Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

श्रीवल्ली झाली आई...तब्बल तेरा वर्षांनी पाळणा हलला

श्रीवल्ली झाली आई...तब्बल तेरा वर्षांनी पाळणा हलला

मुंबई: मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल १३ वर्षांनी चार बछड्यांचा जन्म झाला. श्रीवल्ली या वाघिणीने या बछड्यांना जन्म दिला. बाजीराव वाघ आणि श्रीवल्ली वाघिणीची ही पिल्ले असून ही पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांच्या देखरेखीखाली आहेत.


श्रीवल्लीला मार्च २०२२मध्ये उद्यानात आणले होते. तिला ताडोबा येथे पकडण्यात आले होते. तर बाजीरावला चंद्रपूर जिल्ह्यात राजोरा येथे पकडले होते. त्याला डिसेंबर २०२०मध्ये मुंबईत आणले होते. श्रीवल्लीची ही पहिलीच गर्भधारणा असल्याने ती बछड्यांची कशी काळजी घेईल, त्यांना नाकारणार नाही ना, असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांसमोरही आहेत. मात्र जन्मानंतर तिने बछड्यांना साफ करून दूधही पाजले असल्याने ही चिंता थोडी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


श्रीवल्ली नैसर्गिक विधीसाठी जेव्हा त्यांच्या मुख्य पिंजऱ्यापासून दूर जाईल, तेव्हा उपलब्ध वेळेत बछड्यांचे वजन तपासून, त्या जागेची साफसफाई करण्यात येईल. त्यानंतर १५ दिवसांमधून एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली. हे बछडे मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये कमीत कमी मानवी हस्तक्षेप आवश्यक असल्याने ही काळजी घेण्यात येत आहे. या चार बछड्यांच्या जन्मामुळे आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण १० वाघ झाले आहेत.

Comments
Add Comment