- प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
काही गोष्टी बंदच पडत चालल्यात. साधारण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी हिंदी – मराठी गाण्यांची पुस्तके बाजारात मिळायची. खरं तर सर्वच भाषांमध्ये ती उपलब्ध असायची शक्यता आहे. कुठेही सहलीसाठी जाताना ती आठवणीने सोबत न्यायचो. एकदा कोणी गाणे सुरू केले की, त्याच्या सुरात सूर मिसळून पुस्तकात पाहून सगळेच गायचो. पत्त्याचा जोडसुद्धा हमखास सोबत असायचा. ट्रेनचा लांबचा प्रवास असला तर तो एक मोठा विरंगुळा असायचा. फिरकीचा तांबा किंवा छोटी मातीची कळशी प्रवासात प्रत्येकासोबत असायची, ती आठवणच गमतीशीर वाटते. आता काय हवाबंद पाण्याच्या बाटल्या प्लॅटफॉर्मवरच काय पण ट्रेनच्या आतसुद्धा मिळतात, केव्हाही! प्रत्येक रेल्वे स्टेशनवर खूप सारे लाल डगलेवाले हमाल असायचे. एकावर एक पेट्या – पिशव्या – बेडिंग घेऊन ते प्लॅटफॉर्मवर वेगाने चालायचे. त्यांच्या मागे पळत जावे लागायचे. आता चाकाच्या पेट्या असल्यामुळे प्रत्येक जण आपले सामान स्वतःच सहज घेऊन जाऊ शकतो. गोवा, कर्नाटक, केरळ व कोणत्याही भागात फिरायला जाताना त्या भागावर लिहिलेले प्रवास वर्णनाचे पुस्तक विकत घ्यायचो आणि त्या पुस्तकात वर्णन केलेल्या ठिकाणांना भेट द्यायचो. आता हा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे आणि एखाद्या ठिकाणी जाताना आपण त्या त्या भागात असलेल्या ठिकाणांची माहिती युट्यूबद्वारे सहज मिळून जाते.
सुट्टीच्या दिवशी आई-बाबा दोघेच ‘पट’ मांडून खेळायचे. विदर्भात त्याला ‘चौसर’ म्हणतात आणि राजेरजवाडे त्याला ‘सारीपाट’ म्हणायचे. तो खेळ मी कधी खेळले नाही; परंतु ते दोघे खेळायचे ते खूपदा बघण्याचा योग आला होता. सोसायटीच्या प्रांगणात संध्याकाळी सर्व मुले खेळायला खाली उतरायचो. मुलींच्या अंगावर फ्रॉक आणि मुलगे पॅन्ट-शर्टमध्ये असायचे. कोणाच्याही पायात चप्पल किंवा बूट नसायचे. माती लागणे, काटे लागणे, दगड लागून खरचटणे इत्यादी नित्याच्याच गोष्टी होत्या. त्याचे मुलांनाही काही वाटायचे नाही आणि त्यांच्या आई-वडिलांनाही! आम्ही लगोरी, लपाछपी, बॅट-बॉल (क्रिकेट नव्हे), दोरी उड्या वा तत्सम खेळ खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी दुपारी कॅरम-सापशिडी खेळायचो. दोन-चार तास खेळूनसुद्धा जेव्हा आई-वडील घरी बोलवायचे तेव्हा त्यांचा खूप राग यायचा… ते शत्रू वाटायचे. आता टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, सॉक्स, स्पोर्ट शूज घालून घरातून ढकलून दिले तरी मुले घराबाहेर किंवा मैदानावर खेळायला जात नाहीत. घरातच सोफ्यावर व कोणत्या तरी कोपऱ्यात मोबाइल घेऊन स्क्रोल करत बसतात. आता लहान मुले काय, पण मोठी माणसेसुद्धा फक्त मोबाइल – गेम खेळताना दिसतात.
दिवाळीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रांगोळीची पुस्तके बाजारात मिळायची. आम्ही रांगोळी काढताना समोर पुस्तक ठेवूनच रांगोळी काढायचो. एखाद्या भागात विशिष्ट पदार्थ केले जायचे किंवा खाल्ले जायचे. त्यानंतर खाद्यपदार्थांची पुस्तकं मिळायला लागल्यावर, नवीन लग्न झालेल्या मुलीला हमखास अशा पुस्तकांची भेट दिली जायची. ही पुस्तकेही मोठ्या प्रमाणात विकली जायची. आता या पुस्तकांची विक्री खूपच कमी झाली आहे. युट्यूबवरचा व्हीडिओ पाहून जगभरातील पदार्थ घरोघरी केले जातात.
पूर्वी रेकॉर्ड, सीडी, हे सगळे जाऊन आता ऑडिओ सुद्धा फार कमी प्रमाणात ऐकले जातात. व्हीडिओची लोकांना इतकी सवय झाली आहे की, त्याच्यातून जे काही दाखवले जाईल ते लोकांना खरे वाटू लागले आहे. जो उठतो तो जणू डॉक्टर किंवा एक्स्पर्टी असल्यासारखा सौंदर्य वृद्धीसाठी असोत किंवा एखाद्या आजारपणासाठी घरगुती उपचार पद्धतीचे व्हीडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर टाकतो. व्हीडिओतून दिसते ते खरे समजून सामान्य माणूस त्याच्या आहारी जातो. अशा उपचारातून अनेकांना फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे. इतके की काहींना आपली दृष्टी गमवावी लागली आहे!
आता ज्या पन्नाशीतल्या स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या मुलांना चिऊकाऊच्या गोष्टी सांगून घास भरवले आहेत. कदाचित त्या आधीच्या सगळ्या पिढ्यांनी तेच केले असेल; परंतु आताच्या पिढीतील आई ही केवळ टीव्ही, लॅपटॉप, स्क्रीन, टॅब किंवा मोबाइल दाखविल्याशिवाय जेवू घालू शकत नाही. कदाचित जेवण्याची प्रक्रिया ही समोरच्या चलचित्रांवर अवलंबून असते, असेच मला वाटू लागले आहे. कारण, परवा माझी मैत्रीण तिच्या नातीला जेवू घालत होती आणि मध्येच मोबाइल हँग झाला, समोरचे चित्र स्थिर झाले तर त्या मुलीने घास चावणेच बंद केले.
यातील कोणतीही गोष्ट ही मला बढाचढाकर लिहिण्याची गरजच नाही. आपण सगळेच हे अनुभवतो आहोत. आता इतक्या प्रकारचे गोड पदार्थ बाजारात मिळतात की, विचारायलाच नको. पण, तरीही लहानपणी तासन्तास चघळलेल्या रावळगाव चॉकलेटची चव काही जिभेवरून उतरत नाही!
या लेखामध्ये चांगले, वाईट याचा ऊहापोह मी करत नाही; परंतु या सर्व जुन्या गोष्टी परत परत आठवत राहतात. मी अनुभवलेल्या जुन्या दिवसांनी नॉस्टेल्जिक होते.