Friday, July 19, 2024

झुंज

  • ओंजळ: पल्लवी अष्टेकर

काही वर्षांपूर्वी आम्ही कुटुंबीय दोन-तीन दिवसांसाठी पावसाळ्यात सहलीसाठी लोणावळा येथे गेलो होतो. नितळ पाण्याने भरलेले तुडुंब तलाव, झरे, हिरवीगार वनराई यांनी निसर्ग-सौंदर्य खुललेले होते.
पर्यटकांनी परिसर भरून गेला होता. निसर्गसौंदर्य पाहत फिरून-फिरून दमलेले लोक खाण्याचे स्टॉल शोधत होते. भरपूर गार वारा, आकाशात जमलेले काळे ढग, मध्येच पाऊस आला की, लोकांची उडणारी तारांबळ, अधे-मधे डोकावणाऱ्या रंगीबेरंगी छत्र्या अशा वातावरणात कोणाला भूक लागणार नाही?

कुणी उकडलेल्या शेंगाच्या पुड्या खरेदी करत होते, तर कुणी भाजलेले मक्याचे भुट्टे खात होते. शहरगावी कामाच्या व्यापातून थकले-भागलेले लोक जरा तणावमुक्त होत होते. आम्ही कुटुंबीय देखील फिरून फिरून भुकेलेले होतो. भरपूर चालल्यानंतर आम्हाला एक स्टॉल मिळाला. तीन ठिकाणी जेमतेम प्लास्टिकच्या कव्हरने झाकलेला. तिथे खाण्यासाठी लोकांची अमाप गर्दी जमली होती. त्या स्टॉलच्या आत आई व तिचा मुलगा-वय अंदाजे बारा वर्षे यांची लोकांना गरमागरम भजी खायला घालण्यासाठी धावपळ सुरू होती. चीज भजी, मका भजी, कांदा-बटाटा-मिरची भजी लोक मजेत खात होते. दोन स्टोव्ह सुरू होते. मायलेकरांच्या कानावर मध्ये-मध्ये चहाच्या ऑर्डरही येऊन आदळत होत्या. मिळतील तसे पैसे मुलाची आई पेटीत ठेवत होती. पुन्हा भर्रकन कामाला लागत होती. तो एवढासा मुलगा धावून धावून आईला मदत करत होता. अगदी क्षणाचीही उसंत त्यांना नव्हती. मुलाच्या अंगावरील कपडे ओले होते. अनवाणी पायाने तो सगळीकडे धावत होता. तो अंदाजे सहावीत होता. मला राहवेना, मी त्याला विचारले, “अरे, तू शाळेत कधी जातोस?” तो दिवस अंदाजे शुक्रवार असावा.

‘तू आईला मदत करतोस ही गोष्ट नक्कीच चांगली आहे; परंतु शाळा चुकवलीस तर अभ्यास कसा भरून निघणार?’

‘जातो की शाळेला’, एवढेच बोलून तो लोकांना भरभर भजीच्या प्लेट्स देऊ लागला. आई चहा ढवळत म्हणाली, ‘आता पावसाळ्यातच जास्त गर्दी असते हो ताई. आमचा हाच व्यवसाय पोटापाण्याचा, त्यामुळे पोराची शाळा एखादा दिवस चुकवावी लागते. तरी मी त्याची शाळा चुकू नये याची काळजी घेत असते. मला अजून दोन मुली आहेत. अधे-मधे त्या येतात मदतीला. मिस्टर पण याच व्यवसायात आहेत. मला खरेच त्या कुटुंबाचे कौतुक वाटले. एकमेकांना सांभाळून घेत ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते. परिस्थितीला झुंज देण्याची एक वेगळीच ताकद त्यांच्याकडे होती.

आंतरराष्ट्रीय संघटनेने ‘उत्कृष्ट युवा पुरस्कार’ दिलेल्या गोदावरी सातपुते यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे खूप आहे. त्यांनी बनविलेले आकाशदिवे सातासमुद्रापार उजळलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यात वाढलेल्या, इयत्ता सातवीपर्यंत शिकलेल्या गोदावरी लहानपणापासून वडिलांना आकाशदिवे बनविण्यास मदत करत. सोबतीने लोकरीचे वीणकाम, प्लास्टिकच्या वायरच्या हँडबॅग्ज बनवत.

२००० साली शंकर सातपुते यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्या पुण्यात आल्या. त्यांच्या पतीच्या भाजी विक्रीच्या व्यवसायात फार कमी उत्पन्न मिळायचे. त्यामुळे आकाशकंदील बनविण्याचा व्यवसाय करण्याचे गोदावरी यांनी ठरविले. नातलगांनी आर्थिक मदत केली. पती शंकर व दीर रत्नाकर यांनी कच्चा माल आणून दिला. पहिल्याच वर्षी गोदावरींनी ३००-डझन आकाशकंदील बनविले व ते इतके खपले की, मागणीपेक्षा पुरवठा कमी पडला. त्यातून २००३ पासून त्यांनी गरजू कामगार स्त्रियांची नेमणूक केली. तिथे या स्त्रिया दहा ते बारा तास काम करतात. गोदावरी देखील आकाशकंदील बनविण्याच्या कामात मदत करतात. भल्या मोठ्या बारा ते चौदा उंच फूट आकाश कंदीलांना खूप मागणी असते. पुरस्कार घेण्यासाठी गोदावरी लंडनला गेल्या होत्या. गोदावरींनी आयुष्य सुरळित करण्यासाठी, आर्थिक स्थैर्य येण्यासाठी दिलेली झुंज वाखाणण्यासारखी आहे.

खेडेगावात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरीसाठी आलेला विकास एका नातलगाकडे राहत होता. त्याची आई त्याच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. वडील खेडेगावात एकत्र कुटुंबात राहत होते. नोकरीसाठी विकास काहीसा अस्वस्थ झाला होता; परंतु एका आजारी वृद्धांची काळजी घेणाऱ्या अशा संस्थेत त्याला नोकरी मिळाली. संस्थेतर्फे मुलांना गरजू वृद्ध व्यक्तींकडे पाठविले जाते. त्यासाठी आधी त्यांना या वृद्धांची काळजी कशी घ्यायची याचे प्रशिक्षण दिले जाते. विकासने असे प्रशिक्षण पूर्ण केले व तो आता वयोवृद्ध, आजारी लोकांची सेवा करण्यास जातो. सुरुवातीला केवळ आर्थिक गरज म्हणून या कामाकडे पाहणारा विकास आता वृद्धांना औषधपाणी देणे, मसाज करणे, पॅरालिसिसच्या रुग्णांची काळजी, त्यांना जेवण भरविणे या कामात तरबेज होऊ लागला आहे.

असाच लढा, झुंज देण्याची वृत्ती मला सर्कशीत काम करणाऱ्या कलाकारांची आढळते. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली मुलं-मुली अनेक अवघड खेळ प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांची करमणूक करतात. त्यांच्या कसरती पाहून प्रेक्षक थक्क होऊन जातात. एकदा लहानपणी मी माझ्या वडिलांसोबत सर्कशीला गेलेले असतानाचा प्रसंग मला आठवतो. तिथल्या बुटक्या विदूषकाला येता-जाता बॅटचे फटके बसत होते. ते पाहून मला रडू फुटले. वडील समजूत घालायची म्हणून मला म्हणाले, ‘लोकांना हसवायचे काम विदूषकाचे असते. त्याला ते फटके लागत असतील असे नाही’. पण, मला काही बाबांचे उत्तर पटले नव्हते. विदूषकाच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्याने माझ्या हातात एक बिस्किटाचा पुडा ठेवला व तो निघून गेला. आताही मोठेपणी आम्ही कुटुंबीय सर्कसला गेलो की, मला तो प्रसंग आठवतो. पुन्हा एकदा मी त्यातल्या कलाकारांची धडपड, अदाकारी पाहून अंतर्मुख होते. त्यांची आयुष्याशी झुंज देण्याची तयारी पाहून आश्चर्यचकित होते. आयुष्यात झुंज देणाऱ्या व्यक्तींचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -