
- नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
सिनेसृष्टीत दोन किंवा अधिक लग्ने, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, हे सगळे नॉर्मल समजले जाते. मात्र पूर्वी हयात असलेल्या व्यक्तीबद्दल अशा बाबतीत जाहीरपणे काही बोलले जात नसे. जुन्या दिवंगत कलाकारांच्याबाबत दबक्या आवाजात जाणकार बोलत. अलीकडे प्रसिद्धीच्या प्रचंड हव्यासापोटी सगळे खासगीपणच संपले असल्याने अनेकदा नटनट्या स्वत:च प्रसिद्धीसाठी मुद्दाम काही प्रसंग घडवून आणून स्वत:बद्दल खळबळजनक बातम्या छापून आणतात. काही दिवस प्रसिद्धीचा लाभ घेतल्यावर रीतीप्रमाणे “हम सिर्फ अच्छे दोस्त हैं.” असा खुलासा करून पुन्हा एखाद्या नव्या प्रेमप्रकरणासाठी ‘मोकळे’ही होतात!
मात्र तब्बल ४१ वर्षांपूर्वी एक सिनेमा असा आला होता ज्यात सिनेक्षेत्रातील क्रमांक एकच्या नायकाच्या कथित प्रेमकथेबद्दल चक्क सर्व खरी पात्रेच घेऊन यश चोप्रांनी सिनेमा काढला होता. त्यात भाग घ्यायला चोप्रजींनी त्याच तिन्ही पात्रांना कसे तयार केले असेल, देव जाणे!
सिनेमा होता ‘सिलसिला’(१९८१). अतिशय मधुर गाणी आणि लोभस निसर्गदृश्यांची रेलचेल असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चनबरोबर इतर कलाकार होते संजीवकुमार, शशीकपूर, देवेन वर्मा, कुलभूषण खरमंदा आणि सुधा चोपडा. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश आले नाही तरी तीन फिल्मफेअर नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट अभिनेता अमिताभ बच्चन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जया बच्चन आणि सर्वोत्तम संगीतकार शिव-हरी.
हा सिनेमा म्हणजे संगीतप्रेमीच्या कानांना एक मेजवानीच होती. कारण संगीत होते दोन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या क्लासिक संगीतकारांचे - शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरासिया! यश चोप्रांना अतिशय आवडलेल्या कथेसाठी त्यांनी ६ गीतकार निवडले होते - जावेद अख्तर, हसन कमाल, राजेंद्र कृष्णन, निदा फाजली, हरिवंशराय बच्चन आणि चक्क संत मीराबाई! यातील काहीशा सवंग अभिरुचीचे ‘रंग बरसे भिगे चुनरिया’ हे गाणे होळीच्या दिवसांत दरवर्षी नेमाने सर्वत्र वाजवले जाते. ते लिहिले होते हरिवंशराय बच्चन यांनी! संपूर्ण सिनेमाची थीम सांगणारे नितांत सुंदर गाणे होते जावेद अख्तर यांचे ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए.’
या सिनेमाआधी प्रामुख्याने कथा, पटकथा आणि अत्यंत लोकप्रिय संवादलेखक म्हणून गाजलेल्या जावेद अख्तर यांनी ‘सिलसिला’त आपले पहिले गाणे लिहिले. गाण्यात जसे रेखाचे लोभस सौंदर्य प्रेक्षकांना वेड लावते तसेच ऐन तारुण्यातील अभिताभचे देखणेपणही उठून दिसते. गाण्याच्या चित्रीकरणासाठी जी पार्श्वभूमी दिग्दर्शकांनी निवडली ती तर केवळ अप्रतिम होती. नेदरलँडमधील ट्युलीप फुलांच्या डवरलेल्या विस्तीर्ण बागा आणि काश्मीरचे निसर्गसौंदर्य आपली नजर आपली क्षणभरही पडद्यावरून हलू देत नाही.
उत्कट प्रेमाच्या परीपूर्तीचे प्रेमिकांनी पाहिलेले स्वप्न हा या गाण्याचा विषय! यश चोप्रांच्या दिग्दर्शनाचा जबरदस्त प्रभाव म्हणजे गाणे ऐकताना, पाहताना खरोखर सगळे स्वप्नवत वाटू लागते!
अमित मल्होत्रा (अमिताभ) आणि चांदणी (रेखा) यांच्यात उत्कट प्रेम आहे. त्यांच्यातील परस्पर आकर्षण किती अनावर आहे, हे मांडताना जावेद अख्तर यांनी कुणाही प्रेमिकाला आपलीच वाटावी अशी मन:स्थिती चितारली आहे. किशोरदा आणि लतादीदीने अत्यंत समरसून गायलेल्या गाण्याचे शब्द होते -
देखा एक ख्वाब तो ये
सिलसिले हुए.
दूरतक निगाहमें हैं गुल खिले हुए.
मी प्रेमाचे नुसते स्वप्न पाहिले तरी सगळा आसमंत स्वर्गासारखा सुंदर झाला. दूरदूरपर्यंत फुलांचे ताटवेच्या ताटवे दिसू लागले असे प्रियकर म्हणतो. या ओळी ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर विल्यम वर्डस्वर्थच्या ‘I Wandered Lonely as a Cloud’ या कवितेतील डॅफोडील्सच्या फुलांचे ताटवे डोलू लागतात!
ये गिला है आपकी निगाहोंसे,
फूल भी हो दरमियां तो फासले हुए...
तुझ्या प्रेमाच्या जादूमुळे हवेत एक आवाज सतत गुंजतो आहे, तोही तुझाच. सगळा आसमंत तुझ्या प्रेमाने रंगला आहे. माझ्या हृदयाची धडधडसुद्धा जणू तुझेच गीत गाते आहे.
मेरी साँसोंमें बसी खुशबू तेरी,
ये तेरे प्यारकी है जादूगरी.
तेरी आवाज है हवाओं में,
प्यार का रंग है फिजाओं में,
धडकनों में तेरे गीत हैं मिले हुए...
या कडव्यात फिकट पोपटी ड्रेस घातलेली रेखा ट्युलीप फुलांच्या वाफ्यामधील सरीतून अल्लडपणे धावत येते आणि अमिताभला बिलगते. तेव्हा बेधुंद मूडमधील त्या सुंदरीचा चेहरा अमिताभच्या छातीला लागतो आणि तो तिच्यापेक्षा किती उंच आहे हे लक्षात येते. ती म्हणते, ‘मी काय बोलू, लज्जेमुळे जणू माझे ओठच शिवले गेले आहेत’ या ‘क्लोज अप’च्या क्षणातले तिचे मोहक सौंदर्य आणि लाडीक
अभिनय केवळ बघण्यासारखा, नव्हे बघत राहण्यासारखा आहे -
धडकनों में तेरे गीत हैं मिले हुए...
क्या कहूँ के शर्मसे हैं लब सिले हुए...
देखा एक ख्वाब तो...
प्रेमिका म्हणते, ‘माझे मन तर आता कायमचे तुझ्या आश्रयाला आले आहे.’ तेव्हा अमिताभ म्हणतो, ‘माझ्या डोळ्यांत तुझी प्रतिमा कायमची बसली आहे’ आणि तिकडे बघ - ‘आपल्या जीवनाचा मार्ग कसा दूरपर्यंत दिसणाऱ्या रोषणाईने उजळून निघाला आहे.
मेरा दिल है तेरी पनाहोंमे,
आ छुपा लूँ तुझे मैं बाहोंमें.
तेरी तस्वीर है निगाहोंमें, दूरतक रोशनी है राहोंमें...
प्रियकराने कितीही खात्री दिली तरी प्रेमिकेला शंका उरतेच - ‘जर उद्या ही यौवनाची रोषणाई मंदावली तर? तर आपण कसे पुढे कसे जाणार?’ यावर जावेद अख्तर या रोमँटिक कवीचा प्रेमिक तिला आश्वासकपणे म्हणतो, ‘जेव्हा यौवनाचा उत्सव संपेल तेव्हा आपले प्रेमाचा प्रकाशच अवघे जीवन उजळवून टाकेल.’
कल अगर न रौशनीके काफिले हुए,
प्यारके हजार दीप हैं जले हुए
देखा एक ख्वाब तो...
गीताच्या सुरुवातीला आपल्याला एकटा अमिताभ पडद्यावर दिसतो. तो जणू स्वत:शीच एक शेर म्हणतो
‘वहमो गुमांसे दूरदूर, यकीनकी हद के पासपास,
दिल को भरम ये हो गया, उनको हमसे प्यार है.’
‘भास-आभासाच्या प्रदेशापासून दूर, जिथे विश्वासाची हद्द सुरू होते., त्या प्रदेशात मनाला भ्रम होतोय की, तिचे माझ्यावर प्रेम आहे.’ या भ्रमावर तर सगळा प्रेमकथा सुरू होत असतात. म्हणूनच हा नॉस्टॅल्जिया!