Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजआयपीएल नावाचा वटवृक्ष

आयपीएल नावाचा वटवृक्ष

  • विशेष: उमेश कुलकर्णी

इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल २००८ मध्ये प्रथम सुरू झाले तेव्हा ते रांगत्या अवस्थेत होते. आपले पिताश्री कसोटी क्रिकेट आणि काकाश्री एकदिवसीय क्रिकेटनंतर हे बाळ आले आणि आज त्या बाळाने घराचा ताबा घेतला आहे. हे बाळ आज जवळपास १५ वर्षांनी घराचा कर्तासवरता पुरुष झाला असून पिताजी आणि काकाजी जरासे अडगळीत पडले आहेत.

आयपीएलचा जन्म कसा झाला, त्याची पार्श्वभूमी सांगण्यापूर्वी तो का झाला, हे सांगणे आवश्यक आहे. भारतात तेव्हा मॅच फिक्सिंगचे अशुभ सावट होते आणि अनेक दिग्गज खेळाडू त्यात सामील होते, अशा चर्चा रंगत होत्या. म्हणून लोकांचा क्रिकेटमधील एकूणच रस संपला होता आणि असेही होते की, कसोटी क्रिकेटच्या आकाशात तळपणारे डॉन ब्रॅडमन, व्हिक्टर ट्रंपर, जॅक हॉब्ज, डेनिस कॉम्प्टन हे तारे जेव्हा अस्तंगत झाले तेव्हा वाघ, सिंह जाऊन सामान्य प्राणी कसोटी क्रिकेटमध्ये यावेत, तशी अवस्था झाली होती. बॅट म्हणजे चेंडू चोपून काढण्यासाठीच असते, हे विसरून गेलेले फलंदाज केवळ चेंडू तटवून सामना अनिकाली होण्यासाठी प्रयत्न करायचे. रटाळ खेळाचा बादशहा असे ज्याला म्हटले जाते त्या केन बॅरिंग्टन याने तर क्रिकेटला एखाद्या नीरस दुःस्वप्नाचे स्वरूप आणले होते. लोकांनी मग अशा खेळाकडे पाठ फिरवली आणि मग क्रिकेटला टिकवण्यासाठी १९७१ पासून एकदिवसीय क्रिकेट हे बाळ जन्माला आले. पाहता पाहता त्याने वडिलांवर कुरघोडी केली आणि हे बाळ चांगलेच लोकप्रिय झाले. पण पुढे जग इतके वेगवान झाले की, लोकांना पन्नास षटकेही कंटाळवाणी वाटू लागली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला शह देण्यासाठी एका वाहिनीने आयसीएल ही स्पर्धा सुरू केली. मग बीसीसीआयने आपलीही आयपीएल ही स्पर्धा सुरू केली. ही स्पर्धा म्हणजे वीस वीस षटकांची स्पर्धा होती आणि आता त्याचे नियम वगैरे सगळ्याना पाठ असतात. या स्पर्धेतून बीसीसीआयच्या तिजोऱ्या भरून वाहू लागल्या आणि तिला पैशाचे अजिर्ण झाले. आयपीएलने अनेक खेळाडूंना मालामाल केले आणि उदंड संख्येने चाहते परतले. मात्र आयपीएलची गत एकदिवसीय सामन्यांसारखी झाली नाही. ते आजही लोकप्रियता टिकवून तर आहेच, पण सारखी वाढत आहे. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना आपण चांगले फटके मारू शकतो, याचा प्रथमच शोध लागला. आणि आयपीएलमुळेच फलंदाजांना फटकेबाजीची इतकी सवय झाली की, एकदिवसीय सामन्यात चारशे धावांचे लक्ष्य सहज गाठता येऊ लागले. खुद्द आयपीएलमध्येच नव्हे तर जागतिक ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धेतही वीस षटकात शतके मारण्याचा चमत्कार वारंवार घडू लागला. पूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये दिवसभर खेळून शतकाच्या भोज्याला शिवणाऱ्या फलंदाजाच्या कौतुकाचे दळण दळले जात असे. आज रोहित शर्माने टी-२० मध्ये म्हणजे वीस षटकांत चार शतके लगावली आहेत आणि त्याच्या मागे तीन शतके काढून कॉलीन मन्रो, ग्लेन मॅक्सवेल (हा तर सलामीलाही येत नाही) वगैरे आहेत. खेळ इतका वेगवान झाला आहे म्हणून तर त्याला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. टी-२० वर जुने खेळाडू टीका करतात. डेनिस कॅप्टन तर टी-२० सामना सुरू झाला की, टीव्ही बंद करायचा. कारण तो हे सामने म्हणजे करमणुकीचे कार्यक्रम आहेत, असे म्हणायचा. पण तरीही टी- २० ने आज जगव्याळ स्वरूप धारण केले आहे.

२००८ पासून सुरू झालेली ही स्पर्धा आज भारतीय अर्थव्यवस्थेला जोरदार चालना देणारी ठरली आहे. एकट्या २०२० च्या आयपीएल स्पर्धेतून बीसीसीआयच्या तिजोरीत चार हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. खेळ आज कसा गतिमान झाला आहे, याचे उदाहरण एकटी टी-२० स्पर्धा देते. पूर्वीही असे वेगवान खेळाडू होते. बिली बार्न्स नावाचा नॉटिंगहॅमशायरचा खेळाडू एकदा लीग सामन्याला मद्य प्राशन करून आला आणि लंचपूर्वी शतक काढले. त्याला नंतर चौकशीसाठी बोलवण्यात आले. तेव्हा तो झिंगूनच चौकशीला सामोरा गेला आणि म्हणाला की मी जर लंचपूर्वी शतक काढू शकतो, तर प्रत्येक सामन्यापूर्वी माझ्या पिण्याची सोय करण्याची जबाबदारी नॉटिंगहॅमशायरची आहे. हा किस्सा यासाठी सांगितला की, असेही खेळाडू होते. पण नंतर रटाळ फलंदाजीचे बादशहा आले आणि मग लोकांनी कसोटी क्रिकेटपासून पाठ फिरवली. पण त्यांना पुन्हा क्रिकेटकडे खेचून आणण्याचे काम आयपीएलनेच केले आहे. आयपीएल सामने शहरांशहरांमध्ये होतात आणि देशांमधील सामन्यांइतकीच रूची त्यात लोक घेतात. उलट लोकांना आपल्या शहराबद्दलच्या स्वाभिमानाचा निचरा करण्याची एक संधी यातून मिळते. आता २००८ पासून ते २०२२ पर्यंत किती आयपीएल स्पर्धा झाल्या आणि त्यात कोण विजेते होते, वगैरे तपशील इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. ती जंत्री देण्यात काहीच अर्थ नाही. आयपीएलची सुरुवात केली ललित मोदी यांनी. पण नंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि आज तेही परदेशात फरार आहेत. पण त्यांनी सुरुवात केलेली ही स्पर्धा आजही जल्लोषात आणि दिमाखात खेळली जाते आणि अख्खे राष्ट्र तीवर डोलत असते. आयपीएलने भारतीय अर्थव्यवस्थेला काय योगदान दिले, याची आकडेवारी महाकाय आहे. असे आरोप होतात की, आयपीएल म्हणजे गोलंदाजाचे कबरस्तान आहे. पण हे स्वाभाविकच आहे. लोक फलंदाज किती कौशल्याने चेंडू तटवतो, हे पाहायला येत नसतात. तर चेंडू तो कसा सीमापार धाडतो, हे पाहण्यासाठीच येत असतात. अगोदरच आपल्या नेहमीच्या काळज्यांनी त्रस्त असलेले लोक आयपीएल सामन्यांतून विरंगुळा शोधतात. पण, आयपीएल बीसीसीआयसाठी किती लाभाचे आहे, ते पाहा. स्टार नेटवर्कने आयपीएलचे टीव्ही आणि मीडिया हक्क तब्बल २.३ अब्ज डॉलर्स इतक्या महाकाय किमतीला विकले. बीसीसीआयने स्टार स्पोर्ट्सला जागतिक प्रसारणाचे हक्क १६,३४७ कोटी रुपयांना विकले. हे मी २०२० सालचे सांगितले. एखाद्या लहान राज्याचा इतक्या किमतीचा अर्थसंकल्प असतो. आयपीएलमधून नवोदित खेळाडूही प्रचंड मालामाल झाले आहेत. यात काही विदेशी आणि उर्वरित आपलेच खेळाडू आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल वगैरे खेळाडू अब्जाधीश झाले आहेत. तुलना करण्यात काही अर्थ नाही. पण, सुनील गावसकर सत्तरच्या दशकात एक कसोटी खेळायचा तेव्हा त्याला साधारण हजार रुपये मानधन असायचे. यातून कुठले कुठे क्रिकेट आले आहे आणि यात आयपीएलचा प्रमुख वाटा आहे, हे मान्य करायलाच हवे. आयपीएलमुळे अर्थव्यवस्थेत निश्चितच नवचैतन्य आले आहे आणि नवीन गुंतवणूकदार त्यात सहभागी होत आहेत. आयपीएलचे जे फ्रँचायझी आहेत, ते सात प्रकारांनी यातून पैसा कमावतात. कित्येक खेळाडू पंचवीस ते तीस कोटी रुपयांनाही विकत घेतले जातात. अर्थात खेळाडूंच्या बोलीवर टीकाही खूप झाली आहे. त्यांचा बाजार केला जातो, वगैरे टीका त्यावर होते. पण, बाजार म्हटले की, विक्री आलीच. त्यामुळे त्यात काही वावगे आहे, असे नाही. खेळाडूंची क्रीडेची वर्ष असतात ती दहा ते पंधरा वर्षे. त्यात त्यानी कमावून घेतले नाही तर त्यांना उतारवयात कमावता काय येणार कप्पाळ. भारतीय क्रिकेटमध्ये चैतन्य आणि समृद्धी घेऊन येणारी ही स्पर्धा आहे आणि ती आता मागे वळून कधीच पाहणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -