Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजफसवणूक वयोवृद्धांची

फसवणूक वयोवृद्धांची

  • क्राइम:  अ‍ॅड. रिया करंजकर

सुरेखाला पोलीस स्टेशनवरून फोन आला की, तुमच्या विरुद्ध राजाराम यांनी तक्रार नोंदवलेली आहे. त्यावेळी सुरेखा यांनी आपल्या ओळखीच्याच वकिलाला सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी वकिलाच्या लक्षात आलं की, आपल्याला आपल्या क्लाइंटने जी माहिती दिलेली होती. ती फारच चुकीची होती आणि तक्रारदार जे बोलत होता ते फार वेगळेच बोलत होता.

तक्रारदार राजाराम यांनी अशी तक्रार केली होती की, सुरेखा हे आपलं घर विकणार होते. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून अॅडव्हान्स दहा लाख रुपये घेतले होते. सुरेखा यांनी राजाराम यांना असं सांगितलं होतं की, ते घर मी विकत घेतलेले आहे; परंतु लाईट बिल वगैरे जे कागदपत्र आहे, त्या अगोदरच्या मालकाच्या नावावर अजून आहेत. ते मी बदललेले नाहीत कारण मला घर विकायचं होतं म्हणून. त्यावेळी सुरेखा यांनी राजाराम यांना लाईट बिल दिलेलं होतं. राजाराम यांनी आपली पत्नी आणि मुलाला ही गोष्ट सांगितली. त्यावेळी राजाराम यांची पत्नी आणि मुलगा सुरेखा यांना भेटायला त्यांच्या घरी गेले तेव्हा, तिने असं उत्तर दिलं की, मी या रूममध्ये भाड्याने राहत आहे. मी भाड्याचा रूम कसा विकणार. राजाराम यांनी माझाशी कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराचे पैसे दिले नाहीत. असं तिने राजाराम यांच्या पत्नी आणि मुलाला सांगितले. त्यानंतर राजाराम यांचा मुलगा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि सुरेखा यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. राजाराम आणि सुरेखा हे एकाच हॉस्पिटलमध्ये कामाला होते. राजाराम हे हॉस्पिटलमध्ये उच्च पदावर होते, तर सुरेखा हाऊसकीपर म्हणून कामाला होती. त्यावेळी या दोघांची ओळख झालेली होती. त्यावेळी तिने आपला रूम विकत आहोत म्हणून सांगितलं म्हणून राजाराम यांनी तिला दहा लाखांची कॅश दिलेली होती. कारण तिने कॅश मागितली होती. कामातली बाई आहे, ओळखीची आहे म्हणून कॅश देताना त्यांनी विचार केला नाही. ज्यावेळी रूमबाबत राजाराम विचारायचे तेव्हा पुढचे पैसे द्याल तेव्हा सर्व व्यवहार होईल, असं ती सांगायची. रूम लवकरात लवकर मिळण्यासाठी राजाराम यांनी आपल्या घरातले दागिनेही सुरेखाला दिले होते. असा सुरेखा आणि राजाराम यांच्यामध्ये रूमबाबत झालेला व्यवहार होता.

राजाराम यांनी तक्रार करताना सांगितलं होतं की, मी पैसे आणि दागिने तिला दिलेले होते. तर उरलेली रक्कम ती आपल्या मुलींच्या नावावर असलेल्या बँकेमध्ये जमा करायला लावत होती. मी आता पैसे मागतोय नाहीतर मला रूम दे असं म्हणतोय. तर ती म्हणते की, माझ्यावर नको ते आरोप करायचे नाहीत. नाहीतर मी तुमच्यावर माझ्यावर बलात्कार केलात म्हणून तुम्हाला मी खोट्या केसमध्ये फसवेन. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता मी असं बोललेच नाही, असं ती तिथे सांगायला लागली. राजाराम यांच्या मुलाने तिच्या गळ्यात असलेली चैन ओळखली आणि ही आमची चैन आहे, असं तो बोलू लागला. कारण या चैनीचं डिझाईन जे आहे ते त्याच दुकानात बनतं, दुसरे कुठेही बनत नाही, असं त्याचं ठाम मत होतं. तर ती बोलू लागली, ‘नाही ही माझी चैन आहे. मी त्याच्याकडून कोणतेही दागिने स्वीकारलेले नाहीत. नंतर ती सांगू लागली, राजाराम यांनी मला फक्त दोन लाख रुपये दिलेले होते. ते मी ऑफिसमध्ये कॅश ठेवणार किंवा घरी कसे ठेवणार म्हणून बँकेत ठेवलेले होते. दोन लाख रुपये राजाराम यांनी मला ठेवण्यासाठी दिलेले होते, कारण त्यांचा मुलगा हा बिनभरवशाचा आहे. म्हणून ती रक्कम त्यांनी माझ्याकडे दिलेली होती. ते दोन लाख रुपये मी त्यांना परत केले असं ती पासबुकवर असलेल्या एन्ट्रीने दाखवत होती. राजाराम ते मान्य करत होते की, हिने मला दोन लाख रुपये दिलेले आहेत. पण बाकीच्या आठ लाखांचं काय. ती म्हणत होती बाकीचे पैसे मला दिलेले नाहीत. मग त्या पासबुकवर अशाही एंट्री दिसल्या की, ज्या दिवशी दोन लाख रुपये सुरेखा हिने बँकेत भरले होते, त्याच दिवशी तिने लॉकरही घेतलेलं होतं आणि ते लॉकर घेण्यासाठी ठरावीक रक्कम बँकेत जमा असावी लागते. मग त्या दिवशी हिने लॉकर कसं घेतलं? हाच प्रश्न उद्भवला. त्याचप्रमाणे सुरेखाच्या दोन्ही मुलींच्या अकाऊंटवर राजाराम यांनी दर महिन्याला ठरावीक रक्कम भरलेल्याचे तिच्या मुलीच्या अकाऊंटवर दिसले. त्याबाबत पोलिसांनी विचारले असता ते मला मुलगी मानत होते व माझ्या मुलींनाही मुली मानत होते म्हणून ते मदत करत होते असं तिने उत्तर दिलं. म्हणूनच तर दोन लाख रुपये माझ्याकडे ठेवायला दिले असं तिने सांगितलं. पोलिसांना प्रश्न पडला की, तुलाही मुलगी मानत होते आणि तुझ्या मुलींनाही मुलं मानत होते. म्हणून कोणती व्यक्ती दर महिन्याला मुलींच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकत नाही. तिने सरळ उत्तर दिले, ‘ते टाकत होते त्याला मी काय करणार? मी सांगितलं नव्हतं त्यांना टाकायला.’ मग पोलिसांनी प्रश्न विचारला की, तुझे लाईट बिल जे आहेत, ते राजाराम यांच्याकडे कसे. सुरेखाने उत्तर दिले. मी कामांमध्ये मला वेळ नसल्यामुळे कोणालाही लाईट बिल भरायला देत होते त्याच्यामुळे बहुतेक त्यांच्याकडे ते बिल असेल.

पोलिसांनी विचारलं तू भाड्याने राहत होतीस आणि भाड्याचं लाईट बिल कोणालाही भरायला सांगत होतीस, घरात तुझा नवरा आणि दोन मुली होत्या ना. तर तिने उत्तर दिलं माझ्या नवऱ्याला व मुलींना अजिबात वेळ नाही. पोलिसांनी विचारलं, ‘मग एका वयोवृद्ध माणसाला वेळ होता का आणि तेही उच्च पदावर असलेल्या माणसाला तू लाईट बिल भरायला सांगत होतीस. हे कितपत योग्य होतं.’ ती पोलिसांना सांगू लागली की, आमच्यामध्ये बापाचं आणि मुलीचे प्रेम होतं म्हणून मी त्यांना बोलत होती. माझ्याकडे दोन लाख रुपये ठेवायला दिले होते ते मी परत केलेले आहेत आणि ते पासबुकवर एन्ट्री केलेली दिसत आहे. पोलिसांनाच बोलू लागली त्यांनी दहा लाख रुपये दिलेले आहेत याचा पुरावा आहे का? उलट मी दिलेल्याचा पुरावा आहे, असा प्रश्न ती पोलिसांना करू लागली. पोलिसांनी विचारलं, तुझ्या मुलीच्या अकाऊंटमध्ये जे पैसे राजाराम यांनी टाकलेले ते कसले. मी त्यांना टाकायला सांगितले नव्हते ते राजाराम यांनी टाकलेले आहेत. कारण ते माझ्या मुलींना आपल्या मुलीसारखं मानत होते म्हणून. अशी उडवाउडवीचे उत्तर सुरेखा पोलिसांना देऊ लागली. हे प्रकरण पूर्ण हॉस्पिटलच्या युनियनपर्यंत गेलेलं होतं. हॉस्पिटलमधली लोकं राजाराम यांनाच सपोर्ट करत होती. कदाचित सुरेखा ही कशा प्रकारची बाई आहे, ही हॉस्पिटलमधल्या लोकांना माहीत असावी. आता तिने राजाराम यांना फसवलेलं आहे, हे हॉस्पिटलमधल्या कामगारांना माहीत झाले असावे. म्हणून अनेक कामगारांनी तिच्याविरुद्ध जबाब दिलेली होती, तर सुरेखा ज्यांनी जबाब दिला ते कसे खोटारडे आहेत, हे पोलिसांना सांगत होती. त्याचे इतरांशी संबंध आहेत, हेही ती त्यावेळी सांगत होती. पोलिसांनी एकच शेवटचा प्रश्न केला की, राजारामांचा विश्वासाएवढी माणसं असताना दोन लाख रुपये तुझ्याकडे का ठेवायला दिले. तसेच न ठेवता तू बँकेत पैसे का ठेवलेस. तिने असं उत्तर दिलं, मला ते मुलगी मानत होते. म्हणून पैसे ठेवायला दिले असतील. घरात एवढी रक्कम कशी ठेवू म्हणून बँकेत ठेवली. अशी ती पोलिसांना सांगू लागली. राजाराम यांच्या मुलाने सुरेखांशी झालेला मोबाइल संवाद पोलिसांना ऐकवला. पोलिसांना जाणवलं की ही बाई बोलण्यात बोलत नाही.

ज्या रूममध्ये ती भाड्याने राहत होती त्या रूम मालकालाही समजलं होतं की, माझ्या घराचं लाईट बिल दाखवून अनेक लोकांना ती रूम विकत आहे. म्हणून फसवलेलं होतं. त्यानेही तिला आता रूम खाली करण्यास सांगितलेलं होतं. या लोकांमुळे मला रूम मालक रूम खाली करायला सांगत आहे, असा उलट आरोप सुरेखा राजाराम यांच्यावर करत होती. सुरेखा यांच्या मुलींना प्रश्न विचारला, ‘तुम्ही यांना ओळखता का?’

त्या मुलीने सरळ सांगितलं, ‘आम्ही यांना ओळखत नाही, जर मुलींना राजाराम ओळखत नाही मग मुली मानण्याचा प्रयत्न कसा उद्भवला.’ मुलींना विचारण्यात आलं मग तुमच्या अकाऊंटमध्ये हे कसे पैसे टाकत होते? आम्हाला माहीत नाही, असं त्या मुलीने उत्तर दिले.

सुरेखाने सांगितलं की, मी मुलीच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसे परत करते. पण, माझा दहा लाख व दागिन्यांची काही संबंध नाही, असं ती पोलिसांना सांगू लागली.राजाराम यांनी दहा लाख रुपये कॅश व दागिने देऊन एका बाईच्या जाळ्यामध्ये अक्षरश: फसलेले होते. आता स्वतःच्या पैशांसाठी दागिन्यांसाठी नको तो मनस्ताप घेऊन राजाराम बसले होते.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -