- कथा: रमेश तांबे
सानेबाई वर्गात आल्या, तसा मुलांनी एकच गलका केला, ‘बाई गोष्ट सांगा गोष्ट!’ पण, का कुणास ठाऊक बाईंचा आज अजिबात मूड नव्हता. त्यांनी सरळ गणित शिकवायला घेतलं. हातातलं पुस्तक टेबलावर ठेवलं, पर्स खुर्चीच्या खांद्यावर अडकवली अन् फळ्यावर ‘वर्तुळ’ असा शब्द लिहिला. तशी मुलांनी पुन्हा आरडाओरड सुरू केली.
कुणी ‘गोष्ट सांगा’ म्हणत होतं, कुणी चित्रविचित्र आवाज काढत होतं, कुणी आपापसांत बोलत होतं. बाईंनी फळ्यावर वर्तुळ काढलं, केंद्रबिंदू काढला, ‘केंद्रबिंदूतून जाणारी व परिघाला दोन्ही बाजूला छेदणारी सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास’ असं बाईंनी सांगताच आमच्या वर्गातला महाजन नावाचा एक वात्रट मुलगा उठून उभा राहिला अन् म्हणाला, ‘बाईऱ्याच व्यासांनी महाभारत लिहिलंय ना!’ असं म्हणताच वर्गात एकच हास्यकल्लोळ उडाला.
सारी मुलं, मुली पोट धरून हसू लागली. चित्रविचित्र आवाज काढू लागली. खरं तर साऱ्या वर्गाचा मूड आज मजा करण्याचाच होता. तरी सगळ्यांकडे दुर्लक्ष करून बाईंनी पुन्हा फळ्याकडे वळून शिकवायला सुरुवात केली. ‘वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग.’ तशी एक मुलगी उठून उभी राहिली अन् निरागसपणे बाईंना सांगू लागली, ‘बाई बाई ती मुलगी ना मला विचारते, तुला सीताफळ आवडते की क्षेत्रफळ?’ अन् पुन्हा एकदा वर्गात हास्याचा स्फोट झाला. अगदी मुख्याध्यापकांच्या केबिनपर्यंत आवाज गेला. तसे मुख्याध्यापक रागातच वर्गात आले. आम्ही सारी मुलं अगदी गुपचूप बसलो. मुख्याध्यापक वर्गात येऊन आम्हाला काही बोलण्याऐवजी सानेबाईंनाच बोलू लागले. ‘काय चाललंय वर्गात! तुमचं शिकवण्याकडे लक्ष नाही, तुम्हाला वर्ग नियंत्रणात ठेवता येत नाही.’ आणखी पाच-सहा मिनिटे ते बाईंना ताडताड बरंच काही बोलत होते. सानेबाई मान खाली घालून शांत उभ्या होत्या. मुख्याध्यापक वर्गाबाहेर जाताच मुलांनी पुन्हा गडबडीला सुरुवात केली. एकमेकांना हाका मारणे, पुढच्या विद्यार्थ्याला टपल्या मारणे, मधूनच कुणीतरी निरर्थक प्रश्न विचारणे, उगाचच हसत बसणे यात जवळजवळ दहा-बारा मिनिटे गेली. आमचं जग आणि बाईंचं जग यात प्रचंड अंतर पडलं होतं. एकीकडे बाई आम्हाला परिघ शिकवत होत्या. पण आम्ही मुलं मात्र शिकण्याच्या परिघाबाहेर होतो. आमचं वर्तुळ वेगळं होतं, बाईंचं वर्तुळ वेगळं होतं. जणू आम्हा दोघांची दोन वेगळी जगं होती.
एवढा वेळ शांतपणे शिकवणाऱ्या सानेबाईंनी अचानक फळ्यावरच्या सर्व आकृत्या पुसून टाकल्या. त्यांचा चेहरा एकाएकी गंभीर झाला अन् त्या खुर्चीत येऊन बसल्या. टेबलावरचं पुस्तक उघडलं आणि त्यातून कसलासा एक कागद बाहेर काढला. अन् साऱ्या वर्गाला उद्देशून त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला आज मजा करायची आहे ना! तर मग ठीक आहे. पण हा माझ्या हातातला कागद कोण मोठ्याने वाचून दाखवेल?’ तसा सारा वर्ग चिडीचूप झाला. मग मीच जागेवरून उठलो. बाईंजवळ गेलो, बाईंच्या हातातला कागद घेतला आणि मोठ्याने वाचायला लागलो.
ती आदल्या दिवशीची अमेरिकेवरून आलेली तार होती. त्यात लिहिलं होतं, आपल्या मुलाचं अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात काल रात्री अपघाती निधन झालं. त्याचा मृतदेह भारतात पाठवणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्याचा अंत्यविधी आम्ही त्याचे सारे मित्र इथेच उरकून घेत आहोत. ‘न्यूयॉर्क… अमेरिका…’ तार वाचताच साऱ्या वर्गात सन्नाटा पसरला. साऱ्यांच्याच काळजात धस्स झालं. काल रात्री आपल्या एकुलत्या एक मुलाचं निधन झालेलं असूनही वार्धक्याकडे झुकलेल्या सानेबाई आज चक्क वर्गावर आल्या होत्या. हा सारा प्रकार पाहून आम्ही सारी मुले पार हादरून गेलो होतो. सानेबाईंनी दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला होता. बराच वेळ त्या तशाच बसून होत्या. अगदी विमनस्क अवस्थेत…!
माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. मी काही न बोलता सानेबाईंच्या शेजारी उभा राहिलो. तोच सारा वर्ग बाईंच्या टेबलाभोवती गोलाकार जमा झाला. आता वेदनेचं एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. बाई त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू होत्या. प्रत्येकाच्या हृदयातली वेदना बाईंरूपी केंद्रबिंदूला छेदून समोरच्या विद्यार्थ्याच्या हृदयाला आरपार भिडत होती, अन् त्यातूनच संवेदनांचे असंख्य व्यास तिथल्या तिथे निर्माण झाले होते.
मघापासून सारा वर्ग बाईंच्या परिघाबाहेर होता. आता मात्र केवळ परिघ ओलांडून नव्हे, तर अगदी केंद्रबिंदूशी, नव्हे नव्हे हृदयबिंदूशी एकरूप झाला होता. वर्तुळ, परिघ, क्षेत्रफळ, व्यास, त्रिज्या आणि केंद्रबिंदू या साऱ्या संकल्पना त्या प्रसंगाने आमच्या साऱ्यांच्याच मनात इतक्या खोलवर रुजल्या की, सानेबाई आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात एक हळवा कोपरा बनून राहिल्या. शिक्षक अन् विद्यार्थी या मधली इतकी एकरूपता यापूर्वी आम्ही कधी अनुभवली नव्हती अन् त्यानंतरही कधीच नाही. आजही तो प्रसंग आठवला की, डोळे कसे भरून येतात अन् डोळ्यांपुढे वर्तुळ उभे राहते.