वज्रेश्वरी हे नाव अखेर जनमानसात रूढ झाले.
या दगडी वास्तूवर सुशोभीकरणासाठी रंगरंगोटी केली जात असे; परंतु पुरातत्त्व खात्याच्या आदेशानुसार रंग देण्याला प्रतिबंध केल्यावर मूळ मंदिर वास्तूच्या शिल्पाकृतीचा बाज कायम राहिल्याने त्याच्या पुरातन बांधकामाची कल्पना येते. मंदिर वास्तूची रचना किल्लासदृश असल्याने त्याच्या पुरातन- पारंपरिक वास्तुरचनेनुसार मंदिर प्रवेशद्वारीच्या नगारखान्याची इमारत मूळ बांधकामाच्या शैलीशी सुसंगत अशी आहे. पेशवेकालीन या मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदी आणि बुरुजांमुळे मंदिराकडे मार्गस्थ होताना आपण एखाद्या किल्ल्याकडे निघालो आहोत, असाही भास होतो. प्रमुख गाभाऱ्यात भाविकांना योग्य प्रकारे दर्शन घडावे अशाच प्रकारे देवीची स्थापना केली असून, त्यासाठी दर्शकांना आगमन-निर्गमनाची सोय आहे.
वज्रेश्वरीला वर्षभर भाविकांचा ओघ असतोच; परंतु वार्षिक उत्सवातील चैत्रातील यात्रा जेव्हा भरते, तेव्हा या उत्सवाचा महोत्सव अनुभवता येतो. नवरात्र उत्सवाची सांगता होताना दसऱ्याची पालखी शोभायात्रा हे येथील खास आकर्षण आहे. या उत्सवाचे औचित्य साधत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांना आमंत्रित करून समाजप्रबोधन कार्याचा वसाही मंदिर व्यवस्थापनाने जपला आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)